ढिंग टांग : पायपीट

ब्रिटिश नंदी
सोमवार, 11 मे 2020

डावे पाऊल आहे सोबत 
उजवे पडते त्याचसवे 
उजवे आहे, म्हणून डावे 
पुढे ढकलते रातदिवे 
अरे कबीरा, प्रिय विणकरा 
तुला न कळले वस्त्र नि वीण 
तुला न कळलेगुह्य भुकेचे 
पायपीटीचा व्यर्थचि शीण

प्रपंच फुंकुनि कुणि निघाला 
प्राक्तन ओझे घेऊनि माथी 
पुढ्यात कोणी कबीर नाही, 
नाही त्याच्या हाति लुकाठी 

अनिकेतांचे जथे निघाले 
सोडुनि सारे मागे निर्मम 
सुखदु:खाचे देणेघेणे 
हिशेब सारा स्थावर जंगम 

अरे विणकरा, अम्ही अडाणी 
अम्हास काही कळतचि नाई 
कसे कळावे नश्वर-ईश्वर, 
अद्वैताची नवी बुनाई 
निष्प्राणांचा कळप निघाला 
दूर राहिला पाणवठा 
पाठ वळवुनी सूर्य पळाला 
उपरा झाला उंबरठा 

अरे कबीरा, उभा तिथे तू, 
जथा निघाला पहा इथे 
फुकाच रचिले तुवाच दोहे 
सांगून गेली दिवाभिते 

मजल्दर्मजल चालत येते 
अंगावरती उजाड गाव 
इथे न वस्ती माणुसकीची 
अप्पलपोटी तिचीच हाव 

नको कबीरा, नकोच राहू 
उभा, उन्हाच्या तीव्र झळा 
उजाड गावे, बकाल बस्त्या, 
पहाल तेथे मरणकळा 

डावे पाऊल आहे सोबत 
उजवे पडते त्याचसवे 
उजवे आहे, म्हणून डावे 
पुढे ढकलते रातदिवे 

अरे कबीरा, प्रिय विणकरा 
तुला न कळले वस्त्र नि वीण 
तुला न कळले गुह्य भुकेचे 
पायपीटीचा व्यर्थचि शीण 

मसणवटीचे भोग भोगिता 
कुणा न स्मरतो परमात्मा 
माती असशी मातीत मिळशी 
पुटपुटतो गा मम आत्मा 

फिरत गरारा निघती चक्रे 
फितुर रुळांवर अन उद्दाम 
दुर्बळ भेकड कुणी झोपले 
जन्ममृत्यूचा तुटे लगाम 

कबीर भोळा, संत बिचारा 
उभाच अन मागे राहील! 
कुणी तयाला सांगा बंधो, 
जथ्यामध्ये हो सामील! 

-ब्रिटिश नंदी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: