esakal | ढिंग टांग : वादळ माणसाळतंय! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : वादळ माणसाळतंय! 

मुंबईच्या किनाऱ्यावर आदळणार सगळी वाट लागणार,असं म्हणत होते सगळे! तू सूचना दिल्या होत्यास त्याप्रमाणे,मी तर अडीअडचणीला उपयोग होईल,म्हणून मोबाइल चार्ज करून ठेवला होता!पाणी भरून ठेवलं होतं! ...पण काहीच घडलं नाही!

ढिंग टांग : वादळ माणसाळतंय! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सदू : (फोन फिरवत) जय महाराष्ट्र...बरं का! 

दादू : (खुशीखुशीत) जय महाराष्ट्र! सदूराया...आत्ता माझ्या हातात साबुदाणा वडा आहे! चटणीसकट! तोसुद्धा दादरच्या सुप्रसिद्ध ‘प्रकाश’चा! 

सदू : (शांतपणे) मीच पाठवलाय तो! मराठी माणसानं पुन्हा हाटेल चालू केलं, या आनंदाप्रीत्यर्थ मी सगळ्या नवनिर्माणाच्या शिलेदारांना पाठवलंय पार्सल! 

दादू : (संशयानं) पण मी कुठे तुझ्या नवनिर्माणाचा शिलेदार आहे? मी मावळा आहे, मावळा!! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सदू : (थंड आवाजात) साबुदाणावडा खाणारा मर्द मावळा! जरा जपून! मिरची लागेल!! 

दादू : (छाती पुढे काढत) कळतात बरं ही बोलणी!! पण तुमच्या या टोमणेबाजीपुढे नमणारा मी नव्हे!! चक्रीवादळाच्या छाताडावर पाय रोवून उभा मीच राहिलो! तुम्ही नव्हे!! 

सदू : (नमतं घेत) हे मात्र अगदी खरं हं!! मानलं तुला!! 

दादू : (फुशारक्‍या मारत) संकटाशी जो झुंज घेतो, तोच खरा मर्द मावळा असतो! मी तीन-तीन संकटांशी एकाच वेळी झुंजणारा योद्धा आहे! जणू चक्रव्यूहातला आधुनिक अभिमन्यूच!! 

सदू : (कुतुहलानं) तीन-तीन संकटं कुठली? 

दादू : (खुलासा करत) कोरोना, चक्रीवादळ

आणि विरोधक!! झाले की तीन!! 

सदू : (गंमतीनं) चक्रीवादळ येणार नाही, असं तू छातीठोकपणे सांगत होतास, ते कशाच्या जोरावर? मी तर च्याटच पडलो! तुझा अंदाज हवामान खात्यापेक्षाही खरा ठरला!! 

दादू : (विलक्षण खुश होत) मी आधीच म्हणालो होतो! हे फडतूस चक्रीवादळ मुंबईवर चाल करून येणार नाही! नाही म्हंजे नाहीच येणार! अर्थातच नाही येणार!! किंबहुना, लेकाचं बाजूबाजूनी निघून गेलं, पण मुंबईला आलं नाही!! येईलच कसं? नाहीच येणार! अर्थातच नाही येणार... 

सदू : (घाईघाईने) कळलं कळलं! पण ते मुंबईच्या बाजूनं कसं गेलं, हे कोडंच आहे मला!! वादळ घोंघावत येणार, मुंबईच्या किनाऱ्यावर आदळणार, आणि सगळी वाट लागणार, असं म्हणत होते सगळे! तू सूचना दिल्या होत्यास त्याप्रमाणे, मी तर अडीअडचणीला उपयोग होईल, म्हणून मोबाइल चार्ज करून ठेवला होता! पाणी भरून ठेवलं होतं! ...पण काहीच घडलं नाही! शेवटी आज सकाळी तेच पाणी तापवून आंघोळ केलीन! 

दादू : (विजयी मुद्रेने) दे टाळी! मी स्वत: यातलं काहीच केलं नाही! कारण चक्रीवादळ मुंबईला येणारच नाही, याची खात्रीच होती मला!! 

सदू : (खोट्या कौतुकानं) कमाल आहे बुवा तुझी! कसं जमतं बुवा तुला? आम्ही इथे जीव मुठीत धरून बसलो होतो! वादळ आलंच नाही, याचं सारं श्रेय तुला बरं! 

दादू : (खालच्या आवाजात) कुणाला सांगू नकोस! मी त्या वादळाला चांगलाच दम भरला होता! म्हटलं, मुंबईच्या दिशेनं वाकड्या नजरेनं बघितलंस, तर गरागरागरागरा फिरवून फेकून देईन लांब!! घाबरलं ते! गेलं पळून!! हाहा!! 

सदू : (हतबुद्ध होत) बाप रे! 

दादू : (भान हरपून) सोडतो की काय! अंगावर आलं की शिंगावर घेण्याची सवय आहे आपली! असल्या किरकोळ वादळांना कोण भीक घालतो? हॅ:!! 

सदू : (विषय शिताफीने बदलत) आलं असतं वादळ तर काय केलं असतंस, दादूराया? 

दादू : (बेसावधपणे) काही नाही रे! मी कॅमेरा रेडी ठेवला होता! फोटोबिटो काढले असते! हा ‘कोरोना’ही आता असाच हाकलणार आहे मी! बघशील तू!! 
सदू : (सुस्कारा सोडत) तू तर त्या नमोजींपेक्षाही पुढे गेलास की रे! जय महाराष्ट्र!!