ढिंग टांग : म्हारे हिवडा में नाचे मोर...

Narendra modi
Narendra modi

मुलांनो, सांगा बरं, आपला राष्ट्रीय पक्षी कोणता? सांगा, सांगा! गण्या, तू सांग बरं! क्काय?..क...क...कोंबडी? कोंबडी म्हणालास? ऑनलाइन क्‍लास आहे म्हणून, नाहीतर खापलला असता असता तुला कोंबडीच्या! शाळा एकदा नीट सुरू होऊ दे, मग बघतो तुला!!  कोंबडी काय कोंबडी? श्रावण-भाद्रपदाचे दिवस आणि कोंबडी आठवतेय तुला? गाढव लेकाचा! 

...तर मुलांनो, मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. 

मोराला शास्त्रीय परिभाषेत ‘पावो क्रिस्टाटस’ असे नाव आहे. तो ‘पावो पावो’ असे ओरडतो, म्हणून त्याला हे नाव पडले असेल. काय म्हणालात? मोर पाव खातो? चूप...एकदम  चूप! मोर कशाला पावबिव खाईल? नॉन्सेन्स! मोर शेंगदाणे खातो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोराला पिसारा असतो आणि वेळी- अवेळी मूड लागला की तो आपला पिसारा फुलवतो व नाचू लागतो. तो फक्त आंब्याच्या वनातच नाचतो, असा आपल्याकडे उगीचच एक गैरसमज आहे. मोर कुठेही नाचतो. त्याचा मोठ्ठा पिसारा फुलवून फुलवून नाचतो. पुढून बघणाऱ्याला वाटतं आहा! किती सुंदर!! किती रंगबिरंगी! किती मनमोहक! मागून बघणाऱ्याला मात्र...जाऊ दे.

म्हारे हिवडा में नाचे मोर...असं एक राजस्थानी गाणं आहे. हिवडा म्हटल्यावर येवढं दात काढायला काय झालं? मूर्ख कुठले! हिवडा म्हणजे राजस्थानी भाषेत हृदय ! ‘माझ्या हृदयात मोर नाचू लागला आहे’ असा त्याचा अर्थ.

मुलांनो, ‘७, लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली, हे आपल्या देशाचं हृदय आहे, हृदय ! तिथं मोर नाचणारच. हो की नाही? या पत्त्यावर आपले अतिशय लाडके प्रधानसेवक राहतात. त्यांच्या अंगणात ते योगासने करतात. ते पाहायला मोर येतात. योगासनांमध्ये मयुरासन नावाचे एक योगासन आहे. दोन्ही हातांच्या पंज्यांवर आपले आडवे शरीर तोलायचे! भयंकर अवघड  योगासन आहे. तोल गेला तर, पुढचे दात पडायची भीती असते.!!  काय म्हणालास गण्या? करून दाखवा? बघतोच तुला शाळा सुरू झाल्यावर...नाही मोर केला तुझा तर नावाचा नाही मी!! गधडा!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपले प्रधानसेवक किनई खूप प्रतिभावान कवी आहेत. मॉर्निंग वॉक घेताना त्यांना अंगणात एक मोर दिसला. त्यांच्या अंगणात खूप मोर येतात. कधी उघड उघड येतात, कधी लपून छपून येतात-मोर लेकाचे! कधी दारातच चौकीदारासारखे उभे राहतात. म्हणतात, चौकीदार मोर है!! ते जाऊ दे. 

...अंगणातला मोर बघून त्यांनी त्याला काही शेंगदाणे दिले. (खिशात होतेच!) मोरांनी खाल्ले आणि खूश होऊन पिसारा फुलवलान! असे कुणी फुकट शेंगदाणे दिल्यावर कोण पिसारा फुलवणार नाही? 

भोर भयो, बिन शोर
मन मोर, भयो विभोर
रग रग है रंगा, नीला भूरा श्‍याम सुहाना,
मनमोहक, मोर निराला...

...किती सुंदर ओळी आहेत या! अहाहा!! मोराला शेंगदाणे टाकताना प्रधानसेवकांना या ओळी स्फुरल्या. ‘भोर भयो, बिन शोर’ म्हणजे बिना आवाजाची सकाळ झाली! आता हे थोडं कठीण आहे. पण तेही जाऊ दे. 

...ही कविता पूर्ण पाठ करून टाका हं. सिलॅबस बदलला की तुमच्या पाठ्यपुस्तकातही त्याचा समावेश होणार आहे! पुढल्या वेळेला याच कवितेला आपण चाल लावूया. 

आता मला सांगा, आपल्या हिवड्यात मोर नाचतो, पण मोराच्या हिवड्यात कोण नाचत असेल?..गण्या तूच सांग रे! हां...करेक्‍ट! हुशार आहात कार्ट्यांनो!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com