मैं सब जानता हूँ! (ढिंग टांग! )

ब्रिटिश नंदी 
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक! 
मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं! 
बेटा : (टीव्हीकडे तुच्छतेनं नजर टाकत) काय बघतेस त्या बंडल बातम्या! 
मम्मा मॅडम : (समजूतदार सुरात) बघाव्यात... चांगलं असतं! जगात काय चाललंय, ते कळतं!! 

बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक! 
मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं! 
बेटा : (टीव्हीकडे तुच्छतेनं नजर टाकत) काय बघतेस त्या बंडल बातम्या! 
मम्मा मॅडम : (समजूतदार सुरात) बघाव्यात... चांगलं असतं! जगात काय चाललंय, ते कळतं!! 
बेटा : (अभिमानानं) जी गोष्ट आपल्याला आधीच माहीत असेल तर त्याला बातमी कसं म्हणणार? उदाहरणार्थ, तुम्ही सगळे आत्ता छत्तीसगडच्या मतदानाकडे डोळे लावून बसला आहात! मला तिथल्या निवडणुकीचा रिझल्ट आधीच माहीत आहे!! अब बोलो!! 
मम्मा मॅडम : (हताश होत) पण ""मुझे प्रधानमंत्री बना दो, तो मैं सूरज जो इस तरफ से उठता है, उसे उस तरफसे उठा दूँगा'' असं तू छत्तीसगडमधल्या भाषणात का म्हणालास? 
बेटा : (चिडून) मी असं बोललोच नव्हतो! त्या कमळवाल्यांनी माझं भाषण मोडतोड करून दाखवलं! मोदीजी कहते हैं की... अशी सुरवात मी केली होती!! पाजी लेकाचे!! 
मम्मा मॅडम : (समजूत घालत) आपण त्यांच्या हातात कोलीत कशाला द्यायचं? अति-आत्मविश्‍वासामुळे काय होतं, ते कळलंय ना आता? निवडणुकीचे निकाल तुला आधीच कळले आहेत, असं निदान जाहीर बोलू नकोस आता! तुला जे वाटतंय, तो गैरसमज असू शकतो!! 
बेटा : (भुवया उंचावत) गैरसमज आणि माझा?...नामुमकिन!! मैं ही जीतूंगा...तुम देखते रहना!! 
मम्मा मॅडम : (हताशेनं) असं तू गेली चार वर्षं प्रत्येक निवडणुकीच्या वेळी बोलला होतास!! 
बेटा : (हात झटकत) मी आता पहिल्यासारखा राहिलो नाही मम्मा! (दात ओठ खात) मला "पप्पू' म्हणणाऱ्यांचे दात चांगले घशात जाणार आहेत... बघशीलच तू!! 
मम्मा मॅडम : (फणकाऱ्याने) आग लागो मेल्यांना! तुझ्यासारख्या हुश्‍शार मुलाला अशी नावं ठेवणाऱ्यांचं तळपट होईल!! 
बेटा : (हाताची घडी घालत गंभीरपणाने) आज सकाळी तर खुद्द मनमोहन अंकलचा फोन आला होता! त्यांना इकॉनॉमिक्‍समधली काही शंका होती... 
मम्मा मॅडम : (धक्‍का बसून) इकॉनॉमिक्‍समधली शंका त्यांनी तुला विचारली? 
बेटा : (खांदे उडवत) अफकोर्स!! त्यात काय झालं? 
मम्मा मॅडम : (अविश्‍वासानं) मनमोहन अंकल केवढे मोठे इकॉनॉमिस्ट आहेत! 
बेटा : (डोळे मिटून) मीसुद्धा आहे...! परवा आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन अमेरिकेत भाषण करताना तेच म्हणाले... 
मम्मा मॅडम : (डोळे विस्फारून) काय म्हणाले? 
बेटा : (शांतपणे) हेच की मला इकॉनॉमिक्‍समधलं चांगलं कळतं! 
मम्मा मॅडम : (मान हलवत) असं म्हणाले?.. खरंच? 
बेटा : (तितक्‍याच थंडपणे) डायरेक्‍टली तसं नाही म्हणाले, पण नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाचं वाटोळं झालं, आणि देशाची वाढ खुंटली असं ते म्हणाले! गेली दोन वर्षं मी हेच बोलतो आहे की..! त्याचा अर्थ काय होतो? 
मम्मा मॅडम : (उमजून) अच्छाऽऽ... मनमोहन अंकल काय म्हणत होते? 
बेटा : (सहज सांगितल्यागत) नोटाबंदीचा निर्णय निरर्थक होता असं म्हणू की वाईट होता, असं म्हणू... असं विचारत होते! मी म्हटलं की फालतू निर्णय होता असं म्हणा! त्यांनी फोन ठेवला... 
मम्मा मॅडम :(मटकन खुर्चीत बसत) ही होती त्यांची इकॉनॉमिक्‍समधली शंका? 
बेटा : (दोन्ही खिशांत हात घालत आरामात) येस...! म्हणून म्हटलं की मला आधीच बरंच काही कळलेलं असतं! उदाहरणार्थ, राफेल विमानाची मी सांगितलेली किंमतच खरी आहे!! लोक आत्ता हसतील; पण मी पुढल्या वर्षी पीएम झालो की हेच लोक मला संरक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखतील... बघशीलच तू! मैं सब जानता हूँ, मम्मा... सब जानता हूँ!! 

Web Title: Pune Edition Editorial Article On Dhing Tang