ढिंग टांग :  भलाईचा तीळगूळ तळहात बदलो..!

ब्रिटिश नंदी
Thursday, 14 January 2021

अपेक्षांची साखरफुले
तुमच्याही आयुष्यात उमलोत.
भलाईचा तीळगूळ तळात बदलो.
एवढेच.
...मकर संक्रांतीच्या 
हार्दिक शुभेच्छा!

अजूनही आठवतो तो पौषारंभ,
जेव्हा कडाडत्या गारठ्यात
दुलईत शिरु पाहणारी पहाट
दांडगाईने आणायची जाग,
माजघरातील मंद उजेडाला
असे फरफरत्या स्टोव्हचा आवाज, 
आणि घासलेटाचा वासदेखील.
लगबगीने अंथरुण फेकून
तो धावे माजघरात, तेथे
तव्यावर चमचा चमचा 
साखरपाणी टाकत शुभ्र वस्त्राने
काहीतरी हलकेच फिरवत
मुग्धपणे बसलेली आई.
प्राजक्तीच्या अनावर बहरासारखा
तव्यावर कोसळलेला तो
उन्मुक्त साखरफुलांचा सडा.
थरावर थर, साखरेचे थर
नखभर तीळाला फुलाचा बहर... 
अनघड तीळाचे ते बदलते रुपगंध,
आणि आईच्या संसारोत्सुक डोळ्यात
तव्यावरील आक्रिताचे 
नि:शब्द प्रतिबिंब.
डोळ्यातील चिपाडे काढत 
तो बघत राही उष्ण तव्यावरील 
तीळातीळाचे स्थित्यंतर.
‘इतक्‍यात कशाला उठलास बावळटा,
झोप जा! मी उठवीन तुला...’ मंद हसून
म्हणे आई, तेव्हा त्या स्थित्यंतरामागील
श्रमिक हातांचे गूढ त्याला कळले नाही.
आणि आताशा-
कंपनीतल्या एचआर डिपार्टमेंटची कुणी
उच्चशिक्षित, 
व्यवस्थापनकुशल एग्झिक्‍युटिव
व्यक्तिमत्त्व विकासाविषयी विचारते : 
‘व्हॉट्‌स हलवा ड्यूड? वो फिश है ना?’
तेव्हाही काय उत्तर द्यावे, हेही त्याला 
अजूनही कळत नाही.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भूतकाळातील समृद्ध
 अडगळ दुर्लक्षिताना,
मोबाइलमधल्या शुभेच्छा
 देताना-घेताना,
आदिम टोळीयुद्धांप्रमाणे चाललेल्या
राजकीय सूडबाजीच्या दंगली पाहताना,
जगण्याच्या बुंध्यावरचा कडूजहर 
द्रव ओघळताना, अनुभवताना,
तीळाच्या स्थित्यंराचे काव्य
हरपून गेल्याची जाणीव 
त्याला हटकून होते
...पण तीही कधीकधीच.
 फक्त अशाच एखाद्या वेळी
त्याला आठवतो, प्राजक्तासम 
फुललेला तो काटेदार हलवा,
खमंग तीळगुळाच्या लाडवांचे
तळव्यावरले सौहार्द, आणि
‘गोड बोला’ या दोनच शब्दांमधली
आताशा दुर्मिळ होत गेलेली अपेक्षा.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्या अपेक्षांची साखरफुले
तुमच्याही आयुष्यात उमलोत.
भलाईचा तीळगूळ तळात बदलो.
एवढेच.
...मकर संक्रांतीच्या 
हार्दिक शुभेच्छा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article about makar sankranti

Tags
टॉपिकस