esakal | ढिंग टांग : चिन्यांना चाप!

बोलून बातमी शोधा

china--59-app

जरा डोळा लागला की चिनी शिपुरडा हातात नानचाकू घेऊन चाल करून येत असल्याचे स्वप्न पडून आम्ही जागे होत असू. खरे तर कुठल्याही चिनी शिपुरड्याला आमच्या कोल्हापुरी पायताणाचा एकच दणका पुरेसा आहे.  

ढिंग टांग : चिन्यांना चाप!
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

हृदय भडकून गेले आहे! मस्तक फिरून गेले आहे! डोळे लालंलाल झाले आहेत! आमच्या या उग्र अवतारापुढे मिनिटभर उभे राहणेही आरोग्यास अपायकारक आहे, हा वैधानिक इशारा आम्ही आधीच (चिन्यांना) देऊन ठेवतो. लडाखच्या सीमेवर या चिन्यांनी केलेली आगळीक आमच्या उग्रावताराला कारणीभूत आहे, हे वेगळे सांगायला नको. या घटकेला देशात चिन्यांच्या चावटपणाला चाप लावण्यासाठी चिक्कार चिडखोर चेवात आले आहेत. आम्हीही त्यापैकी एक आहोत. खरेतर ‘चिन्यांची चीची’ या मथळ्याचा एक स्फोटक लेख लिहून त्यात चकाराने सुरू होणारी वाक्‍येच्या वाक्‍ये लिहून काढावीत, असे मनात आले होते. गेलाबाजार ‘च’च्या सांकेतिक भाषेत (चम्हाला तु चमजतेस ‘च’ची चषाभा? चआँ?चंगासा, चंगासा!! ) गोपनीय संदेशांची देवाणघेवाण करून महत्त्वाची माहिती चिन्यांकडून पळवावी, असाही आमचा चतबे होता. पण चहूनरा चलेगे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

एक ना एक दिवस हे चिनी अवघ्या जगाला गोत्यात आणणार, हे आम्ही १९६२ सालापासून सांगत आलो आहो. पण आमचे ऐकतो कोण? जो तो ‘हिंदी-चिनी भाई भाई’चा पुकारा करतो आहे. बाजारात कुठलीही वस्तू विकत घ्यायला गेले तर चारपैकी तीन वस्तू चिनी बनावटीच्या आढळून येतात. या चिन्यांनी अवघ्या जगाला नाकीनऊ आणले आहे. त्यांचे नाक कापले जाण्याची काही सोयच उरली नाही. ज्यांना नाकेच नाहीत, ती कापली कशी जाणार? म्हणूनच आज चिन्यांचे नाक वर आहे. ते कापण्यासाठी आम्ही नुसतेच सज्ज नव्हे, तर सुसज्ज झालो आहो.

चिन्यांनी काही नतद्रष्टपणा केल्याची खबर लागताच आम्ही सर्वप्रथम सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली. म्हटले, लॉकडाउनमध्ये हा प्रयत्न करून बघण्याचे राहूनच जात होते. चिन्यांना धडा शिकवण्यासाठी तब्बेत सांभाळणे अधिक गरजेचे आहे! पहिल्याच दिवशी आम्ही सलग तीन सूर्यनमस्कार घातले. नंतरचा आठवडा अंग दुखत असल्याने व्यायामाचा अतिरेक टाळला, इतकेच. सूर्यनमस्कारापेक्षा कुंगफू कराटे शिकून घ्यावे आणि चिन्यांना चिन्यांच्याच शस्त्राने हाणावे, असाही एक जबर्दस्त प्लॅन होता. पण ‘कुंगफू कराटे’ हा युद्धप्रकार चिनी नसून जपानी असल्याचे कुणीतरी सांगितल्याने तो बेत आम्ही रद्द केला. तथापि, कुंगफू कराटे हे प्रकरण चिनीच असावे, असा दाट संशय आम्हाला आहे. पुरेशी माहिती गोळा झाली की आम्ही कामाला लागूच! काही वर्षांपूर्वी आम्ही ब्रूस ली नामक योद्‌ध्याचे चित्रपट बघून ठेवले होते. त्या ब्रूस लीच्या हाती ‘नानचाकू’ नावाचे एक अस्त्र असे.  दोन दांडक्‍यांच्या मधोमध साखळी लावून ते प्रकर्ण गरागरा फिरवून शत्रूला घायाळ करता येते. पण नानचाकूचे ट्रेनिंग घेताना काही अपघात घडल्याने पुढला आणखी आठवडा ड्रेसिंगपट्टीत गेला व ती योजना आम्ही अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर टाकली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय केले म्हंजे चिन्यांना चाप बसेल? या विचाराने आम्हाला रात्र रात्र झोप लागली नाही. जरा डोळा लागला की चिनी शिपुरडा हातात नानचाकू घेऊन चाल करून येत असल्याचे स्वप्न पडून आम्ही जागे होत असू. खरे तर कुठल्याही चिनी शिपुरड्याला आमच्या कोल्हापुरी पायताणाचा एकच दणका पुरेसा आहे. पण पायतले हातात काढण्याइतकी उसंत तर मिळायला हवी! 

...अखेर आम्ही मोबाइल फोन उचलून त्यातील ‘टिकटॉक’ हे चिनी ॲप त्चेषाने डिलीट करून टाकले. म्हटले, आता लेकाचे चीची करत वठणीवर येतील. ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र म्हंटात ते हेच बरे का?