esakal | ढिंग टांग : पुष्पवृष्टी!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : पुष्पवृष्टी!

अभिनंदन तरी कशाला? (भावविवश होत) संपूर्ण देश आणि माझा लाडका महाराष्ट्र आज संकटातून जातोय! ही का अभिनंदनाची वेळ आहे? ही का आइसक्रीम खाण्याची वेळ आहे? उलट रोज गरम पाणी प्या असं सांगतोय मी लोकांना! 

ढिंग टांग : पुष्पवृष्टी!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

चि. विक्रमादित्य : (नेहमीप्रमाणे खोलीचे दार ढकलत) हाय देअर, बॅब्स…मे आय कम इन? 

उधोजीसाहेब : (हुकमी सुरात) नोप! तोंडाला मास्क लावलेल्याशिवाय येथे प्रवेश नाही! (कळवळून) आपण उद्या बोललेलं नाही का चालणार? 

विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्याने) नोप! हॅप्पी महाराष्ट्रा डे!! ऑन दि ऑस्पिशस अकेजन ऑफ महाराष्ट्रा डे, आय विश यु मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे! आणि हो…माय हार्टिएस्ट काँग्रॅच्युलेशन्स!! 

उधोजीसाहेब : (अगदी खचून जात) महाराष्ट्र दिन म्हण रे! आणि महाराष्ट्र दिन उलटून आता दोन दिवस होऊन गेले आहेत! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विक्रमादित्य : (च्याट पडत) क्काय? मग मला कुणी कसं सांगितलं नाही? आज सकाळी डोक्यावरून विमानं गेली, तेव्हा मला वाटलं की- 

उधोजीसाहेब : (नाक मुरडत) तो वेगळा टास्क होता! त्याचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही! 

विक्रमादित्य : (हेका न सोडता) ठीक! तसं तर तसं! तरीही तुमचं हार्दिक अभिनंदन!! तुम्ही आता माझ्यासारखे फुलटाइम आमदार होणार!! लॉकडाऊन नसता तर आज आपण आइस्क्रीम आणून खाल्लं असतं! हल्ली साधा कुल्फीवाला दारात येत नाही! कधी उठणार हा लॉकडाऊन बॅब्स? छ्‍या!! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उधोजीसाहेब : (शिकवणीच्या मास्तरागत) अभिनंदन तरी कशाला? (भावविवश होत) संपूर्ण देश आणि माझा लाडका महाराष्ट्र आज संकटातून जातोय! ही का अभिनंदनाची वेळ आहे? ही का आइसक्रीम खाण्याची वेळ आहे? उलट रोज गरम पाणी प्या असं सांगतोय मी लोकांना! या कठीण काळात आपण सर्वांनी मिळून निकराची लढाई लढून माझ्या महाराष्ट्राभोवती पडलेला आइस्क्रीमचा वेढा…सॉरी…कोरोनाचा विळखा सोडवला पाहिजे! आजच्या पवित्र दिवशी आपण सारे संकल्प करू या… 

विक्रमादित्य : (कुतुहलाने) कुठला बॅब्स? 

उधोजीसाहेब : (निर्धाराने मूठ आवळत) आपण सारे लावू मास्क, महाराष्ट्राचा एकच टास्क!! (दातओठ खात) विमानं कसली उडवताय? 

विक्रमादित्य : (अत्यानंदाने) वॉव! व्हाट्टे लव्हली पोयम! 

उधोजीसाहेब : (पुन्हा कळवळून) घोषणा रे…पोयम नाही तुझी! 

विक्रमादित्य : (विषय बदलून) तेच ते! टास्कवरुन आठवलं! तुम्ही नमोअंकलना फोन केला होता ना परवा? 

उधोजीसाहेब : (घाईघाईने) हळू…हळू बोल ना!! ऐकेल कुणी! हो, केला होता! माझ्या महाराष्ट्रासाठी करावा लागला! माझ्या महाराष्ट्राचं भविष्य धोक्यात आलं होतं! 

विक्रमादित्य : (निरागसपणे) महाराष्ट्राचं की तुमच्या आमदारकीचं, बॅब्स? 

उधोजीसाहेब : (संयम बाळगून) एकूण एकच! तू आता इथून जा बघू! मला खूप कामं आहेत! फेसबुकवर जाऊन महाराष्ट्राला संदेश द्यायचा आहे! सॅनिटायझरनं हात चोळून कोरोनाच्या मागे लागायचं आहे! 

विक्रमादित्य : (सपशेल दुर्लक्ष करत ) काय म्हणाले हो नमोअंकल? 

उधोजीसाहेब : (सारवासारव करत) काही नाही एवढं! ते म्हणाले की ‘लडाई बहोत लंबी है, यह लंबी लडाई लडने के लिए तुम्हे सामर्थ्य मिले, ऐसी शत शत शुभकामनाएं…’ 

विक्रमादित्य : (गोंधळून) कुठली लंबी लडाई? इथे तर आपण सगळे घरात बसून आहोत! 

उधोजीसाहेब : (प्रचंड संयम राखत) ही लढाई घरात बसूनच लढायची आहे, हे मी आत्तापर्यंत दोनशे तेवीस वेळा सांगितलं आहे! 

विक्रमादित्य : (बोट रोखत) खुर्ची वाचवण्यासाठी नमोअंकलना फोन केला होता तुम्ही…खरं की नाही? आँ? 

उधोजीसाहेब : (गोरेमोरे होत्साते) झूठ…सपशेल झूठ! खुर्चीचा मला काडीमात्र मोह नाही! 

विक्रमादित्य : (डोळे मिचकावत) मघाशी विमानं उडाली, तेव्हा अंगणात जाऊन का उभे राहिला होता मग? आँ?