ड्रेस कोड! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 2 जून 2017

उकाडा ही एक अत्यंत तापदायक गोष्ट आहे, हे उघड (उघडे नव्हे) आहे. जीव नुसता हैराण होतो. काही म्हणता काही करवत नाही. उकाड्याच्या दिवसांत पंख्याखाली तासन्‌तास पडून राहणाऱ्या आमच्या ओळखीच्या एका गृहस्थांवर अनवस्था प्रसंग ओढवला होता. घामाच्या भयाने कूसदेखील न बदलता मोजून आठ तास निश्‍चेष्ट पडून राहिल्याने त्यांस "उचलून' विद्युतदाहिनीतील अधिक उकाड्याच्या जागी नेण्यात आले. ऐनवेळी त्यांची ग्लानी उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. ईश्‍वर त्यांस उदंड आयुष्य देवो. सारांश इतकाच की उकाड्याच्या दिवसांत माणसाने किमान कपडे (तरी) घालावेत, असे आमचे स्पष्ट मत आहे.

उकाडा ही एक अत्यंत तापदायक गोष्ट आहे, हे उघड (उघडे नव्हे) आहे. जीव नुसता हैराण होतो. काही म्हणता काही करवत नाही. उकाड्याच्या दिवसांत पंख्याखाली तासन्‌तास पडून राहणाऱ्या आमच्या ओळखीच्या एका गृहस्थांवर अनवस्था प्रसंग ओढवला होता. घामाच्या भयाने कूसदेखील न बदलता मोजून आठ तास निश्‍चेष्ट पडून राहिल्याने त्यांस "उचलून' विद्युतदाहिनीतील अधिक उकाड्याच्या जागी नेण्यात आले. ऐनवेळी त्यांची ग्लानी उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. ईश्‍वर त्यांस उदंड आयुष्य देवो. सारांश इतकाच की उकाड्याच्या दिवसांत माणसाने किमान कपडे (तरी) घालावेत, असे आमचे स्पष्ट मत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत तलम, सुती व शुभ्र रंगाचे किमान कपडे (पक्षी : गंजिफ्राक) घालून बसले असता जिवास थंडावा मिळतो. किंबहुना किमान कपडे हाच उन्हाळ्याचा ड्रेस कोड आहे, असे आम्ही म्हणू!! पारा चढता असण्याच्या काळात पंख्याखाली गंजिफ्राकाची पोटावर वळकटी करून नुसते पडून राहाणे कोणाला आवडणार नाही?

तथापि या भयंकर दिवसांत दहा-दहा लाखांचे सूट आणि पाटलोण चढवून देशोदेशी फिरणे हे मात्र उदाहरणार्थ जिकिरीचे आहे. आमचे प्रधानसेवक जे की श्रीश्री नमोजी यांनी बर्लिन येथे सूटकोटात भेट दिल्याचे आपण टीव्हीवर (वर वर्णिलेल्या अवस्थेत बसून) पाहिले असेलच. सुटाबुटातील नमोजी आणि त्यांच्यासमोर खुर्चीत तलम, सुती व शुभ्र रंगाच्या पोशाखात आमची अत्यंत आवडती देसी गर्ल प्रियांकाबेन चोप्रा. (कंपोजिटर आडनाव संपूर्ण ठिवा. लोच्या होईल!!) ह्यांची छबी फेसबुकावरही देखिली असेलच. हाताशी मोबाईल आणि बराच वेळ असेल तर आपण प्रियांकाबेनचे "ट्रोलिंग'देखील केले असेलच. प्रियांकाबेन ह्यांनी परिधान केलेल्या पोशाखास लक्षावधी लोकांनी आक्षेप घेतला व त्यांस नाही नाही ते बोल लावले ह्याचे आम्हांस फार्फार दु:ख होते. वास्तविक ह्या प्रसंगी आम्ही स्वत: उपस्थित होतो व नमोजी ह्यांना भेटण्यापूर्वी आम्ही प्रियांकाबेन ह्यांचे स्वागत केले होते. (खुलासा : आम्हास गुजराथी मुखोद्‌गत असल्याने परदेश दौऱ्यावर आम्ही त्यांच्यासोबत असतोच.) प्रियांकाबेन ह्यांच्याशी प्रथम संवाद झाला तो आमचा, नंतर श्रीश्री नमोजींचा!! ह्या प्रसंगी आम्हां उभयतांमध्ये जो संवाद झाला तो असा :

आम्ही : (स्वागत करत) आवो आवो, बेसो! केम छो?
प्रियांकाबेन : (लाजत) सारु!
आम्ही : (चौकशी करत) क्‍यारे आव्यो?
प्रियांकाबेन : (खुर्चीत ऐसपैस बसत) अमणाज..."बेवॉच'नेप्रमोशनमाटे आले होते!
आम्ही: (हादरून) बेनवॉच?
प्रियांकाबेन : (खुलासा करत) बे...बे...बेवॉच!! आ मारी फिल्लम छे! इंग्लिसमां!!
आम्ही : (सुटकेचा निःश्‍वास टाकत) तो पछी काई चिंता नथी!! (हुस्स करत)...अहियां बहु गरम थाय छे! ने?
प्रियांकाबेन : (एकेकाळी आपण "काशीबाई'चा रोल केल्याचे आठवून थेट मराठीत शिरत) इश्‍श!! गरम कुठलं? मरणाची थंडी पडलीये इथे!! बारा डिग्री टेंपरेचर आहे म्हटलं!! आमच्या पुण्यात डिसेंबरात असतं तसं!!
आम्ही : (पुण्याच्या उल्लेखानं खूश होत) "आपल्या' पुण्यात म्हणा, ताई!! इथं आम्हाला कोट घालून बसावं लागतं! काय करणार? शिष्टाचाराचा भाग सांभाळावा लागतो ना!!
प्रियांकाबेन : (फुकटचा सल्ला देत) एवढा मोठा कोट घालून बसलाय तुम्ही!! उकडणारच नं? माणसानं कसं सुटसुटीत असावं!! मोजके दागिने, मोजके कपडे!! हो की नाही?
आम्ही : (प्रश्‍नार्थक चेहऱ्यानं) तुम्हालापण उकडतंय का?
प्रियांकाबेन : (घाईघाईने हस्तक्षेप करत) कृपा करून हा प्रश्‍न इंग्रजीत विचारू नका हं!!
...पुढील संवाद सांगण्यात अर्थ नाही. प्रियांकाबेन आल्या तश्‍या श्रीश्री नमोजींना भेटल्या आणि निघून गेल्या! बर्लिनचे टेंपरेचर आणखी कमी झाले. आम्ही तूर्त मुंबईत पंख्याखाली गंजिफ्राकावरच (गारव्याच्या प्रतीक्षेत) बसून आहो!! तात्पर्य : सम लाइक इट हॉट, सम लाइक इट कोल्ड, हेच खरे.

Web Title: sakal editorial dhing tang british nandi dress code marathi news sakal news