ढिंग टांग : अनलॉककथा!

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 3 जुलै 2020

पोटकुलुपाचे दार ही अत्यंत घातक वस्तु आहे, हा वैधानिक इशारा आम्ही प्रारंभी देऊन ठेवला आहेच. परंतु, काही लोक आपल्या घराच्या दारांना ही असली कुलुपे आवर्जून बसवून घेतात, आणि अनवस्थाप्रसंग ओढवून घेतात.

वाचकहो, तुमच्या घराच्या दारास पोटकुलुप आहे का? तेच त्याला इंग्रजी भाषेत "लॅच' असे म्हणतात तेच! ते असेल तर कृपा करुन तात्काळ काढून टाका. कां की या पोटकुलुपाइतके अवसानघातकी असे या जगात काहीच नाही. ज्या दारांना नुसताच कडी कोयंडा असतो ती दारे ही आगमनासाठी आणि बहिर्गमनासाठीही अत्यंत सोयीची असतात. लॅचचे तसे नव्हे. 

पोटकुलुपाचे दार ही अत्यंत घातक वस्तु आहे, हा वैधानिक इशारा आम्ही प्रारंभी देऊन ठेवला आहेच. परंतु, काही लोक आपल्या घराच्या दारांना ही असली कुलुपे आवर्जून बसवून घेतात, आणि अनवस्थाप्रसंग ओढवून घेतात. आता आमचेच पहा ना! जोवर घरमालक (पक्षी : तुम्ही) घरात असतो, तोवर ते कुलुप निरुपद्रवी आणि आधुनिक असते. परंतु, वेळ काही सांगून येत नाही. काही वेळा घरमालकाने आंघोळीला निघण्यासाठी (राजापुरी) पंचा कमरेला गुंडाळावा, आणि तेव्हाच नेमकी दाराची घंटी वाजवून रद्दीवाला उभा राहावा, अशी विपदा येते. अशावेळी "बाद में आना' असे त्यास (उघड्याबंबावस्थेत) तावातावाने सांगत असतानाच मागील बाजूस राहिलेले घराचे दार धाडदिशी बंद होऊन घरमालकाची (पक्षी : तुमची) गोची व्हावी, असे काहीचिया बाही होते. आमचे डिट्टो अस्सेच झाले आहे! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

तूर्त आम्ही घराच्या दाराबाहेर कुलुप चाचपीत राजापुरी पंचावस्थेत उभे आहो! हे पोटकुलपाचे कोडे उकलण्यासाठी जंग जंग पछाडत आहो! उघडेल तर शपथ!! साधी कडीकोयंडा असलेले कुलुप घातले असते तरी बिघडले नसते, पण जाऊ दे. आता पस्तावून काय उपयोग? खिडकीतून काठी घालून कडी ढकलता येते, पण पोटकुलुप उघडता येत नाही. स्टुलावर चढून दारावरील शटरमधून काठी ढकलून आतून बसलेली कडी काढण्याइतके पोटकुलुप उघडणे प्रयत्नसाध्य नाही. काय क्रावे? 

"तिळा उघड" असेही मनातल्या मनात तीन वेळा बोलून पाहिले. दार काही उघडले नाही. कोपऱ्यावर एक चावीवाला बसतो, त्यास बोलावण्यास जावे तरी कसे? तो तरी तेथे अजुनी चाव्यांचे जुडगे घेऊन बसला असेल का? पोटकुलुपाचा शोध लावणाऱ्या इसमाचा शोध कसा घ्यावा? तो लागल्यास त्याला नेमकी किती पायताणे मारावीत? आदी शेकडो प्रश्न आमच्या मनात येऊन गेले आहेत. "ना घरका ना घाटका' अशी आमची अवस्था झाली आहे. 

दाराबाहेर (राजापुरी पंचावस्थेत) अडकून पडलेल्या घरमालकाच्या चेहऱ्यावर घराबाहेर काढलेल्या वाभऱ्या मांजराची अवकळा येते. पंचात गुंडाळलेले अंग वगळता उर्वरित देह कोठे लपवावा, असे वाटू लागते. "धरणीमाते, पोटात घे' असे हंबर्डा फोडून म्हणावे, अशी ही अवस्था. ती शत्रूवर देखील येऊ नये!! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माणसे घराला कुलुप का लावतात? चोरांचे फावू नये म्हणून हे त्याचे सोपे उत्तर आहे. काही काही सावध मनुष्ये पोटकुलपाची चावी तीनतीनदा पिळून दार बंद करतात. वर कडीलाही एक लठ्ठसे कुलुप लावतात. आमचे तसे नव्हते. चोरांनी नव्हे तर चोरांस अटकाव करणाऱ्या कुलपाने हैराण करावे, हा प्रकार पहिल्यांदाच घडला. पोटकुलुपाच्या छिद्राकडे पाहात आम्ही दारातच उघड्याबंबावस्थेत बसून आहो. कुलुपाकडे बघून आमच्या लक्षात आले. अरे, ही तर साऱ्या विश्वाची, देशाची, राज्याची, गावाची आणि आपल्या गल्लीची अवस्था आहे. आयुष्य सापशिडीसारखे झाले आहे. अनलॉक करायची वेळ झाली की साप पुन्हा उचलून लॉकडाऊनच्या जुन्या जागेवर आणून ठेवतो आहे. इकडे दार, तिकडे कुलुप! चालायचेच. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article  about unlock