esakal | ढिंग टांग : धी बेस्ट!
sakal

बोलून बातमी शोधा

cm

त्या तुझ्या देवेन अंकलसारखा बाहेर हिंडत बसलो असतो, तर आज सर्वोत्तम सीएमच्या यादीत माझं नाव आलं असतंका? तूच सांग!! अरे, त्यासाठी दृष्टी हवी असते! अचूक दृष्टी असेल तर माणूस घरबसल्या मंगळावरसुध्दा जाऊ शकतो!!कळलं?

ढिंग टांग : धी बेस्ट!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

(स्थळ : मातोश्री महाल, वांद्रेबुद्रुक)
चि. विक्रमादित्य : (दारावर टकटक करत) हायदेअरबॅब्स…मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (निक्षून) नोप!

विक्रमादित्य : (निकराने दार ढकलत) पण मी मास्क लावलाय!!

उधोजीसाहेब : (कर्तव्यकठोरपणे) सॅनिटायझरने हात स्वच्छ केले?

विक्रमादित्य : (कळवळून) खिशात सॅनिटायझरची बाटली आहे! 

उधोजीसाहेब : (गंभीरमुद्रेने) बरं बरं! काय काम होतं?कुठे झाडबिड पडल्याच्या तक्रारी घेऊन येऊ नकोस! मला खूप इतर कामं आहेत!!

विक्रमादित्य : (उजळलेल्या मुद्रेने) हार्टिक अभिनंदन!

उधोजीसाहेब : (चूक दुरुस्त करत) हार्टिक नाहीरे…हार्दिक, हार्दिक म्हणायचं असेल तुला!

विक्रमादित्य : (नकार देत) नोप! हार्टिकच…आय मीन माय हार्टियेस्ट काँग्रॅच्युलेशन्स!

उधोजीसाहेब : (लाजून) थँक्यू! पण कशाबद्दल?

विक्रमादित्य : (अभिमानाने) बॅब्स, तुम्ही भारतातले सर्वांत बेस्ट सीएम आहात! धी नंबर वन सीएम! तेही फक्त सहा-सात महिन्यात!! तुस्सी ग्रेट हो!!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उधोजीसाहेब : (संकोचानं) कसचं कसचं!

विक्रमादित्य : कसं जमतं हो तुम्हाला एवढं सगळं? 

उधोजीसाहेब : (चौकश्या करत) मी एकटाच बेस्ट सीएम आहे? असं कसं होईल? छे!!

विक्रमादित्य : (आणखी माहिती पुरवत) यूपीचे योगीजी, दिल्लीचे केजरीवालअंकल, कोलकात्याच्या दिदी हे सगळे आहेत की! पण फक्त सहा-सात महिन्यात तुम्ही त्यांच्या लायनीला जाऊन बसलात! कमाल आहे बॅब्स!!

उधोजीसाहेब : (खचून जात) काहीतरीच!! मला तर त्यांच्या ग्रुप फोटोत उगीचच घुसल्यासारखं वाटतंय! 

विक्रमादित्य : (टीव्ही जर्न्यालिस्टाच्या पवित्र्यात) बधाई हो! आपको अभी कैसा लग रहा है?

उधोजीसाहेब : (गोरेमोरे होत) काहीही नाही लग रहा है! 

विक्रमादित्य : (हट्ट न सोडता) या विक्रमाचं श्रेय आपण कोणाला देता?

उधोजीसाहेब : (चाचरत) बा..बा…बा…बारा-!! (शब्द फुटत नाहीत...)

विक्रमादित्य : ‘बारामती’ म्हणायचंय का तुम्हाला?

उधोजीसाहेब : (दुप्पट दचकून) बारा बारा तास काम केल्यामुळे हे फळ मिळालं असं म्हणायचं होतं मला!!(अविश्वासाने) पण खरंच का मला `सर्वोत्तम सीएम`चा किताब मिळालाय?

विक्रमादित्य : (आश्वस्त करत) हंड्रेड पर्सेंट खरं! बॅब्स, तुम्ही कित्ती काम करता!! मी पाहातोना!! बघावं तेव्हाव्हिडिओ मीटिंगमध्ये असता!! लोकांना वाटतं, हे घरात बसलेत नुसते! बाहेर सुध्दा जात नाहीत! पण वर्क फ्रॉम होम करताना जास्त काम करावं लागतं, हे कुणी लक्षातच घेत नाही!! नॉन्सेन्स!!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उधोजीसाहेब : (चिंतनशील वृत्तीने) त्या तुझ्या देवेन अंकलसारखा बाहेर हिंडत बसलो असतो, तर आज सर्वोत्तम सीएमच्या यादीत माझं नाव आलं असतंका? तूच सांग!! अरे, त्यासाठी दृष्टी हवी असते! अचूक दृष्टी असेल तर माणूस घरबसल्या मंगळावरसुध्दा जाऊ शकतो!!कळलं?

विक्रमादित्य : (सदगदित होऊन) बॅब्स, तुम्ही यूपीएससीची एग्झॅम का नाहीहो दिलीत? आज कलेक्टर असता किंवा कमिशनर!!

उधोजीसाहेब : (छाती फुगवून)शे-सव्वाशेकलेक्टर नि कमिशनर माझ्यासमोरउभेराहतात, उभे!! क्या समझे?

विक्रमादित्य : (मोबाइल हातात घेत) आपले दादासाहेब बारामतीकरआहेतना, त्यांचा फोन आला होता मघाशी! तेविचारत होते, ‘ही बेस्ट सीएमची काय नवीन भानगड आहे?’..त्यांना काय सांगू?

उधोजीसाहेब : (प्राणांतिक दचकून) अरे बापरे! त्यांना म्हणावं, फार मनावर घेऊ नका! नक्कीकळवहां, पण! क…क…काय!! ज…ज…जयमहाराष्ट्र!!