Hous-of-Bamboo
Hous-of-Bamboo

हौस ऑफ बांबू : साहित्य आणि शास्त्र!

नअस्कार! मराठी साहित्यिकाला किती किती स्थित्यंतरांमधून जावे लागते, हे घरात्बसून तुम्हाला कळणार नाही. नाशिकला ९४ वे अखिल्भार्तीय मराठी साहित्य संमेलन होणार, आणि अध्यक्षपदी साक्षात डॉ. जयंत्राव नारळीकर (कोल्हापूर-बनारस-केंब्रिज-मुंबई-पुणे...आता यात नाशिक समाविष्ट होणार!!) लाभणार हे कळल्यानंतर मराठीतले कितीतरी साहित्यिक पार हादरुन गेले आहेत. या वयात माण्साने काय काय म्हणून शिकायचे?

हे म्हंजे मराठीच्या तासाला गणिताचे मास्तर वर्गात शिर्ल्यावर जे घडत्ये, तस्सेच झाले आहे. वास्तविक विज्ञान आणि गणित या दोन्ही विषयांशी लहानपणीच पंगा झाल्यामुळे माणूस (नाइलाजाने) साहित्याच्या नादाला लागतो, असे एक सर्वमान्य गृहितक आहे. नाही जमत एखादीला गणित नि तुमचं ते विज्ञान! पण त्यामुळे काय बिघडलं? लहान्पणी मी शाळेत अस्ताना गणिताच्या पेपरात ‘दृढ संकल्परुपी पूर्णसंख्येला श्रमरुपी समसंख्येने भागले असता यशाचे वर्गमूळ मिळते’ आणि ‘प्रयत्नांच्या वर्गसंख्येवर दैवाचा घातांक असतो’ असे गणिती सुविचार लिहून ठेवले होते. (बाकी पेपर स्वच्छ कोरा होता.) तो पाहून गणिताच्या मास्तरांनी ‘लौकर उजवा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल’, असा निरोप घरच्यांना पाठवलान! जाऊ दे.

नाशिकला मांडवात उपस्थित राहू इच्छिणाऱ्या लेखकांची भाऊगर्दी उसळू नये, म्हणून यंदा चक्क प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, आणि त्यात एक पन्नास मार्कांचा गणिताचा पेपरही ठेवावा, अशी सूचना कुणीतरी केल्याचं कळतं. केवढी भयंकर सूचना नं? अंगावर्काटाच आला!...अशानं त्या मांडवात सामसूम पसरेल, हे कोणाला कळतेय का? ‘आमचा बंटी कविता किती छॉन करतो’ हे कौतिक वाट्याला आलेलाच पुढे कौतिकराव होतो, हे साऱ्यांनी लक्षात ठेवावे. कारण कविता करणाऱ्या बंटीला गणिताच्या पेपरात नेहमी भोपळा मिळत आला आहे, हे कंसातील वाक्‍य कुणी उच्चारत नसते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ललित साहित्य हे एक प्रकारचे गणितच असते, आणि त्यात नात्यागोत्यांमधली रसायने, भौतिक जगातील ताणेबाणे, आणि चिक्कार प्रमाणात जीवशास्त्र किंवा शरीरशास्त्र असते. त्या अर्थाने पाहू गेल्यास साहित्य व्यवहार हा वैज्ञानिकच असल्याचे कुणालाही पटावे. ते तसे असले तरी तारतम्यही हवंच हं! मराठीच्या अंगणात गेली अनेक युगे सळसळणाऱ्या सोन्याच्या पिंपळात क्‍लोरोफिल किती? याचे उत्तर शोधण्यासाठी काही साहित्यिक कामाला लागू नयेत, म्हंजे मिळवली!
जरा कान इकडे करा, एक गंमत सांगत्ये!

परवाचीच गोष्ट. ठाण्याच्या गोखले रोडवर मी हेअरपिना आणायला गेले होत्ये. तेव्हा सहज हिंडताना लक्ष गेले तर एक गृहस्थ (मास्क लावून) दबकत दबकत चालत होते. त्यांना हटकले. ते साक्षात ‘सूर्यकोटी समप्रभ’ अणुवैज्ञानिक डॉ. अनिलराव काकोडकर निघाले!

‘काकोडकरसर अभिनंदन, तुमच्या चरित्राला राज्य पुरस्कार मिळाला!’’ म्हणाल्ये. ते प्राणांतिक दचकले. जणू काही पोखरणला गपचूप अणुस्फोट करताना ‘‘काय अनिलराव, अणुस्फोटाचा बेत वाटतंऽऽ...’’ असेच कुणीतरी छेडलेन! मास्क आडून ‘थॅंक्‍यू’ म्हणाले की ‘चूप बसा’ म्हणाले हे कळलं नाही. (एक लाखाचा भरभक्कम पुरस्कार हे कारण असणार! हल्ली मराठी लेखक लाखाच्याच गोष्टी करायला लागले!)

‘यंदा नारळीकरांना अध्यक्षपद मिळालंय, माहितीये ना?’’ म्हटले. त्यावर त्यांनी मान डोलावलीन. मग मी म्हटलं, ‘‘हल्ली शास्त्रज्ञलोकांची चलती आहे, पुढल्या संमेलनासाठी तुम्ही तयार रहा, कसं?’’
...त्यावर ते घाईघाईने अदृश्‍यच झाले. असे साहित्य नि असे शास्त्रज्ञ... आणि असे आमचे साहित्यिक शास्त्रज्ञ!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com