युद्धातील ‘दहशतवाद’

रशियातील हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ने स्वीकारली, त्याला पाश्‍चात्य देशांनी दुजोरा दिला; तरीही युक्रेनवरच रशियाचा संशय आहे. त्याचे पडसाद भविष्यात उमटू शकतात.
Russia Ukraine ongoing conflict country to face war within war putin
Russia Ukraine ongoing conflict country to face war within war putinSakal

निरंतर ध्यातां हरि । सर्व कर्माची बोहरी ।

दोष जाती दिगंतरीं । रामकृष्णउच्चारणीं ॥

- संत ज्ञानेश्‍वर

रशिया युक्रेनबरोबरच्या थेट युद्धात गुंतलेला असतानाच छुप्या दहशतवादी हल्ल्यालाही तोंड देण्याची वेळ त्या देशावर आली. याची कारणमीमांसा वेगवेगळ्या पद्धतीने केली जात असली तरी हे ‘युद्धांतर्गत युद्ध’ सध्या सुरू असलेल्या संघर्षाचीच एक कडी असण्याची शक्यता आहे.

रशियाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे व्लादिमीर पुतीन यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतरच्या काही दिवसांतच राजधानी मॉस्कोच्याच उपनगरी भागांत शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दीडशेच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला आहे.

अलीकडच्या काळात रशियात झालेला हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला. इस्लामिक स्टेट- खोरासन (इसीस-के) या संघटनेने घटनेनंतर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी रशियन नेते युक्रेनकडे बोट दाखवित आहेत.

आधुनिक काळातील युद्धांचे स्वरूप लक्षात घेता, ते अनेक आघाड्यांवर लढले जाते. त्यामुळे पुतीन केलेला आरोप तत्काळ, सरसकट झटकून टाकता येणार नाही. अमेरिकी गुप्तचरांनी रशियाला काही दिवसांपूर्वीच अशाप्रकारच्या हल्ल्याचा इशारा दिला होता.

तरीदेखील ‘‘या हल्ल्यामागे युक्रेनचा हात असावा, हल्लेखोरांना युक्रेनमध्येच प्रशिक्षण मिळाले आहे. एवढेच नव्हे तर हल्ल्यानंतर त्यांचा युक्रेनमध्येच पलायनाचा प्रयत्न होता’’, असा दावा रशियातर्फे विविध पातळ्यांवरील प्रवक्त्यांकडून केला जात आहे. हल्लेखोरांचा नेमकेपणाने तपास करणे, त्यांचे कोणाशी लागेबांधे आहेत, त्यांचे हल्ल्यामागील हेतू काय, हेही तपासणे आव्हानात्मक आहे.

गेली काही दशके भारत सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवादाच्या नायनाटासाठी आग्रहाने पाठपुरावा करत आहे. राजकीय उद्दिष्टे साधण्यासाठी कोणीही दहशतवादी टोळ्यांना हाताशी धरत असेल, त्यांना आश्रय देत असेल वा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करीत असेल तर त्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे.

रशियातील हल्ल्याची पाळेमुळे निरपेक्षपणे, निष्पक्षरीत्या खणली जाणे आणि त्यामागील वास्तव बाहेर येणे गरजेचे आहे. शाळा, करमणूक केंद्रे यांना रशियात हल्लेखोरांनी लक्ष्य बनवण्याचे, निष्पाप नागरिक, विद्यार्थ्यांना ओलीस ठेवण्याचे प्रकार नवीन नाहीत.

तशा स्वरूपाच्या रक्तरंजित इतिहासाच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत.या हल्ल्यामागे ‘इसिस-के’ ही संघटना असावी, याचा दाखला विविध पातळ्यांवर दिला जातो. ही संघटना पाकिस्तानी तालिबान्यांनी सुरू केली.

अमेरिका अफगाणिस्तानातून काढता पाय घेत असताना याच संघटनेच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न तालिबान्यांनी केला. अफगाणिस्तान, इराण, मध्य आशियावर वर्चस्वाचा संघटनेचा प्रयत्न आहे. अमेरिकेने मूळ ‘इसिस’ संघटनेचा निःपात केला असला तरी ही संघटना जगात सक्रिय आहे.

सीरियाचा सर्वेसर्वा बशीर अल-असदच्या मागे रशियाने उभे राहणे त्यांना रुचलेले नाही. वर्तमानातील घटना इतिहासाच्या छायेत घडत असतात, असे म्हणतात. तसे ऐंशीच्या दशकात रशियाने अफगाणिस्तानात केलेल्या कारवाईचे उट्टेही या संघटनेला काढायचे आहे.

या संघटनेत रशियन बोलणारे तसेच रशियन नागरिकही सामील होत आहेत. रशियातील एका प्रार्थनास्थळी हल्ल्याचा त्यांचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी उधळून लावला होता. त्यानंतर ही घटना घडली आणि ‘इसिस-के’ने केलेला दावा, यामुळे हल्ल्यामागे युक्रेन नव्हे तर ‘इसीस’च असल्याचा दावा पाश्‍चात्य देश करत आहेत.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यापासून ते त्यांचे अंतर्गत गृह, परराष्ट्र अशी सर्व खाती ‘इसिस’ असा नामोल्लेखही करत नाहीत. उलट युक्रेनमध्येच हल्लेखोरांना कसे प्रशिक्षण मिळाले, ते हल्ल्यानंतर तिकडेच कसे पलायनाच्या तयारीत होते, याचे दावे करत विविध घटना, साक्षीपुरावे देत आहेत.

त्यामुळे हल्ल्याच्या घटनेचे रशिया-युक्रेन युद्धात भांडवल केले जाईल. आगामी काळात त्याचे पडसाद युद्धाच्या आघाडीवर उमटतील, असे वाटते. ‘युक्रेनच्या समर्थनार्थ येणारा अमेरिकेचा प्रत्येक शब्द हा हल्ल्याचा पुरावा मानला जाईल,’ असे रशियन अधिकाऱ्यांचे विधान या भीतीला बळच देते.

युक्रेनला अकारण या प्रकरणात ओढू नये, त्याचे विपरित परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेनेही रशियाला दिला आहे. एकमात्र खरे की, या घटनेने गुप्तचरांच्या आघाडीवर बलदंड असलेल्या रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या (एफएसएस) निष्क्रियतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

खरेतर सुरक्षिततेच्या पातळीवर अनेक देशांच्या गुप्तचर आणि प्रशासकीय यंत्रणा एकमेकांच्या पातळीवर विविध प्रकारच्या माहितींची देवाणघेवाण करत असतात; हल्ले, घातपातांची माहिती, पूर्वसूचना देत असतात.

त्यासाठी त्यांची संपर्कयंत्रणा प्रभावी लागते, त्याबरोबरच विश्‍वासाचे वातावरणही लागते. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशिया याबाबतीत कमी पडला., असे प्रथमदर्शनी जाणवते. अमेरिकी गुप्तचरांच्या इशाऱ्याची त्यांनी गांभीर्याने दखल न घेतल्याची किंमत या हल्ल्याने चुकवावी लागली आहे. या दावे-प्रतिदाव्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल.

पण ‘इसिस’च्या कारवायांबाबत भारतासह साऱ्या जगाने अधिक सावध राहिले पाहिजे. मुख्य म्हणजे दहशतवादाच्या विरोधात निःसंदिग्ध भूमिका घ्यायला हवी; मग हल्ला कोणाविरुद्धही असो, हे तत्त्व रूजण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com