esakal | ढिंग टांग: युद्ध आमुचे सुरूच! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग: युद्ध आमुचे सुरूच! 

आमचे गुरुवर्य श्रीमान नमोजी यांनीदेखील प्रसादाचा म्हणून खास अहमदाबाद हापूस तुम्हाला पाठवल्याचे कळले. मिळाला असेलच!! पवित्र प्रसाद म्हणून तो नमोभावे ग्रहण करावा, चांगला गुण येईल, याची हमी आहे.

ढिंग टांग: युद्ध आमुचे सुरूच! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत नमस्कार! मे महिन्यात स्वत: येऊन आपल्याला आंब्याची पेटी देणार होतो, पण लॉकडाउनमुळे शक्‍य झाले नाही. आपल्या बांदऱ्याच्या घरी मोजून नऊ वेळा माणूस पाठवला, पण त्याला बंगल्याच्या गेटवरूनच (एका उंचनिंच माणसाने) फुटवले. आंब्याची पेटी ठेवून घेतलीन!! मी पाठवलेल्या आंब्याच्या पेट्या तुम्हाला मिळाल्या का? कशी वाटली चव? कळवावे! खास तुमच्यासाठी नागपूरचा हापूस आंबा पाठवला होता. नागपूरचा आंबा म्हटल्यावर दचकलात ना? आमचे नागपूर हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे खरे, पण मा. गडकरीसाहेबांनी प्रोत्साहन देऊन हे नवे वाण डेव्हलप केले आहे. चांगले मार्केट मिळाल्यास सव्वीसशे कोटी आंबे परदेशात नागपूरहून थेट समुद्रमार्गे पाठवण्याचा त्यांचा प्लॅन आहे, त्यासाठी नागपूरच्या अंबाझरी किंवा फुटाळा तलावापासून थेट अरबी समुद्रापर्यंत सुएझ कालवा टाइप कालवा खोदण्याची त्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. (आमच्या गडकरीसाहेबांचे काम साधेसुधे नसतेच! कायम महत्त्वाकांक्षी!!) असो. देवगड आणि रत्नागिरी हापूस हे आंबे नागपूर हापूसपुढे काहीच नाहीत!! ट्राय करावेत, ही विनंती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमचे गुरुवर्य श्रीमान नमोजी यांनीदेखील प्रसादाचा म्हणून खास अहमदाबाद हापूस तुम्हाला पाठवल्याचे कळले. मिळाला असेलच!! पवित्र प्रसाद म्हणून तो नमोभावे ग्रहण करावा, चांगला गुण येईल, याची हमी आहे. मागे एकदा एका मुख्यमंत्र्याने (नाव सांगणार नाही!) त्यांनी पाठवलेला प्रसाद ग्रहण केला, तर त्यांच्या राज्यात बुलेट ट्रेनचा प्रकल्प आला! त्यायोगे प्रचंड गुंतवणूकदेखील पाठोपाठ आली. व्हाय डोंच्यू ट्राय? असो. 

लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रासमोर प्रचंड संकटे आहेत, याची जाणीव मला आहे. आम्ही सारे तुमच्यासोबत आहोत, हे वेगळे काय सांगायचे? परंतु, तुमचेच काही नवे मित्र आपल्या जुन्या दोस्तीमध्ये बिब्बा घालत आहेत, असे वाटते. तुम्हाला बिब्बे हवेत की आंबे? वेळीच ठरवा! 

वेळोवेळी मार्गदर्शन आणि आंबे पाठवत जाऊ. बाकी भेटीअंती (लॉकडाउननंतर) बोलूच. कळावे. सदैव आपला. नानासाहेब फ. 

ता. क. : आपल्या मागणीनुसार आंबेच काय, ट्रेनसुद्धा पाठवल्या आहेत. मिळाल्या का? कळवावे. आपला. नाना फ. 

नाना- 
पत्र मिळाले. आता मात्र हद्द झाली. ही काय चेष्टा आहे? माझा महाराष्ट्र संकटाशी झुंजत असताना तुम्हाला हे उद्योग कसे सुचतात? आंब्याची पेटी काय, एक डहाळीसुद्धा मिळालेली नाही! मी आमच्या उंचनिंच माणसाकडे चौकशी केली. तो म्हणाला, आंबे काय, बोरेसुद्धा आलेली नाहीत!! आता बोला!! 

म्हणे, नागपूरचा हापूस!! फू:!! नागपूरला हापूस पिकतो, हे आम्ही पहिल्यांदाच ऐकले! उद्या नागपूरची स्ट्राबेरी पाठवाल! पपई पाठवाल, पेरू पाठवाल!! काहीही हं नानासाहेब! 

ज्याप्रमाणे तुमचे नागपुरी हापूस आंबे मिळाले, तस्सेच तुमच्या श्रीमान नमोजींचे अहमदाबाद हापूस आंबेदेखील मिळाले ! अप्रतिम होते, पुन्हा पाठवू नका म्हणावे. आमच्यातर्फे त्यांना "थॅंक्‍यू' सांगा! संकटकाळात आमची सोबत करण्याऐवजी तुम्हाला हे आंबा प्याकेज सुचते, याचेच आश्‍चर्य वाटते. लॉकडाउनमध्ये माणसांना काय काय सुचेल, काही भरवसा राहिला नाही. अरे, किती फेकाल! किती फेकाल!! 

आम्ही संकटकाळात विषाणूशी लढतो आहोत, की तुमच्याशी हेच हल्ली कळेनासे झाले आहे. एकाचवेळी आम्ही किती आघाड्यांवर लढणार? तेही घरात बसून!! लॉकडाउन उठला की बघीन तुमच्याकडे. तूर्त इथेच थांबतो. भेटीची इच्छा नाही. कळावे. आपला. उ. ठा.