ढिंग टांग  : अश्रूंची झाली फुलेच फुले!

ढिंग टांग  : अश्रूंची झाली फुलेच फुले!

सदरहू मजकूर आम्ही डबडबलेल्या डोळ्यांनी लिहीत आहो! आमचा कृषी कायद्याइतकाच काळा रंग रडून रडून अधिकच काळवंडला आहे. ओठांची टोंके हनुवटीच्या दिशेने खाली ओढली गेली असून घशात हुंदका दाटून आलेला आहे. रात्री डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी उशीचा आभ्रा काढून, घट्ट पिळून उन्हात वाळत टाकावा लागला. डोळे गाळून आम्हाला इतके डिहायड्रेशन झाले आहे की सकाळपासून लिंबूपाण्यावर आहो. आम्ही इतके धाय मोकलून रडत असताना कुणी शांतवनालाही उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शांतवन कुणी कुणाचे करायचे? इथे सारेच अश्रूंच्या महासागरात गटांगळ्या खाताहेत! उदाहरणार्थ, आम्ही (रडत रडत) शेजारच्या बंडूनानांकडे (रोजचा पेपर उचलण्यासाठी) गेलो असता, तेदेखील हमसाहमशी रडताना दिसले. त्यांना कसेबसे विचारले, ‘की बुआ, तुम्ही का रडता?’’ तर त्यांनी गगनभेदी हंबरडाच फोडला. वास्तविक बंडूनाना हे काही रडणाऱ्यांपैकी नाहीत. जाज्वल्य देशभक्तीने भारलेला हा शेजारी आहे, म्हणून देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असे आम्ही नेहमी म्हणतो. पण तेही रडताना पाहून आमचा धीर खचला… आम्ही पुढली वाट धरली…

कोपऱ्यावरील पानाच्या टपरीवर जाऊन उभे राहिलो तर तेथेही हीच परिस्थिती. पानवाला पुरभय्या सदऱ्याच्या बाहीने डोळे पुसत पानावर चुन्याची दांडी फिरवत होता. नाक शिंकरुन त्याच हाताने किवाम पानाला चोळत त्याने ‘‘लौंग की इलायची?’’ हे विचारतानाही पाच हुंदके दिले. आम्हीही घसा खाकरुन तीन हुंदके परतवत त्याने पुढे केलेले (किवामयुक्त) पान मुखात सारताना ‘मांडून ठेव’ असे सांगून निघालो. त्यावर त्यानेही आमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात (उधारीच्या निषेधार्थ ) काही अनुदार उद्गार काढल्याचे ऐकू आले, पण आम्ही दुर्लक्ष केले. उधारी मागण्याचा हा रडीचा डाव आम्हाला बिलकुल पसंत नाही. असो. कालांतराने आमच्या लक्षात आले की आपण एकटेच नव्हे तर एकशेसदोतीस कोटी लोक एकसमयावच्छेदे रडून ऱ्हायले आहेत! न रडणारा इसम आम्हाला आख्ख्या देशात शोधून सांपडेना!! टीव्हीवरील बातम्या सांगणारी अँकरकन्याही डोळे पुसत ‘आजच्या ठळक बातम्या’ ठळक अश्रू गाळत सांगत होती. आता बोला!

एक दोघांना विचारुन पाहिले. की बुवा, तुम्ही इतके का रडताहा? हल्ली शेतकरी शेताच्या बांधावर न भेटता हायवेबियवेला भेटतात, असे आमचे सूक्ष्म निरीक्षण आहे. त्यानुसार एका शेतकऱ्याला विचारले.

‘‘आमचे नेते राकेश टिकैतजी भर रस्त्यात रडले, आम्ही कां नको रडू?’’ त्याने काहीच्या काहीच करारी आवाजात आम्हाला सुनावले. आम्हाला ते मनोमन पटले. कां की आम्हीही त्याच कारणाने रडत होतो.

-‘‘भर राज्यसभेत आमचे मोदीजी रडले, मग आम्हाला रडायला नाही का येणार?’’ असे एका राष्ट्रभक्ताने करारी आवाजात सांगितले. आम्हाला तेही मनोमन पटले. कां की आम्हीही त्याच कारणाने रडत होतो. -‘‘भर राज्यसभेत आमचे गुलाम नबी आझादजी निवृत्त होता होता रडले, आम्हाला रडायला येणारच ना?’’ असे एका कांग्रेसभक्ताने तितक्याच करारी आवाजात सांगितले. तेही आम्हाला मनोमन पटले. कां की, आम्हीही त्याच कारणाने रडत होतो.

…या अश्रूंची फुलेच फुले होऊन लौकरच संपूर्ण देशात अच्छे दिनांचा परिमळ पसरेल, असा

विश्वास व्यक्त करुन आम्ही डोळे पुसले, आणि पुन्हा ताज्या अश्रूंचे उत्पादन सुरु केले. 

चीअर्स फॉर टिअर्स!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com