esakal | ढिंग टांग :  देऊळ बंद! 
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra-political

माझ्याशिवाय? मंदिरवाले, जिमवाले, वडापाववाले, रिक्षावाले, दुकानवाले, मॉलवाले, सगळे माझ्याकडे गाऱ्हाणी घेऊन येतात! "केवढं नुकसान झालं, साहेब! वाचवा!' असा टाहो फोडतात! माझ्या हृदयाला घरं पडतात, घरं! 

ढिंग टांग :  देऊळ बंद! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सदू : (फोन फिरवत) कूऽऽक...झुक झुक झुक झुक! 

दादू : (फोन उचलत) सदूराया, बोल आता! पुरे झाला इंजिनाचा आवाज! 

सदू : (साळसूदपणे) ती माझी कॉलरट्यून आहे! 

दादू : (खट्याळपणे) कळलं! एरवी तुमचं इंजिन कुठे एवढं चालायला? हुहुहु!!! फोन का केला होतास ते सांग आधी! 

सदू : (चिंतातुर आवाज काढून) मंदिरं कधी उघडणार आहेस? 

दादू : (पुन्हा खट्याळपणाने) कां? हल्ली वेळ जाता जात नाही वाटतं! 

सदू : (टोमण्याकडे दुर्लक्ष करत) मंदिराचे पुजारी आले होते माझ्याकडे! म्हणाले, "तुमच्या बंधूराजांना मंदिरं उघडायला सांगा!' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दादू : (कर्तव्यकठोरपणे) छे, छे! रात्र वैऱ्याची आहे सदूराया ! मंदिरं आत्ताच उघडली तर प्रॉब्लेम होईल ! 

सदू : (गळ घालत) उघड की रे! जाम नुकसान होतंय त्यांचं! संकटाच्या काळात माणसानं प्रार्थना करायची तरी कुठं? 

दादू : (कीर्तनकाराच्या पवित्र्यात) वत्सा, सदूराया, देव जळी- स्थळी- काष्ठी- पाषाणी सर्वत्र आहे! कुठेही उभा राहून प्रार्थना कर- देवास पोहोचेल हो!! घरात बसा, निरोगी हसा!! 

सदू : (त्राग्याने) हे जरा आता जास्तच होतंय हं! मी म्हणतो, जरा काळजी घेऊन, तुमचे काय ते नियमबियम पाळून सगळं सुरू करावं! 

दादू : (गुळमुळीतपणे) बघू, बघू! 

सदू : (हट्टाने) बघू बघू नाही! नक्की काय ते सांग! ते जिमनॅशियमवालेसुद्धा माझ्याकडे येऊन गेले! म्हणाले, "तुमच्या बंधूराजांना सांगा, जिम उघडा म्हणून! आमचं ते ऐकत नाहीत!'... 

दादू : (अचंब्याने) कमालच आहे! हल्ली माझ्याविरूद्ध काहीही तक्रार असली की लोक तुझ्याकडे येतात की काय? 

सदू : (गडबडून) त्यांना तरी कोण वाली आहे...माझ्याशिवाय? मंदिरवाले, जिमवाले, वडापाववाले, रिक्षावाले, दुकानवाले, मॉलवाले, सगळे माझ्याकडे गाऱ्हाणी घेऊन येतात! "केवढं नुकसान झालं, साहेब! वाचवा!' असा टाहो फोडतात! माझ्या हृदयाला घरं पडतात, घरं! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दादू : (निक्षून सांगत) त्यांना म्हणावं, अजून संकट टळलेलं नाही! अजून थोडी कळ सोसा! स्वस्थ रहा, स्वस्थ बसा! 

सदू : (अखेर संयम सुटून) स्वस्थ बसा आणि काय हरी हरी करा? हरी हरी करायला तरी ती देवळं उघडा!! तुमचा होतो लॉकडाऊन आणि इथे मी शिष्टमंडळांच्या मागण्या स्वीकारत बसलोय!! 

दादू : (खुदकन हसत) तूदेखील थोडी कळ सोस, सदूराया! 

सदू : (भान हरपून) गेला उडत तुमचा लॉकडाऊन! ताबडतोब जिमनॅशियम आणि देवळं उघडा, नाहीतर मी आमच्या स्टाइलमध्ये काय करायचं ते करीन!! 

दादू : (आव्हान देत) काय करशील? नाही...सांग, सांग ना...काय करशील? 

सदू : (दातओठ खात) दादू, शेवटचं सांगतो, माझा अंत पाहू नका!! माझ्या इंजिनाचा खडखडाट सुरू झाला तर उभा महाराष्ट्र हादरेल, एवढं लक्षात ठेव! 

दादू : (बिलकुल न डरता) आय सी...म्हंजे नेमकं काय होईल? 

सदू : (विचारात पडत) कळेल, कळेल! 

दादू : (खासगी आवाजात) सदूराया, कशाला रागावतोस इतका? तुला कुठे लॉकडाउनचे नियम लागू आहेत? तू तर मास्कसुद्धा वापरत नाहीस! 

सदू : (सात्त्विक संतापानं) लॉकडाउन म्हणे! हॅ:!! चुलीत जावो, तुमचं सोशल डिस्टन्सिंग!! 

दादू : (हळूवारपणे टोला हाणत) इलेक्‍शनमध्ये लोकांनी पाळलेलं सोशल डिस्टन्सिंग तुझ्या मनाला इतकं लागलं का रे?