esakal | ढिंग टांग : चला गड्यांनो, बांधावरती!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : चला गड्यांनो, बांधावरती!

माननीय साहेब लागलीच निघाले. हेलिकाप्टर उडाले. एका रिकाम्या शेतात हेलिकाप्टर उतरवले. ते चालत बांधाकडे निघाले...केवढा चिखल!! छे!! पण(माझ्या शेतकऱ्याच्या) डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी एवढे केलेच पाहिजे.

ढिंग टांग : चला गड्यांनो, बांधावरती!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

माननीय साहेब सकाळी उठले. त्यांच्या अश्रूंना खळ नव्हता. त्यांनी तत्क्षणी निर्धार केला- थेट बांधावर जायचे. (माझ्या) शेतकरी बांधवांचे अश्रू पुसायचे. त्यांना दिलासा द्यायचा. ‘मी आहे ना’ (मैं हूं ना) असे सांगायचे. त्यांच्या (पक्षी : शेतकऱ्यांच्या) ओठांवर हसू आले की मगच बांधावरून निघायचे.

ठरले तर! माननीय साहेब लागलीच निघाले. हेलिकाप्टर उडाले. एका रिकाम्या शेतात हेलिकाप्टर उतरवले. ते चालत बांधाकडे निघाले...केवढा चिखल!! छे!! पण (माझ्या शेतकऱ्याच्या) डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी एवढे केलेच पाहिजे.

शेतात एक शेतकरी बांधव बसला होता. मा. साहेबांना बघून त्याने अभिवादन केले. ‘‘रामराम!,’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राम राम? आपण परत ‘राम राम’ म्हणावे की सध्या काही नकोच? एक (राजकीय) विचार मा. साहेबांच्या मस्तकात घोळून गेला. हा शेतकरी ‘त्या’ रामभरोसे पार्टीचा असला तर काय घ्या? 

‘‘जय महाराष्ट्र!’’ मा. साहेबांनी मराठी अस्मितेचा आधार घेतला. बराच वेळ कुणी काही बोलले नाही.

‘‘भुईमुगाचं नुकसान भयंकर झालंय की...फारच भयंकर!,’’ साहेब शिवाराकडे नजर टाकत म्हणाले.

‘‘सोयाबीन हाय त्ये!’’ शेतकऱ्याने दातात काडी घालत निर्विकारपणे उत्तर दिले.

‘‘ह..ह...हो..हो...अहो, झोपलेलं पीक! सोयाबीन म्हणा, भुईमुग म्हणा! काय फरक पडतो?’’ साहेबांनी वेळ मारून नेली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ं‘‘मुंबयस्नं आलाय व्हय?’’ शेतकऱ्याने थंडपणे विचारले. मा. साहेबांनी ‘होय’ आणि ‘नाही’ अशी दोन्ही पद्धतीने मान डोलावली. राजकारणी माणसाने आपण कुठून आलोय, हे आधी कधीही जाहीर करू नये!

‘‘बांधावर आलाय जनू!!,’’ शेतकरी विचारत होता. मा. साहेबांनी पुन्हा ‘होय’ आणि ‘नाही’ अशी दोन्ही पद्धतीने मान डोलावली.

‘‘थिकडं जावा...दौऱ्याचा कारेक्रम तिकडं चाललाय!,’’ शेतकऱ्यानं दूर दिशेला हात दाखवला. मा. साहेबांनी ‘धन्यवाद’ असे म्हणून ती दिशा पकडली.

पाहातात तो काय! शेताच्या बांधावर पुढाऱ्यांची झुंबड होती. अगदी सर्वपक्षीय झुंबड!! 

मा. साहेबांचा नाही म्हटले तरी हिर्मोड झाला. बांधावरचे दृश्‍य अद्भुत होते. शिवारात सत्यनाश झालेला होता. बांधावर उभे राहण्यासाठी रेटारेटी चाललेली. असल्या गर्दीत आपल्यासारख्या तालेवर पुढाऱ्याने घुसावे काय? सोशल डिस्टन्सिंगच्या फज्जाचे काय? टीव्ही क्‍यामेऱ्यांचे काय? असे सत्राशेसाठ प्रश्न मा. साहेबांच्या मनात एकाच वेळी घोंघावू लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते महत्प्रयासाने बांधावर उभे राहायला जागा शोधू लागले.

‘‘अहो, मी पहिल्यांदा आलोय...तुम्ही मला काय ढकलताय खाली?,’’ एक तालेवार नेते दुसऱ्या नेत्याला झापत होते. दुसऱ्या नेत्याने तिसऱ्या नेत्याचा कुडता पकडून तोल सांभाळला होता. तिसऱा नेता चौथ्याचा हात पकडून होता आणि चौथा पाचव्याला शिवारातल्या चिखलात ढकलत होता...साहेबांच्या डोळ्यांसमोर मुंबईतली सहा चाळीसची फास्ट लोकल उभी राहिली! त्यांनी लोकलचा विचार घाईघाईने झटकला. 

‘‘मीसुद्धा सकाळधरनं हिते येऊन हुबा आहे, साहेब!’’ दुसरा नेता कुरकुरला.

‘‘बॅब्स, माझी सॅंडल मडमध्ये स्पॉइल झाली! नाऊ व्हाट टु डू?’’ एक तरणाबांड, देखणा, हुश्‍शार आणि सुशिक्षित नवनेता आपल्या पुढारी वडलांकडे तक्रार करत होता.  

‘‘हे पहा सोशल डिस्टन्सिंग पाळा! सॅनिटायझर वापरा! हात धुवा!! गर्दी केलीत, तर पुन्हा लॉकडाऊन करीन!,’’ शेवटी सहन न होऊन मा. साहेब सगळ्यांच्या अंगावर ओरडले.

‘‘गप बसा वो सायेबलोक...तुमच्यापैकी लुकसानीचा पैका कोन देनार आहे?,’’ शेतकऱ्याने शांतपणे विचारले. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि खांदे उडवले. कुणी ओशाळे होऊन (उगीचच) खिसे चाचपले...सर्वत्र शांतता पसरली.