esakal | ढिंग टांग :  वारस! 

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  वारस! 

 गुरूंच्या पिढ्या खर्ची पडतात, तेव्हाच एखादा महानायक जन्माला येतो.  तरीही- राजसत्ता आणि धर्मसत्तेपुढे ज्ञानसत्ता  कशी टिकावी? हा सवाल मात्र अनुत्तरितच  राहिला आहे. अजूनही.    

ढिंग टांग :  वारस! 
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

धर्म न्यायासनाने पुढे केलेला 
विषाचा प्याला ओठांना लावण्याआधी 
आवर्जून लिहिलेल्या क्षमापत्रात 
कुलगुरू सॉक्रेटिस यांनी लिहून ठेवले : 
‘अवघ्या ब्रह्मांडाची कोडी 
सोडवण्याच्या नादात 
बऱ्याच गोष्टी राहून गेल्या… 
तत्त्वचिंतनाच्या तंद्रेमध्ये 
वास्तवाचे उरलेच नाही भान! 
राजसत्तेपुढे (अथवा धर्मसत्तेपुढे) 
शहाणपण थिटे पडते, याचा साक्षात्कार 
होण्यासाठी विषाच्या घोटापर्यंत 
करावा लागला प्रवास… 
विद्वत्तेने राजसत्तेपुढे कसे टिकावे? 
हा प्रश्न आता उरलाच, माझाच कुणी शिष्योत्तम 
हा प्रश्न सोडवेल का भविष्यात?’ 

त्यानंतर काही वर्षांनीच- 

सूर्यास्ताच्या कातरवेळी 
विशाल वृक्षाच्या छायेत 
शांतपणे बसलेल्या 
वृद्ध गुरुवर्य प्लेटो यांनी 
सोडला एक उदास सुस्कारा. 
आपला पायघोळ झगा आवरून 
विनम्र वज्रासनात शेजारीच 
बसलेल्या शिष्योत्तम अरिस्टोटलला 
ते म्हणाले : शिष्यवरा, सारे काही 
ठीक ठीकच झाले, तुझ्यासारखा 
मेधावी शिष्य मजला घडवता आला. 
कुलगुरूंनी बांधून दिलेले विद्येचे पाथेय 
तुझ्या हाती सोपवून प्रस्थानाची 
तयारी करावी, म्हणतो. परंतु, 
कुलगुरू प्लेटोंनी दिलेली जबाबदारी 
मात्र मी पुरी करू शकलो नाही. 
राजसत्ता आणि धर्मसत्तेला 
कठोरपणे तोंड देणारी ज्ञानसत्ता 
कशी निर्माण करावी? हे कोडे 
काही मजला उलगडले नाही! 
तू ते काम करशील का? करशील ?’ 
शिष्योत्तम अरिस्टोटल नि:शब्द राहिला… 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

गुरुवर्य प्लेटो यांच्या पश्चात त्याने 
तडक ग्रीस गाठले, आणि 
अखंड विद्यादानाच्या यज्ञवेदीतून 
तत्त्वचिंतनाच्या मंथनातून, 
ज्ञानसंकीर्तनाच्या कल्लोळातून 
उभा केला एक मूर्तिमंत शिष्य. 
ज्याच्याठायी होता तीन विद्वज्जनांच्या 
चिंतनाचा उग्रतेजस अर्क. 
अगणित कुतूहलांची बीजे, 
आणि शेकडो अमूर्त संकल्पनांच्या 
उत्कट, वास्तव प्रतिमा. तिन्ही जगदवंद्य गुरुजनांना वंदन करून 
त्याने उचलले एकच उत्तर- खङग! 

यथावकाश त्याने जग जिंकले. 
अलेक्झांडर द ग्रेट नावाच्या 
या शिष्याच्या पाठीशी होते 
अजिंक्य सैन्य, आणि 
पृथ्वीला पालाण घालणारी 
सॉक्रेटिस-प्लेटो- अरिस्टोटलच्या 
तीन पिढ्यांची पुण्याई. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तात्पर्य : गुरूंच्या पिढ्या खर्ची पडतात, 
तेव्हाच एखादा महानायक जन्माला येतो. 
तरीही- 
राजसत्ता आणि धर्मसत्तेपुढे 
ज्ञानसत्ता कशी टिकावी? 
हा सवाल मात्र अनुत्तरितच राहिला आहे. 
अजूनही.