esakal | ढिंग टांग : बिहारी बचनपूर्ती!
sakal

बोलून बातमी शोधा

devendra

आमचे बिहारातील सज्जन नेते सुशीलजी मोदी हे चेहरा पाडून बसले होते. शब्द पाळण्याच्या भानगडीत त्यांचे उपमुख्यमंत्रीपद गेले. आपले आडनाव पाहून आपल्याला मंत्रिमंडळात ठेवतील, असा त्यांचा गैरसमज झाला असावा.

ढिंग टांग : बिहारी बचनपूर्ती!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके १९४२ कार्तिक शु. तृतीया. आजचा वार : ट्यूसडेवार.

आजचा सुविचार : रघुकुल रीत सदा चली आई... प्राण जाई पर बचन न जाई!
....
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (रोज १०८ वेळा लिहिणे. लक्ष पुरा करणे आहे.)

कालच बिहारहून परत आलो. अतिशय समाधान वाटते आहे. ठरले होते, तस्से सारे काही घडले. आमचे परममित्र श्री. नितीशबाबू यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून डोळ्यात पाणी आले! ‘याजसाठी केला होता अट्टहास’ अशा भावना दाटून आल्या. शेजारी आमचे श्रीमान नड्डाजी बसले होते. त्यांनी पाठीवर हात ठेवून माझे सांत्वन केले. ‘दिल छोटा ना करो! आपका काम भी हो जाएगा. महाराष्ट्र की जनता सब देख रही है,’ असे ते म्हणाले. मी कसनुसे हसलो.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डोळ्यात पाणी आले ते नितीशबाबूंनी शपथ घेतली म्हणून नव्हे! आम्ही शब्द पाळला, याखातर ढाळलेले ते आनंदाश्रू होते. होय, आम्ही शब्द पाळला, पाळला, पाळला!!

मा. नितीशबाबूंनाही आम्ही (बंद खोलीत) शब्द दिला होता. तो पाळला! महाराष्ट्रात असा काही शब्दच दिला नव्हता तर पाळणार कसा? महाराष्ट्रातही आम्ही भरीव यश मिळवले होते. पण विश्वासघातापुढे काय कोणाचे चालते? सर्वाधिक आमदारांचा पक्ष म्हणून आम्ही जिंकलो, पण काय उपयोग झाला? सरळ स्वभावाच्या (नागपुरी) माणसाला हे असेच भोगावे लागते. जाऊ दे! आता तोच तोच कोळसा उगाळण्यात काही अर्थ नाही.

महाराष्ट्रातील जनतेला आता ओरडून हे सांगणार आहे.- ‘‘माझ्या मराठी बंधूंनो, भगिनींनो, आणि मातांनो, हा घ्या पुरावा! आम्ही शब्द पाळणारी माणसे आहोत, हे बघायचे असेल तर बिहारकडे बघा! तिथे आमच्या सत्यवचनाचे स्मारक उभे राहिले आहे. बघा, बघा! स्मारके काय फक्त जयंत्या-पुण्यतिथ्यांसाठी नसतात! सत्यासाठीही असतात.’’ (हे वाक्‍य बरे जमले आहे. पुढल्या भाषणात वापरावे का? असो.)

मा. नितीशबाबूंच्या शपथविधीसाठी मी ऐन दिवाळीत पाटण्याला गेलो. खरी दिवाळी तेथेच होती. नाही का? आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या यशातच दिवाळी साजरी झाल्यासारखे वाटते. बिहारच्या निवडणुकीत पक्षाने मला प्रभारी म्हणून नेमले होते. त्यामुळे शपथविधीच्या वेळेला लोक माझेच अभिनंदन करीत होते. बिहारमधल्या पक्षाच्या यशाचे श्रेय प्रभारी देवेंद्रजींना जाते, असे जेव्हा नड्डाजी म्हणाले तेव्हा भरुन पावले. मी त्यांना एक आख्खा लाडू खिलवला. त्यांनी मला अर्धा लाडू खिलवला. मा. नितीशबाबूंना मी लाडू खायला दिला तर नाक मुरडून म्हणाले, ‘नको!’ मी म्हटले, ‘‘खावाच लागेल!’’ त्यांनी त्रिफळा चूर्ण घेतल्यागत चेहरा करुन लाडू खाल्ला!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आमचे बिहारातील सज्जन नेते सुशीलजी मोदी हे चेहरा पाडून बसले होते. शब्द पाळण्याच्या भानगडीत त्यांचे उपमुख्यमंत्रीपद गेले. आपले आडनाव पाहून आपल्याला मंत्रिमंडळात ठेवतील, असा त्यांचा गैरसमज झाला असावा. त्यांनाही लाडू दिला, तर त्यांना हुंदकाच आला! जाऊ देत. सुक्‍याबरोबर थोडे ओलेही जळायचेच.

नितीशबाबूंनी शपथ घेतल्यानंतर माझ्याकडे बघून मान किंचित हलवली. बहुधा मनातल्या मनात थॅंक यू म्हणाले असावेत! पुढल्या वेळेला महाराष्ट्रात शपथविधीला त्यांना
बोलावण्याचे मी मनातल्या मनात ठरवून टाकले आहे.

...‘मी पुन्हा येईन’ असे मागे म्हटले होते. मी पुन्हा आलो, पण बिहारात! हा दैवाचा खेळ निराळा!!