esakal | ढिंग टांग : दोन वाढदिवस! 
sakal

बोलून बातमी शोधा

birthday

काळाचा महिमा कसा ते पहा, आपण दोघेही खरे तर एकत्र सत्तेत असणार होतो, पण आज मी (मास्क लावून) विरोधी पक्षनेता म्हणून हिंडतो आहे आणि तुम्ही मात्र (मास्क लावूनच) मंत्रालयात ऐटीत जात-येत आहा!!

ढिंग टांग : दोन वाढदिवस! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रिय मित्रवर्य मा. दादासाहेब यांसी शि. सा. न. सप्रेम न.! सर्वप्रथम वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा! प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्यायला (आणि घ्यायला) फार आवडले असते. पण सध्याच्या काळात (तरी) ते शक्‍य दिसत नाही. तेव्हा लांबूनच अभीष्ट चिंतीत आहे, कृपया गोड मानून घ्यावे. एखादा पुष्पगुच्छ पाठवावा, असा विचार होता. पण तो विचारही रद्द करावा लागला. शक्‍यतो होम डिलिवरीही टाळावी, असे वाटते. 

आपल्या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो, हे कळल्यावर माझा आनंद गगनात मावेना. किती विलक्षण योगायोग आहे, नाही का? तसे खूप योगायोग आपल्याबाबतीत घडले आहेत. यंदा मीदेखील लांबूनच शुभेच्छांचा स्वीकार करायचे ठरवले आहे. 

दादासाहेब, आपली फारा दिवसांत गाठभेट नाही. काही महिन्यांपूर्वी एका लग्नाच्या वऱ्हाडात भेटलो होतो. अक्षता टाकायला दोघेही बाजूबाजूलाच उभे होतो. (दोन-चार मी तुमच्या डोक्‍यातही टाकल्या होत्या! आठवतंय?) पण तेव्हा (लेकाचे) मीडियावाले टपून बसलेले होतेच. त्यांनी बातमीचा बाइट करून वीट आणलान! पण त्यानंतर सगळेच बदलले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काळाचा महिमा कसा ते पहा, आपण दोघेही खरे तर एकत्र सत्तेत असणार होतो, पण आज मी (मास्क लावून) विरोधी पक्षनेता म्हणून हिंडतो आहे आणि तुम्ही मात्र (मास्क लावूनच) मंत्रालयात ऐटीत जात-येत आहा!! एकेकाळी आपण जोडीने शपथ घेतली होती, हे विसरलात तर नाही ना? दोघांनी एकदिलाने राज्य करावे, असा आपला कित्ती छान बेत होता, लेकिन ये हो न सका, और अब न रहे वो अरमान...जाऊ दे. 

ते (शपथविधीचे) पहाटेचे स्वप्न होते. पहाटेची स्वप्ने खरी होतात, असे म्हणतात. मी वाटत पाहातो आहे!! पाहू या, कधी खरे होते ते!! वाढदिवसाच्या पुनश्‍च एकवार शुभेच्छा. पहाटेच नव्हे, तर अष्टौप्रहर आपला. 

नानासाहेब फ. 
वि. सू. : (आघाडीत) सोशल डिस्टन्सिंग पाळा. (अन्य पक्षनेत्यांशी भेटल्यावर ) वारंवार हात धुवा आणि (कारभार चालवताना तूर्त) मास्क लावा! 

..............................

प्रिय मित्र नानासाहेब, अनेक उ. आ. आणि स. न.! आपले शुभेच्छापत्र मिळाले. धन्यवाद. योगायोगाने तुमचाही आजच बर्थडे असल्याचे कळले. तोदेखील पन्नासावा!! हॅप्पी बर्थ डे!! आजचा दिवस कुठेही दौरे न काढता घरी राहून शिकरण वगैरे खा! खाण्याआधी आणि नंतर हात वारंवार धुवा! सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि मास्कदेखील वापरा, असा वडिलकीचा सल्ला देतो. हा सल्ला राजकीय नाही, याची नोंद घ्यावी. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो, हे पहिल्यांदा कळले तेव्हा खरे तर पोटात गोळा आला होता. तारीख बदलून घेण्याची सोय आहे काय याचीही मुख्य सचिवांकडे चौकशी (क्वेरी) केली. त्यांनी "निधीअभावी शक्‍य नाही' असा शेरा मारून क्वेरी परत पाठवली. या गृहस्थांस काय म्हणावे? जाऊ दे! 

ते पहाटेच्या अंधारातल्या शपथेचे प्रकरण मी विसरलो आहे. पहाटेची सर्व स्वप्ने साकार होतात, ही अंधश्रद्धा आहे आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्त्वात आहे. काही लोकांना दुपारी झोप काढतानाही स्वप्ने पडू शकतात आणि योगायोगाने ती खरीही होतात. आपण प्रयत्न करून पहायला हरकत नाही. 

जास्त काही लिहीत नाही. पुन्हा शुभेच्छा. (दिवसाढवळ्या) कधीतरी भेटूच. सस्नेह. 
दादासाहेब बारामतीकर. 
ता. क. : लस आल्यावरच भेटणे इष्ट होईल !