esakal | ढिंग टांग :  लसीचे अभंग! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhing-tang

तुझ्यावीण आता । न चाले काही मात्रा। 
वाढतसे खतरा। दिसामाजी।। 

रडलो भेकलो। धावलो पडलो । 
व्यर्थचि शिणलो। तुझ्यासाठी।। 

ढिंग टांग :  लसीचे अभंग! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

माझ्यासम मीच। आहे देवलसी। 
जवळ गे मसी। घेई माये।। 

ये गे ये गे बाई। बोलवेना काई। 
तुझ्याविना नाई। सुटका गे।। 

तुझ्यावीण आता । न चाले काही मात्रा। 
वाढतसे खतरा। दिसामाजी।। 

रडलो भेकलो। धावलो पडलो । 
व्यर्थचि शिणलो। तुझ्यासाठी।। 

म्हणतात सारे। लस ती येणार। 
अज्जी टुचणार। देहातचि।। 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

लस येताक्षणी। सारे सस्य शामल। 
विश्व हे नॉर्मल। होईल की।। 

येणार येणार। बैसलो घोकत। 
दुखणे विकत । घेतले म्या ।। 

वैद्य, शास्त्रवेत्ते। विश्व तुझ्यामागे। 
धावे वेगेवेगे। वर्तुळात।। 

कोण म्हणे पृथ्वी। फिरे निरंतर। 
केंद्री दिनकर। अव्याहत।। 

डळमळे आता । सूर्याचे आसन । 
केंद्री गा व्हॅक्‍सिन । ब्रह्मांडाच्या ।। 

छळितो विषाणू। झालो धरणीठाय । 
आठवली माय। किती वेळा ।। 

कितीदा करु म्या । लसीची प्रार्थना । 
निव्वळ वंचना । साहवेना ।। 

किती पाहू वाट । जीव वेडापिसा। 
सुकलाचि घसा। प्रार्थनेने।। 

वाट पाहोनिया। थकली नजर। 
जीव हा बेजार। खंगलेला।। 

बसलो गुमान । एक नाही दोन। 
विश्व लॉकडाऊन। झाले झाले।। 

सुनसान गल्ली। सारा शुकशुकाट। 
नरपती नाट। लागला हो।। 

बैसोनी बैसोनी । बुडाला वारुळ। 
उपटली मूळ। व्याधी येथ।। 

महाजने वदती। बसा घरी बसा। 
नाही तर ठोसा। देईन म्या।। 

कंटाळा कंटाळा। कंटाळ्याचा वीट। 
जीव कंपलीट। लोळागोळा।। 

आता नको पाहूं। आमुची परीक्षा। 
पुरे झाली शिक्षा। थांबवी गे।। 

आत्ताचिया आत्ता। होसी तू प्रकट। 
कोविड कटकट। नष्ट करी।। 

अजूनही आहे। प्राक्तनाचे बाकी। 
आम्हा थोडे लक़्की। ठरीव ना।। 

लस येताक्षणी। फेडीन मी पांग। 
मुमुक्षुंची रांग। थोर आहे।। 

नंदी म्हणे आम्हा । जगण्याचा सोस । 
टोचा आम्हा लस। एकदाची।।