esakal | ढिंग टांग : वेलकम राफेल !
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : वेलकम राफेल !

राफेल विमानं भारतात येण्यात त्या मोदीजींचं काहीच काँट्रिब्युशन नाही! होम डिलिवरीमार्फत मागवलेली वस्तू सही करून ताब्यात घेणाऱ्या माणसाला ती वस्तू खरेदी केल्याचा दावा कदापि करता येणार नाही! 

ढिंग टांग : वेलकम राफेल !

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीप्रमाणे उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम  बॅक!

मम्मामॅडम : (सूचनांचा भडिमार करत) हं! तिथे सॅनिटायझर ठेवला आहे, हाताला लाव! तोंडावरचा मास्क काढू नकोस! बाहेर हिंडू नकोस! कुठे गेला होतास? कधी आलास?

बेटा : (दोन्ही हात पसरवत ) हा काय आत्ताच येतोय! 

मम्मामॅडम : (जाब विचारल्यागत) ते कमळवाले म्हणतायत की तू फॉरेनला गेलास म्हणून! फॉरेनला सुरक्षित बसून व्हिडिओमार्फत टीका करत बसलायस, असा आरोप आहे त्यांचा!! 

बेटा : छे! लॉकडाउनमध्ये मी फॉरेनला कसा जाणार?

मम्मामॅडम : (संशयानं) एकच निळा शर्ट घालून तू रोज नवे व्हिडिओ प्रसारित करतोस, असं त्यांचं म्हणणं आहे! 

बेटा : (संयमानं) त्यांचा आक्षेप नेमका कशाला आहे? माझ्या व्हिडिओला की शर्टाला? (विषय बदलत) ते जाऊ दे! माझी विमानं पाहिलीस की नाही? झुंईकन लॅंड झाली! मी टाळ्या आणि थाळ्या दोन्ही वाजवल्या!!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या...) तुझी विमानं?

बेटा : अर्थात माझीच विमानं! फ्रान्सच्या पीएमनीसुद्धा मला मेसेज पाठवलाय,- ‘‘काँग्रॅच्युलेशन्स आणि थॅंक्‍यू!’’

मम्मामॅडम : अरे, याच विमानांना तू किती विरोध केला होतास? भ्रष्टाचाराचे किती किती आरोप केलेस? ‘चौकीदार चोर है’ वगैरे विसरलास? कोर्टापर्यंत गेलं होतं की प्रकरण!!

बेटा : (चतुर चेहऱ्यानं) वेल, दॅट वॉज द स्ट्रॅटेजी!!

मम्मामॅडम : (अविश्वासानं) म्हंजे तुझा विरोध खोटा खोटाच म्हणायचा?

बेटा : (उमदेपणाने ) बिलकुल नाही! ती माझी भूमिका कायम आहे! लेकिन, जो होना था, सो हुआ! राफेल विमानांचं मी खुल्या मनानं स्वागत करतो! आफ्टरऑल माझ्यामुळेच ती आपल्या देशात आली आहेत, हे विसरू नका!!

मम्मामॅडम : (आश्‍चर्याचा धक्का बसून) क्काय? तुझ्यामुळे? कसं काय बुवा?

बेटा : (अभिमानाने) अफकोर्स! माझ्यामुळेच!! इन फॅक्‍ट, राफेल विमानं भारतात येण्यात त्या मोदीजींचं काहीच काँट्रिब्युशन नाही! होम डिलिवरीमार्फत मागवलेली वस्तू सही करून ताब्यात घेणाऱ्या माणसाला ती वस्तू खरेदी केल्याचा दावा कदापि करता येणार नाही! 

मम्मामॅडम : मला काहीही समजलं नाही तुझं बोलणं!

बेटा : (अंगठा-तर्जनी जुळवत) मैं बताता हूं! देखिए, समझो की मैंने ‘अमेझॉन’से एक किताब खरीदी! पैसेभी दे दिए और अहमदअंकलने कुरिअरवाले को साइन देकर डिलिवरी ले ली! तो क्‍या वो किताब मुझे अहमदअंकलने गिफ़्ट दे दी? नहींऽऽ....

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मम्मामॅडम : (खुर्चीत मटकन बसत) कठीण आहे! 

बेटा : (पोक्तपणानं) ऐक! राफेल विमानंच विकत घ्यावीत हे कोणी ठरवलं?

मम्मामॅडम : (कोरडेपणानं) आपल्याच सरकारचा तो निर्णय होता, पण-

बेटा : (तळहातावर मूठ आपटत) करार कोणी केला?

मम्मामॅडम : (असहायपणे) आपणच, पण-

बेटा : (पॉइण्ट स्कोर करत) राफेलची सर्वात जास्त जाहिरात कोणी केली? राफेल हे नाव जनतेच्या ओठाओठांवर कोणामुळे घोळू लागलं? आता काहीही झालं तरी राफेलच आणायचं, असं मोदीजींनी कोणामुळे ठरवलं? राफेल विमानं आल्यावर सर्वांना कोणाची सर्वात जास्त आठवण आली? सांगा, सांगा ना! उत्तर एकच आहे- माझ्यामुळे!!

मम्मामॅडम : (खचलेल्या सुरात) ओह गॉड!

बेटा : (विजयी मुद्रेने) इन फॅक़्ट, राफेल इज माय थिंग! कळलं? वेलकम राफेल!