esakal | ढिंग टांग : परमिशन! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : परमिशन! 

""महाराष्ट्राची वेस ओलांडताना तुम्हाला आमची परमिशन घ्यावी लागेल. ती मिळाली तरच एण्ट्री! कळलं? निघा!!,'' राजेसाहेब म्हणाले. आम्ही मान डोलावली व निघू लागलो. निघता निघता आम्ही तोंडावरचा मास्क काढला.

ढिंग टांग : परमिशन! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

""खामोऽऽश! जीव प्यार असेल तर, असाल तिथेच थांबा!!,'' कानात शिसे ओतावे, तैसे जळजळीत उद्गार ऐको आले आणि आमचा होशच उडाला. तलवारीचे टोंक आमच्या करेक्‍ट छातीवर टेकलेले होते. -जिथे हृदय असते ना, अगदी तिथे! 

समोर जणू कळीकाळ रुद्र उभा ठाकला होता. डोळे अंगार ओकत होते. नाकपुड्यांमधून त्वेषयुक्त उच्छ्वास बाहेर पडत होते, जणू रेल्वेचे धडाडणारे इंजिन!! तलवारीच्या टोकावर आलेल्या आमच्या बिच्चाऱ्या चिमुकल्या हृदयाची धडधड लॉकडाउनमधल्या इंजिनासारखी बंद पडत्ये की काय, अशी भीती वाटो लागली. आमच्या देहाच्या कानाकोपऱ्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या. अंगरखा सोडा, मांडचोळणादेखील भिजून ओलाचिंब झाला. समोर साक्षात नवनिर्माणक, परप्रांतीय निर्दाळक महाराष्ट्ररक्षक आदरणीय राजेसाहेब उभे होते. 

हे काय भलतेच जहाले? पोशिंद्यानेच हातात तलवार घेतली, तर रयतेने कोठे जावे? वास्तविक महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या आणाभाका घेताना आम्ही त्यांच्यासमवेत होतो. परप्रांतीय उपऱ्यांची टाळकी सडकण्याच्या आंदोलनात आम्हीही सहभागी होतो. टोलनाक्‍यावर टायरे जाळण्यापासोन मराठीचा दुस्वास करणाऱ्या दुकानदारांच्या काचांचे "खळ्ळ-खट्याक' करण्याच्या कामी आम्हीही दोन-चार दगडांचे थोडके स्थलांतर घडवले होते. परंतु, तेच आमचे परमदैवत आमच्याच छाताडावर तलवार टेकवताना पाहोन आम्ही पुरते हादरलो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

""पुढे याल तर जिवाला मुकाल! भलते धाडस करों नका!'' तलवारीचे टोक नाकापासून फिरून पुन्हा छातीवर येऊन टेकले. तलवारीमागल्या आवाजीत जबर्दस्त जरब होती. धाक होता आणि दपटशादेखील होता. जरब, धाक वगैरे ठीक आहे, ही दपटशाची भानगड काय ते एकदा पाहून ठेवले पाहिजे, असा एक वाभरा विचार मनात डोकावून गेला. 

""गैरसमज होतो आहे साहेब! लेकरास क्षमा करावी!'' आम्ही गुडघे टेकून म्हणालो. आम्ही अचानक गुडघे टेकल्याने राजियांचा नेम चुकला. तलवारीचे टोक आमच्या डोईवर दोन फूट तरंगू लागले. 

""खबर्दार जर्टाच मारुनि जाल पुढे चिंधड्या..'' राजे गर्जले. आमचे नाव "चिंधडे' नाही, असे आम्ही सांगू पाहात होतो, परंतु, नरड्यातून शिंचा येक शब्द फुटेना! 

""उडवीन राई राई एवढ्या,'' कवितेची ओळ पुरी करताना राजेसाहेबांनी कांदा कापण्याची एक्‍शन केली. आम्ही निमूटपणाने मान तुकवली. 

""रोजीरोटीची सोय होत होती, तोवर इथं, आमच्या मुलखात येवोन ठाण मांडिलेत! यथास्थित गिळलात!! आता संकटकाळात आमची प्रिय मुंबापुरी सोडोन मुलखाकडे पलायन करणाऱ्या अप्पलपोट्या उपऱ्यांनो, तुमची खैर नाही!'', गरागरा डोळे फिरवीत राजेसाहेबांनी निर्वाणीचा इशारा दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

""आहो, आम्ही आपल्या कटकातलेच लोक...'' आम्ही गयावया सुरू केली. पण राजियांच्या कानी ती पडलीच नाही. 

""येता परत, जाता सुरत!'' राजियांनी दम भरला. आमची आधीच गाळण उडाली होती. त्यात हा टग्या दम!! आता काय करावे? 

""महाराष्ट्राची वेस ओलांडताना तुम्हाला आमची परमिशन घ्यावी लागेल. ती मिळाली तरच एण्ट्री! कळलं? निघा!!,'' राजेसाहेब म्हणाले. आम्ही मान डोलावली व निघू लागलो. निघता निघता आम्ही तोंडावरचा मास्क काढला. 

""तू होय! मग असा परप्रांतीयाचा वेश करोन काये आलास?'' राजेसाहेबांनी किंचित ओशाळून विचारले. तलवार खाली आणली. 

""लॉकडाऊनमुळे मास्क लावणे अनिवार्य जहाले आहे, साहेब! काय करू? आम्ही तनमनाने तुमचेच आहो! येक विचारायचे होते...'' आम्ही म्हणालो. 

""विचार!'' राजियांनी परमिशन दिली. 

""परत येऊ पाहणाऱ्या परप्रांतीयांसाठी परवानगीचे अर्ज आपण ऑनलाइन उपलब्ध करून द्यायचे का? मराठीत की हिंदीत?''