esakal | ढिंग टांग :  इनक्रेडिबल महाराष्ट्र!

बोलून बातमी शोधा

maharashtra-incredible

कोणीही घराबाहेर पाऊल टाकायचं नाही! किंबहुना मी तर म्हणेन की गरज नसेल तर, खोलीबाहेरदेखील कोणी जाऊ नये! मी बघ, जातो का कुठे बाहेर? करतो का नियमभंग? लॉकडाउन म्हंजे लॉकडाउन!! नथिंग डुइंग!! 

ढिंग टांग :  इनक्रेडिबल महाराष्ट्र!
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक.
वेळ : कुठलीही.
काळ : कोरोनायुग.
पात्रे : आदर्श!

चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक करत) हाय देअर…मे आय कम इन बॅब्स?

उधोजीसाहेब : (निक्षून) नोप!

विक्रमादित्य : (बळेबळेच आत येत) बट व्हाय?

उधोजीसाहेब : (जरबेने) आधी मास्क लाव! रात्र वैऱ्याची आहे!

विक्रमादित्य : (गोंधळून) पण आत्ता रात्र कुठे आहे?

उधोजीसाहेब : (गडबडून) असं म्हणायची पद्धत असते आपल्या मराठीत! संकट अजून टळलेलं नाही, एवढाच त्याचा अर्थ!!

विक्रमादित्य : (विचारात पडत) आय सी! म्हंजे दिवस वैऱ्याचा नाही, असंही त्याचं मीनिंग होत असणार! नाही का?

उधोजीसाहेब : (पुढल्या संकटाचा अंदाज येऊन) तू आधी इथून जा बरं!

विक्रमादित्य : (गंभीरपणाने) सगळ्या खोल्यांमध्ये थोडं थोडं साइट सीइंग करून शेवटी तुमच्याकडे आलो आहे! आता कुठे जाणार?

उधोजीसाहेब : (फेसबुक लाइव स्टाइल) पाऊस सुरू झालाय! सगळीकडे हिरवळ दिसू लागली आहे! आकाशात ढग जमू लागले आहेत! निसर्ग कसा हजार हातांनी देतो आहे!...हे सगळं बघ…पण टीव्हीवर बघ!!

विक्रमादित्य : (हात चोळत) सगळं नॉर्मल असतं तर आज मी मॉन्सून टूरिझम किती वाढवला असता! पण तुम्ही मला बाहेर जाऊच देत नाही!! घरात बसून किती वाढवणार पर्यटन याला काही लिमिट असतं!!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उधोजीसाहेब : (पोक्तपणे) कोणीही घराबाहेर पाऊल टाकायचं नाही! किंबहुना मी तर म्हणेन की गरज नसेल तर, खोलीबाहेरदेखील कोणी जाऊ नये! मी बघ, जातो का कुठे बाहेर? करतो का नियमभंग? लॉकडाउन म्हंजे लॉकडाउन!! नथिंग डुइंग!! घरात बसूनसुध्दा महाराष्ट्राची काळजी वाहाता येते, हे मी लोकांना सोदाहरण पटवून देतो आहे!!

विक्रमादित्य : (अचंब्यानं) आय सी! बॅब्स, तुम्ही आदर्श लॉकडाउनपुरुष आहात!!

उधोजीसाहेब : (तोंडावरचा मास्क ठाकठीक करत) थँक्यू!!

विक्रमादित्य : (आदरानं) खोलीबाहेर न पडता तुम्ही महाराष्ट्राचा कारभार किती समर्थपणे पार पाडता! बॅब्स, तुस्सी ग्रेट हो!!

उधोजीसाहेब : (समाधानाने डोळे मिटून) दृष्टी असली की बसल्याजागी कामं करता येतात!! मी बघ, ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांसाठी मी आदर्श आहे! अत्यंत तडफेने निर्णय घेण्यामध्ये मी अजिबात मागेपुढे पाहात नाही!

विक्रमादित्य : (खांदे उडवत) मागेपुढे पाहायला आहे काय इथं? भिंती!! हाहा!!

उधोजीसाहेब : (सात्त्विक संतापानं) नाही तर ते तुझे देवेंद्र अंकल! सतत कुठे ना कुठे हिंडत असतात! आज इथे, उद्या तिथे!! हे सपशेल चूक आहे! त्यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याबद्दल खरं तर गुन्हा नोंदवायला पाहिजे!! (दात ओठ खात) बघीन बघीन आणि एक दिवस..

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विक्रमादित्य : (उत्साहाने) मी कालच म्हणालो की हे अपोझिशनवाले नुसतं टूरिझम करताहेत! हेल्थ आणि डिझास्टर टूरिझम!! जिथे जिथे प्रॉब्लेम आहे, तिथे तिथे नेमके मास्क लावून हजर!! कमाल आहे ना देवेंद्र अंकलची!! एकाच दिवसात किती ठिकाणी फिरतात! सगळं नॉर्मल होतं, तेव्हा इथल्या इथेच फिरायचे, आता कुठे कुठे पर्यटनाला जाऊन येतात! कोसो कॉय जोमतो बोआ त्याँना…आँ?

उधोजीसाहेब : (चिडून) इतकं काही कौतुक नको करायला त्यांचं!

विक्रमादित्य : (चुटकी वाजवत) आयडिया! त्यांनाच मी आमच्या टूरिझम डिपार्टमेंटचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नेमून टाकू का? गुजराथेत अमिताभ बच्चन, महाराष्ट्रात देवेंद्रकाका! कशी आहे आयडिया?