ढिंग टांग :  वाटा आणि घाटी! 

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 12 मे 2020

संकटाच्या काळात राजकारण करू नका, असं कितीवेळा सांगायचं? आपली निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, म्हणून किती धडपडतोय आम्ही! शेवटी थेट दिल्लीला फोन लावावा लागला आम्हाला!

बाळासाहेब : (अनिवार्यपणे फोन करत) जय महाराष्ट्र! "मातोश्री' ना? आमच्या साहेबांशी बोलायचं होतं जरा! 

उधोजीसाहेब : (आवाज बदलून) साहेब घरात नाहीत! 

बाळासाहेब : (आश्‍चर्यानं) अस्सं? कुठे गेलेत? 

उधोजीसाहेब : (आवाज आणखी बदलून) गच्चीमध्ये गेलेत! तिथे फोन देता येणार नाही! तुम्ही कोण बोलताय? 

बाळासाहेब : (मिनिटभर बुचकळ्यात पडून झाल्यावर) मी बाळासाहेब! 

उधोजीसाहेब : (धक्का बसून) आँ? 

बाळासाहेब : (सावरून घेत) मी बाळासाहेब जोरात बोलतोय! 

उधोजीसाहेब : (कपाळाला आठ्या घालत) जोरात नको, हळू बोला!! 

बाळासाहेब : (गुळमुळीतपणे) ते सहाव्या सीटबद्दल जरा विचारायचं होतं! 

उधोजीसाहेब : (निक्षून) लॉकडाउनच्या काळात कसली आलीये सहावी सीट? 

बाळासाहेब : (घाईघाईनं) अहो, एमेलसीच्या सहाव्या सीटेबद्दल विचारायचं होतं हो! 

उधोजीसाहेब : (त्राग्यानं) संकटाच्या काळात राजकारण करू नका, असं कितीवेळा सांगायचं? आपली निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, म्हणून किती धडपडतोय आम्ही! शेवटी थेट दिल्लीला फोन लावावा लागला आम्हाला! 

बाळासाहेब : (खोल आवाजात) तोच दिल्लीचा फोन आमच्या हायकमांडला केला असता, तर काही बिघडलं असतं का? शेवटी आपण सत्तेतले पार्टनर आहोत ना? 

उधोजीसाहेब : (बेसावधपणे) कोरोनाचं संकट असताना राजकारण करू नका, असं मी शंभर वेळा सांगितलं आहे! 

बाळासाहेब : (राजकीय चातुर्यानं) आता राजकारणातही राजकारण करायचं नसंल तर ऱ्हायलंच! हे म्हंजे आचाऱ्याला सैपाक करू नको असं सांगण्यासारखं आहे! (एकदम आठवून) पण हे तुम्ही कोण सांगणार? तुम्ही मोठ्या साहेबांना फोन द्या बरं! 

उधोजीसाहेब : (भानावर येत) सांगितलं ना, साहेब गच्चीत आहेत म्हणून! तिथं फोन दिला जाणार नाही! 

बाळासाहेब : (काकुळतीला येऊन) आपण एकीनं राहिलो तर सहावी सीट येतेय, असा निरोप द्या तुम्ही साहेबांना! दिल्लीहून हायकमांडचा मेसेज आलाय हो! की जरा आक्रमक व्हा म्हणून! मी तरी काय करू? 

उधोजीसाहेब : (हसू आवरत) आक्रमक कसले होताय? इथं बिनविरोध इलेक्‍शन करायचं आधीच ठरलं होतं! 

बाळासाहेब : (हेका न सोडता) थोडं अडजस्ट करा साहेब! जरा ढकलाढकली केली तर सीट भेटून जाईल! 

उधोजीसाहेब : (चिडून) ही काय तांबडी एसटी आहे का? "वाईच सरकून घ्या जरा' असं सांगायला? फोन ठेवा! 

बाळासाहेब : (नरम आवाजात) तुमच्या साहेबांना म्हणावं, की आमच्या हायकमांडशी बोलून घेता का जरा? मग आमचं काही म्हणणं नाही!! 

उधोजीसाहेब : (उग्र पवित्र्यात) तुमच्या या राजकारणापायीच साहेब गच्चीत रूसून बसले आहेत! 

बाळासाहेब : (हतबुद्ध होत) गच्चीत रूसून बसले? आर्रर्रर्र...! 

उधोजीसाहेब : (गाल फुगवून) "हे ओसोच चॉलणार ओसेल, तोर ऑम्ही खेळणॉर नाही...' असं म्हणताहेत आमचे गच्चीतले साहेब! 

बाळासाहेब : (गोंधळून) हे काहीतरी त्रांगडंच होऊन बसलं! आणखी काय म्हणाले साहेब? 

उधोजीसाहेब : (निर्धाराने) साहेब म्हणतात, की बॉल आणि ब्याट माझी असल्याने माझीच दोनदा ब्याटिंग आणि एक टप्पा औट! फुलटॉस नॉटौट! हे मान्य असेल तरच गच्चीवरून उतरीन!! आता बोला!! चालेल्का? 

बाळासाहेब : (पडेल आवाजात) चालतंय की, अन्‌ काय! जय महाराष्ट्र!! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article about maharashtra politics