esakal | ढिंग टांग :  हळू बाई हळू!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  हळू बाई हळू!

सदू फोन लावतो. मास्क लावा, हात वारंवार धुवा, सोशल डिस्टन्सिंग पाळा वगैरे सूचना देणारी नेहमीची टेप ऐकू येते. सदू कंटाळतो. मग वैतागतो. शेवटी भडकतो.

ढिंग टांग :  हळू बाई हळू!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सदू फोन लावतो. मास्क लावा, हात वारंवार धुवा, सोशल डिस्टन्सिंग पाळा वगैरे सूचना देणारी नेहमीची टेप ऐकू येते. सदू कंटाळतो. मग वैतागतो. शेवटी भडकतो. तेवढ्यात फोन उचलला जातो. अब आगे...)

दादू : (हळूवारपणे) हलोऽऽ...जय महाराष्ट्र सदूराया!

सदू : (वैतागून) लौकर फोन उचलायला काय जातं तुला? कंटाळलो तुझी ती कोविडची टेप ऐकून!

दादू : (समजावणीच्या सुरात) हळू बोल की रे सदूराया!...असं कंटाळू नये! देव आपली परीक्षा पाहातो आहे! पेशन्स ठेवा, पेशन्स!

सदू : (आणखी वैतागून) डोंबलाचा पेशन्स! इथं घरात बसून बसून वारूळ लागलंय अंगाला!

दादू : (गंभीरपणे सूचना देत) हळू...हळू बोल! किती जोरात बोलतोस? राईचं तेल अंगाला लावून झोपत जा! नाही लागणार वारूळ!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सदू : (संयम सुटून) मरू दे ते वारूळ! आता उघडा ना तुमचा तो लॉकडाउन! जीव जातोय इथं!

दादू : (शांतपणे) हळू ना बाबा! जीव जातोय, म्हणून तर उघडायचा नाहीए  लॉकडाउन! एवढं कळत नाही का तुला?

सदू : (तावातावाने) आम्ही केलेला सर्वे बघितलास्का? ‘आता पुरे झालं’, असं म्हणतायत लोक! ऐक जरा कान उघडे ठेवून!

दादू : (ठामपणे) म्हणू देत! आपल्याला काहीही घाई नाही! 

सदू : (भडकून) घाई नाही? दादूसाहेब, माणसं भुकेनं हैराण झाली आता! असंच तुमचं लॉकडाउन चालू राहिलं तर लूटमार, चोऱ्या, दरोडे वाढतील, हे लक्षात ठेवा!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दादू : (कानात बोट घालत) वाढू देत!

सदू : (डोळे वटारत) नोकऱ्या जातील, रोजगार बुडतील! अवघं राज्य देशोधडीला लागेल!

दादू : (निर्धारानं) काय वाट्टेल ते होऊ दे! मी हळूहळूच उघडणार! घाई करता उपयोग नाही! अति घाई, संकटात नेई!!

सदू : (प्रयत्नपूर्वक स्वत:ला आवरत...) लहानपणापासून तुला पाहातोय! असाच आहेस तू!! हळूबाई कुठला!!

दादू : (पोक्तपणाने) त्याला मॅच्युरिटी म्हणतात! तुला नाही कळणार! लहानपणापासून तुला पाहतोय! तसलाच आहेस तू! हाहा!!

सदू : (हिणवत) एवढा मोठा महाराष्ट्राचा कारभारी म्हणवतोस! जरा हिंडत जा लोकांमध्ये! कळेल काय परिस्थिती आहे ते! नुसता बांदऱ्यात ठाण मांडून बसलेला असतोस!

दादू : (कर्तव्यबुद्धीने) माझ्याकडे इ-पास नाही! आणि इ-पास नसताना जिल्हा ओलांडता येणार नाही! सबब, मी बाहेर हिंडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! नियम म्हंजे नियम!

सदू : (कुरकुरत) स्वत:ही फिरत नाहीस आणि दुसऱ्यालाही फिरू देत नाहीस! हे चांगल्या स्वभावाचं लक्षण नाही!

दादू : (मृदूपणाने) हळवा आहे माझा स्वभाव! लोकांचं दु:ख बघवत  नाही, म्हणून मी ते बघत हिंडत नाही!

सदू  : (हतबुद्ध होत्साता) कधी उघडणार मग सगळं?

दादू : (धीर देत) काय घाई आहे? आज करै सो कल कर, कल करै सो परसो, इतनी भी क्‍या जल्दी है जब जीना है बरसों?  

सदू : (गोंधळात पडून) असा का वागतोस दादूराया? लोकांचा धीर सुटत चाललाय आता! तुला काय देऊ म्हंजे तू लॉकडाउन उघडशील?

दादू : (मनोगत सांगितल्यागत) तुला ती लहानपणची काऊ आणि चिऊची गोष्ट आठवतेय?  

सदू : (गोष्टीतल्या कावळ्याच्या सुरात...) हांहां, ती!...दादूराया, दादूराया, दाऽऽर उघड!

दादू : (गोष्टीतल्या चिमणीच्या सुरात...) करेक्‍ट! थांब माझ्या बाळाला तीट लावतो! जय महाराष्ट्र!!