ढिंग टांग :  केवळ माझा सह्यकडा!

ब्रिटिश नंदी
Tuesday, 28 July 2020

तिचा पूर्वार्ध काल आपण वाचला. उत्तरार्ध बाकी होता, कारण ही मुलाखत दोन दिवस चालली. उत्तरार्धदेखील पूर्वार्धाइतकाच दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत होता, हे वेगळे काय सांगायचे? वाचा : 

साठीत पदार्पण करणाऱ्या आमच्या प्रचंड लाडक्‍या, लोकप्रिय आणि यशस्वी मा. साहेबांची आम्ही जबरदस्त आणि ऐतिहासिक मुलाखत घेतली. तिचा पूर्वार्ध काल आपण वाचला. उत्तरार्ध बाकी होता, कारण ही मुलाखत दोन दिवस चालली. उत्तरार्धदेखील पूर्वार्धाइतकाच दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत होता, हे वेगळे काय सांगायचे? वाचा : 

आम्ही : (मुजरा करत) साहेबांचा त्रिवार विजय असो! उत्तरार्धाच्या सुरवातीला पुन्हा एकवार वाढदिवसाच्या शुभेच्छा! 

साहेब : (गांभीर्याने) त्याऐवजी रक्तदान केलं असतंत तर बरं झालं असतं! पण थॅंक्‍यू! पुढे बोला!!

आम्ही : केक कापणार आहात का आज?

साहेब : (सत्त्वशील सुरात) नेक माणूस केक कापत नसतो!

आम्ही : (मनातल्या मनात ) म्हंजे आमचा चान्स गेला! (उघडपणे) बरं, एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर हवंय!

साहेब : महत्त्वाचे प्रश्न विचारलेत तर उत्तर मिळेल!

आम्ही : (बारीक डोळे करून) मुंबईत वडापाव कधी मिळणार, ते सांगा!

साहेब : मिळेल मिळेल! तारखेकडे लक्ष ठेवा!!

आम्ही : (खुर्चीत आरामात रेलत) सध्या तुम्ही रात्रंदिवस घरात बसून काम करताय असं ऐकतो!

साहेब : (खवळून) तुमच्यासारखे लोक आरामशीर बसून गप्पा हाणायला लागल्यावर आम्हाला काम करावं लागणारच!

आम्ही : (सावरून बसत) ऑगस्ट-सप्टेंबरनंतर आपलं सरकार पाडणार असं विरोधक कुजबुजताहेत!

साहेब : (खांदे उडवत) आम्ही तरी ऐकलं नाही! तुम्हीच एकटे कुजबुजत असाल!

आम्ही : (काडी घालत) विरोधकांना पोटदुखी झाली आहे! त्यांच्या पोटातली ही खदखद आहे!

साहेब : (खंबीरपणे) विरोधकांच्या पोटात खदखदत असेल, नाहीतर गुरगुरत असेल! आपल्याला काय त्याचं? त्यांना म्हणावं, हिंग्वाष्टक चूर्ण खा!! 

आम्ही :  तुमची तीनचाकी रिक्षा आहे म्हणे?

साहेब : (ठणकावून सांगत) आहेच! पण स्टिअरिंग माझ्या हातात आहे! बाकी दोघे पाशिंजर मागे बसलेत! सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत आमचं चांगलं चाललं आहे! काय म्हणणं आहे?

आम्ही : रिक्षाला हॅंडल असतं...स्टिअरिंग नसतं!

साहेब : (उडवून लावत) तेच ते! त्यांना म्हणावं, हिंमत असेल तर आत्ताच्या आत्ता आमचं सरकार पाडा! पाडा, पाडा ना! बघता काय असे भूत बघितल्यागत? पाडा की! किंबहुना पाडाच! हा मी इथे असा बसलोय! पाडा माझ्यासमोर! बोला, पाडताय का? पाडा, पाडा! 

आम्ही : तुम्ही भारतातले सर्वात लोकप्रिय, लाडके आणि यशस्वी मुख्यमंत्री आहात! ‘डब्लूएचो’नं आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं तुमचं कौतुक केलं आहे! उत्तम प्रशासक, प्रगल्भ राजकारणी, अभ्यासू नेतृत्त्व आणि आरोग्यविषयक ज्ञान यासाठी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत!

साहेब : (काहीसे लाजत) हल्ली परीक्षा रद्द झाल्या आहेत म्हणून! झाल्या असत्या तरी पहिलाच आलो असतो!

आम्ही : (स्तुतीसुमनं उधळत) ‘भव्य हिमालय तुमचा-अमुचा, केवळ माझा सह्यकडा! गौरीशंकर उभ्या जगाचा मनात पूजीन रायगडा!’...साहेब, तुम्ही सह्याद्रीचा कडा आहात कडा! साठीच्या उंबरठ्यावर तुम्ही हिमालयात जावं, असं आम्ही नम्रपणे सुचवीत आहो! 

साहेब : (संतापदग्ध नजरेने दात ओठ खात) आम्हाला हिमालयात पाठवताय? कोण आहे रे तिकडे? गिरफ्तार करा या हरामखोराला!

...इथे मुलाखत संपली. तोंडाला मास्क आणि पाठीला पलिस्तर अशा अवस्थेत झोपून आहो! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article about birthday