ढिंग टांग : फटाके आणि फटके!

ब्रिटिश नंदी
Wednesday, 11 November 2020

सगळ्याच गोष्टी काही पटदिशी कळत नाहीत. जीवनात काही गोष्टी हळू हळूवारपणेच कळलेल्याच बरे असते. अचानक कळल्या तर खुर्चीखाली सुतळी बॉम्ब फुटल्यासारखे वाटते.

‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत आपण सारे काही हळू हळूवारपणे उघडत आहोत, हे आता हळू हळूवारपणे सगळ्यांनाच कळू कळू लागले आहे. सगळ्याच गोष्टी काही पटदिशी कळत नाहीत. जीवनात काही गोष्टी हळू हळूवारपणेच कळलेल्याच बरे असते. अचानक कळल्या तर खुर्चीखाली सुतळी बॉम्ब फुटल्यासारखे वाटते. औंदाची दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. तोंडावर म्हंजे अक्षरश: मास्कसारखी तोंडावर आली आहे. ‘खिशात नाही अडका, तरीही बाजारात जाऊन धडका’ असे आता वागता येणार नाही. कोरोनाची काही बंधने पाळापाळावी लागणार आहेत. उदाहरणार्थ, फटफटाके उडवणे. 

आपण समंजसपणे काळजी घेतली तर कोरोनाची दुसरी लाट ऊर्फ त्सुत्सुनामिही टाळता येईल. यासाठीच आम्ही येथे काही स्वयंनियमावलीची कलमे सुचवत आहो. त्याचे पालन प्रत्येकाने हळू हळूवारपणे का होईना, जमजमेल तसे करावे, ही विनंती.

फटाके फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी दोनेक तास उडवावेत. तेही सौम्य स्वरुपाचे! मोठा आवाजवाले फटाके उडवले तर कानाखाली मोठा आवाज काढण्यात येईल. फटाका जितका मोठा, तितका कानाखालचा आवाज मोठा, हे लक्षात ठेवावे.

एरवी दिवाळीत भर रस्त्यावर फटाके उडवले नाहीत तर दंड होईल, असा काही तरी आपल्याकडे समज आहे. किंबहुना, फटाके हे भर रस्त्यात, शक्‍यतो मोटारींच्या खाली आणि बेमुर्वतपणे उडवले नाहीत तर ती दिवाळीच नव्हे, असे काही लोकांना वाटते. तो गैरसमज आहे, याची प्रखर जाणीव ऐन दिवाळीत करुन देण्यात येईल.

सोसायटीच्या आवारातून दुसऱ्याच्या घरात आगीनबाण सोडणाऱ्यास वेगळ्या प्रकारे शिक्षा देण्यात येईल. या शिक्षेनंतर सुमारे तीन आठवडे बसता येणे अशक्‍य होईल, याची (उभ्या उभ्या) नोंद घ्यावी. 

पहाटेच्या सुमारास अंधारात जो कोणी पहिला बॉम्ब फोडेल, त्याच्या पाठीमागे हजारी माळ लावण्यात येईल!. टिकली, केपा, भुईचक्र, अनार, पाऊस, फुलबाजे आदी निरुपद्रवी वाटणारे फटाके गपचूप व खाजगीरित्या उडवावेत. सुतळी बॉम्ब, लक्ष्मी तोटा, हापटबार, आगीनबाण, टेलिफोन, आदी घातक फटाके वाजवणे, तसेच अतिरिक्त प्रमाणात चिवडा, अति प्रमाणात चकल्या, बेसन लाडू, मोहनथाळ आदी वातुळ पदार्थांवरही निर्बंध आणावेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोसायटीच्या आवारातच फटाके उडवण्यास परवानगी आहे. तथापि, इमारतीच्या जिन्यात, मडक्‍यात किंवा शत्रूशेजाऱ्याच्या दारासमोर सुतळी बॉम्ब फोडल्याचे निष्पन्न  झाल्यास नजीकच्या पोलिस ठाण्यातील दोन हवालदार तातडीने दाखल होतील, याची नोंद घ्यावी.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रॅफिक पोलिस कोपऱ्यावर दबा धरुन बसलेले असतात. सिग्नल तोडताच तात्काळ पुढे येतात. त्याच धर्तीवर फटाके उडवू देण्यात येतील. वात पेटवतानाच पोलिस हजर होऊन मुद्देमालासकट ताब्यात घेण्यात येईल. मग तीच वात वेगळ्या ठिकाणी पेटवण्यात येईल.

आता ‘नवा नियम :’ ‘हळू हळूवार फटाके फोडा’ याचा अर्थ लांब वातवाले फटाके फोडा असा होत नाही! परंतु, काही खळ्ळखट्याकवादी उत्साही लोकांनी बांदऱ्यातील एका घरात मडक्‍यामध्ये सुतळी बॉम्ब ठेवून त्याची वात थेट शिवाजीपार्कातून पेटवण्याचे कारस्थान रचल्याचे कळते. हे सर्वथा गैर असून हळू हळूवारपणे त्यांच्यावर कारवाई होईल, हे ध्यानी घ्यावे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article about Maharashtra politics