ढिंग टांग :  आईये, बैठिये! 

ढिंग टांग :  आईये, बैठिये! 

बेटा : (नेहमीप्रमाणे स्टायलीत एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक! 

मम्मामॅडम : (निर्विकारपणे) हं! 

बेटा : (गंभीरपणाने) मम्मा, आय हॅव अ सीरियस कंप्लेंट! माझी एक तक्रार आहे!! 

मम्मामॅडम : (निर्विकारपणात भर टाकत) कसली कंप्लेंट? 

बेटा : (तावातावाने) हे कमळ पार्टीचे लोक रडीचा डाव खेळतात! चापलुसी करतात! लांड्यालबाड्या करून कारभार चालवतात! 

मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) त्यात नवीन काय आहे? गेली सहा वर्षं आपण हेच बोलतो आहोत ना? 

बेटा : (आवाज आणि डोळे बारीक करत)... नवीन आहे, मम्मा, नवीन आहे!! हे कमळवाले लोक चक्क सोशल मीडिया मॅनेज करतात आणि निवडणुका जिंकतात, असा नुकताच मला शोध लागला आहे! 

मम्मामॅडम : (कोरडेपणाने) शोध कसला त्यात? हेच तर चालू आहे आपल्या देशात! सगळ्या जगाला माहीत आहे! परवा अमेरिकेतल्या एका पेपरातसुद्धा छापून आलंय! 

बेटा : (घाईघाईने खुलासा करत) त्याच्या आदल्या दिवशी मला हा शोध लागला आहे, याकडे दुर्लक्ष करू नकोस! आय वॉंट जस्टिस! लोकतंत्रसे यह खिलवाड मैं होने नहीं दूंगा! 

मम्मामॅडम : (नाद सोडत) जाऊ दे रे! देशातील सलोखा आणि लोकशाहीची वाट लावणाऱ्यांकडून कसली अपेक्षा ठेवणार? 

बेटा : (सात्त्विक संतापाने) तरीच इतके दिवस मी म्हणत होतो की यांचे फॉलोअर्स माझ्यापेक्षा कायम जास्त कसे? 

मम्मामॅडम : (कपाळ चोळत) तळे राखी तो पाणी चाखी, बेटा! 

बेटा : (गुप्तहेराच्या आवेशात) माझ्या तपासात असं कळलंय, की सोशल मीडियातल्या बड्या बड्या अधिकाऱ्यांशी यांचं संधान आहे! आपली पोस्ट आली की ती गायब करायची, यांच्यापैकी कुणाची आली तर तश्‍शीच ठेवायची, अशी यांची आयडिया असते! मतदारांना भुलवण्याचं हे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे! -सगळं ठरवून चाललं आहे यांचं! माझ्याकडे पुरावे आहेत! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मम्मामॅडम : (हताशपणे) याचा काही उपयोग होणार नाही! 

बेटा : (वाद घालत) उपयोग का होणार नाही? या अन्यायाविरूद्ध मी आवाज उठवला की ते सोशल मीडियावाले घाबरतील! घाबरून माझ्या पोस्ट डिलिट करणार नाहीत! मग मतदारांवर माझाही प्रभाव पडेल! तसा प्रभाव पडला की इलेक्‍शनमध्ये- 

मम्मामॅडम : (कानावर हात ठेवत) नको ती स्वप्नं बघूस बेटा! आपल्या पक्षाची अवस्था बघतो आहेस ना? 

बेटा : (आत्मविश्वासाने) मैं हूँ ना? टेन्शन मत लेना! मी सगळं नीट करणार आहे, लौकरच! आपला पक्ष बघता बघता पुन्हा यशाच्या शिखरावर दिसेल तुम्हाला! 

मम्मामॅडम : (खुर्चीत मटकन बसून) प्रियांकादिदीसुद्धा हेच म्हणते! पण... 

बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) दिदीचं काय म्हणणं आहे? 

मम्मामॅडम : (अडखळत माहिती देत) विशेष काही नाही! आपल्या पक्षाला पुन्हा चांगले दिवस यायला हवे असतील तर नवा अध्यक्ष नेमावा लागेल असं तिचं म्हणणं आहे! 

बेटा : (हाताची घडी घालत मंद हांसत) करेक्‍ट! माझंदेखील हेच मत आहे! 

मम्मामॅडम : (आणखी माहिती देत) पक्षाचा नवा अध्यक्ष आपल्या गांधी आडनावाचा नसावा, असंही तिचं म्हणणं आहे! 

बेटा : (डोळे मिटून हासत) यह भी करेक्‍ट! मी इतके दिवस तेच सांगतोय, पण माझ्या शेजारी बसायला आपल्या पक्षातले लोक घाबरतात, त्याला मी काय करणार, दिदी काय करणार,आणि तू काय करणार? हो की नाही? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com