पुन्हा वाघ! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी 
सोमवार, 15 एप्रिल 2019

आंब्याच्या झाडाखाली सापळा लावण्याचे कारण काय असेल? अशी शंका माझ्या मनात आली.

प्रति, मा. वनमंत्री, महाराष्ट्र राज्य, 
प्रिय सुधीर्जी, सध्या मी निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. (तुम्ही जरा कमीच व्यग्र आहात, हेही मला दिसते आहे! पण ते असो.) तुम्ही राज्याचे वनमंत्री असल्याने तुम्हाला तातडीने लिहीत आहे. ताडोबा अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये शिकाऱ्याने लावलेल्या तारांच्या सापळ्यात अडकून वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी वाचली. भयंकर काळजी वाटली. पूर्वी वाघाच्या भीतीने पोटात गोळा यायचा, आता वाघाची शिकार म्हटली की येतो. (युतीचा निर्णय झाल्यानंतर) वाघांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नका, असे मी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निक्षून सांगितले होते. तुम्ही तेव्हा हजर होता. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत वाघांबद्दल बरीवाईट बातमी येणे, चांगले नाही. तेव्हा तांतडीने लक्ष घालून त्वरित अहवाल द्यावा. कळावे. आपला. फडणवीसनाना. 
* * * 
आदरणीय नानासाहेब यांसी, मोदीजींच्या कृपेने प्रचारात आपण प्रचारात व्यग्र आहात. अशा व्यग्र दिनक्रमातही आपल्याला महाराष्ट्रातील वन्यजीवांची काळजी आहे, हे बघून माझ्या मनरूपी आंब्याच्या झाडाला समाधानाचे आंबे लागले!! मीही (सध्या) जमेल तितका प्रचार करत असतो. लोक मला चंद्रपूरचा वाघ असे प्रेमाने म्हणतात. त्यामुळे ताडोबा अभयारण्यात कोअर झोनमध्ये वाघिणीची शिकार झाल्याची बातमी ऐकून मलाही प्रचंड धक्‍का बसला. तारेच्या सापळ्यात सदर वाघीण अडकून पडली आणि नंतर तिचे प्राणोत्क्रमण झाले, असा प्राथमिक अहवाल आहे. 

सध्या जंगलात मोहाच्या फुलांना बहर आला असून, येथील आदिवासी ती फुले गोळा करायला जंगलात जात असतात. मोहफुलांचे एक मादक पेय बनवले जाते. ते अतिशय मधुर असते. (असे ऐकले आहे!!) मी स्वत: तेथे जाऊन आलो. (मोहाची फुले गोळा करायला नव्हे! चौकशीसाठी!!) ऐन रणरणत्या उन्हात जंगलात हिंडून आलो. 

कोअर झोनच्या कक्ष क्रमांक 123 मध्ये खातोडा गेटमधून आत गेल्यानंतर उजव्या हाताला एक प्रशस्त माळरान लागते. तेथे काही हरिण, सांबरे चरत होती. एक गठ्‌ठा येवढी हरणे बघून अनवधानाने मी भाषणालाच सुरवात केली. ""मोदीजींना पुन्हा निवडून द्या...'' असे वाक्‍य येण्याआधीच हरणांचा कळप उधळून निघून गेला. कोळसुंद्यांचा (रानातील कुत्रे) एक कळप जवळ येता येता भुंकू लागला. पण मला बघून शेपूट हलवू लागला. वनमंत्री ह्या नात्याने मला येथे प्राणिजगतात चांगला रिस्पेक्‍ट आहे. अर्थखातेही माझ्याकडे आहे, हे अर्थात येथील प्राण्यांना माहीत नसावे. (एकानेही अजून कर्ज वा कर्जमाफी मागितलेली नाही. असो) थोडीशी पायपीट केल्यानंतर एका आंब्याच्या झाडाखाली तारेचा सापळा दिसला. ह्याच तारेच्या सापळ्यात सदर वाघीण अडकून मृत झाली होती, अशी माहिती वनपालाने दिली.

आंब्याच्या झाडाखाली सापळा लावण्याचे कारण काय असेल? अशी शंका माझ्या मनात आली. गेल्या दोन वर्षांत आपण तब्बल दहा कोटी झाडे राज्यभर लावली. महाराष्ट्र हिरवागार करून टाकला. परंतु एकाही झाडाशी सापळा लावला नाही. 
सदर मृत वाघीण वय वर्षे दीड वर्षाची होती व आंबे खाण्यासाठी तेथे आली असावी, असा माझा वनमंत्री ह्या नात्याने प्राथमिक कयास आहे. मी ही शंका पोस्ट मार्टेम करणाऱ्या डॉक्‍टरांकडे व्यक्‍त केली. पण वाघ आंबे खात नाहीत, असे ते म्हणाले.

माझा विश्‍वास नाही. सध्या आंब्याचे दिवस आहेत. मार्केटमध्ये आंबा अजून महाग आहे. फुकट मिळणारे आंबे कोण सोडेल? तेव्हा सदर वाघीण आंब्याच्या मोहापायी ताडोब्याच्या जंगलात येऊन फशी पडली असावी, असे सकृतदर्शनी दिसते. बाकी सर्व काही ठीक. आपला आज्ञाधारक. सु. मा. (वनमंत्री) 

Web Title: Pune Edition Article on Dhing Tang