esakal | ढिंग टांग :  बाबाजी की दवाई! 

बोलून बातमी शोधा

baba-ramdev

पू. बाबाजींना कोण ओळखत नाही? त्यांचा महिमा थोर आहे.  वयाच्या एकशे एक्केचाळिसाव्या वर्षी ते रोज एकवीस मैल पळतात.  जेवढा वेळ आपण सारे शवासन करतो, तितका वेळ ते मयुरासनात असतात.  

ढिंग टांग :  बाबाजी की दवाई! 
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

योगगुरुपद्म प्रात:स्मरणीय पूज्य हठयोगी बाबाजींना आमचे त्रिवार वंदन असो! कां की, पू. बाबाजींसारखा देवदूत आम्हा मर्त्य य:कश्‍चित मनुष्यप्राण्यांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठीच तर अवतरला आहे. आम्ही स्वत: त्यांचे अनुग्रहित आहो! 

पू. बाबाजींना कोण ओळखत नाही? त्यांचा महिमा थोर आहे. वयाच्या एकशे एक्केचाळिसाव्या वर्षी ते रोज एकवीस मैल पळतात. जेवढा वेळ आपण सारे शवासन करतो, तितका वेळ ते मयुरासनात असतात. मयुरासन माहितीये ना? दोन्ही हातांवर आडवे शरीर तोलायचे...स्वत:चे!! पू. बाबाजी हिमालयात राहतात. तेथेच योगसाधना करतात व फावल्या वेळात हिमाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात संजीवक जडीबुटी शोधतात. रामायणातील सुप्रसिद्ध संजीवनी मुळी त्यांनीच पुन्हा शोधून काढली. हिमालयात हिंडत असताना अचानक त्यांना ती दिव्य वनस्पती दिसली! ती मुळी उपटून पेशंटकडे नेण्याऐवजी आपण हिमालयच उचलून पेशंटकडे न्यावा, असे त्यांच्या भारी मनात होते; पण सरकारने तेव्हाही परवानगी नाकारलीन! नतद्रष्ट मेले!! 

हिमालयात राहूनही त्यांनी कधी अंगात स्वेटर चढवला नाही, यात सारे आले! सांगा, कुणी पाहिले आहे त्यांना स्वेटर घातलेल्या अवस्थेत? स्वेटर सोडा, त्यांनी आजवर अनेक टोप्या घातल्या असल्या तरी कानटोपी कधी घातली नाही. नाहीतर आपण! जरा कुठे नव्हेंबर उजाडला की छत्री मिटून स्वेटर कपाटातून काढतो. कानटोपी चढवतो. पू. बाबाजींच्या कृपेने पुण्यातदेखील काही अनुग्रहित अनुयायी हल्ली उघडेबंब बसू लागले आहेत. लॉकडाउनमध्ये माणसांना कपडे चढवण्याची काही सोयच उरलेली नाही, असे कोणी म्हणेल. पण ते काही खरे नव्हे. ही किमया पू. बाबाजींची!! 

इतकी वर्षे ते योगशिबिरे आयोजित करून मर्त्य मानवांना आरोग्यसंपदा बहाल करीत आहेत. अगणित रोग्यांचे रूपांतर चक्क योग्यांमध्ये करीत आहेत. आता आमचेच पाहा ना, प्राचीनकाळी आमचा डावा गुडघा प्रचंड दुखत होता. मांडी घालून बसणे जिकिरीचे झालेच, पण अन्य कुठल्याही जीवनावश्‍यक पोझिशनमध्ये बसणे अशक्‍य होऊन बसले. पू. बाबाजींच्या योगशिबिरात हजेरी लावली. त्यांनी दिलेली दिव्य औषधे सेवन केली, आज आम्ही शिताफीने पळू शकतो! लॉकडाउनच्या काळात आम्ही कित्येकदा पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या आहेत, हा त्याचा पुरावाच नव्हे काय? 

हे सारे शक्‍य झाले ते बाबाजींच्या योगसामर्थ्यामुळेच होय! 

पण अहह!! दैवदुर्विलास पाहा, आज याच आयुर्वेदाच्या मायभूमीत अज्ञ जनलोक पू. बाबाजींना नावे ठेवीत आहेत. कोरोना विषाणूचा नायनाट करणारे औषध त्यांनी चांगले घोटून घोटून सिद्ध केले. त्याबद्दल त्यांना वंदन करावयाचे सोडून जनलोक निंदत आहेत. याला काय म्हणावे? अज्ञान की अहंकार की राजकारण? 

जी गोष्ट साधा साबण हाताला लावल्याने नष्ट होते, त्या कोरोना गोष्टीच्या पारिपत्यासाठी आजवर कोणालाही औषध शोधता आलेले नाही, हेच मुदलात आम्हाला संशयास्पद वाटते. पू. बाबाजींनी औषध शोधले तर त्यालाही नाके मुरडणे चालले आहे. हे सर्वथा गैर आहे. 

सात्त्विक संताप व्यक्त करून पाठिंबा जाहीर करण्यासाठी आम्ही पू. बाबाजींना अणिमा शक्तीने भेटलो. म्हणालो : वंद्य बाबाजी, औषध काय आणि विष काय हेच या अज्ञ लोकांना समजत नाही. आपण त्यांस क्षमा करावी! ते कधी बरे होतील?'' 

त्यावर हसत हसत पोटाची खोळ हलवत ते म्हणाले, ""बालक, पेट साफ तो तबियत साफ!''