esakal | ढिंग टांग :  घुसखोर!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  घुसखोर!

‘‘माझा देश म्हंजे धर्मशाळा वाटली काये? बंद करा या घुसखोरांचे लाडलाड!’’ राजेसाहेब गरजले, तेव्हा आम्ही माना डोलावून एका गुडघ्यावर बैसोन प्रतिज्ञेची पोज घेतली. नुकताच ‘तान्हाजी’ बघून झाला होता. त्याचा आमच्या मनावर परिणाम नाही म्हटले तरी झालाच होता.

ढिंग टांग :  घुसखोर!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

‘‘माझ्या महाराष्ट्रातला शेवटला घुसखोर हुस्कून बाहेर काढेपर्यंत आता थांबणे नाही, नाही, नाही!,’’ ताडताड चालत येत राजेसाहेब काडकाड बोलले, तेव्हा आम्हा सर्व उपस्थित मनसैनिकांची छाताडे धाडधाड उडू लागली. राजेसाहेबांच्या फाडफाड वाक्‍ताडनाने महाराष्ट्र हादरला. घुसखोर घाबरोन बिळात शिरोन बसले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘माझा देश म्हंजे धर्मशाळा वाटली काये? बंद करा या घुसखोरांचे लाडलाड!’’ राजेसाहेब गरजले, तेव्हा आम्ही माना डोलावून एका गुडघ्यावर बैसोन प्रतिज्ञेची पोज घेतली. नुकताच ‘तान्हाजी’ बघून झाला होता. त्याचा आमच्या मनावर परिणाम नाही म्हटले तरी झालाच होता.

पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या दोन कोटी घुसखोरांना टिपून टिपून हुडकून देशातून कायमचे ‘हाडहाड’ करण्याचा संकल्प आम्ही सोडिला, तो दिवस सुवर्णाक्षरांनी लेहून ठेविण्याजोगाच.

‘‘तुम्हाला पक्षाचा कार्यक्रम हवा होता ना? हा घ्या...काढा घुसखोर टिपून बाहेर!’’ राजेसाहेब आमच्याकडे पाहून म्हणाले. आम्ही एकमेकांकडे पाहिले. कार्यक्रम कोणाला हवा होता हिते? पण राजेसाहेब म्हंटात म्हंजे कार्यक्रम हवाच असणार. आपुण काही त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. ‘मोर्च्याला उत्तर मोर्च्याने’ असे सांगून त्यांनी मोर्च्याची हाक दिली होती. संडे असून आपण इज्जतीत मोर्च्याला आलो. वास्तविक घरी कोंबडीवडे केले होते. पण मनाशी म्हणालो, ‘‘कोंबडी गेली झन्नममध्ये. घुसखोरांची अंडीपिली काढणं हे खरं काम आहे!’’

‘‘लादेन कुठं सापडला होता, सांगा!,’’ राजेसाहेबानी सवाल केला. कुठेशी सापडला होता बरं? अं...अं...अं...शेजारच्या मनसैनिकाला ढोसकला तर त्याने खांदे उडवून ‘आपल्याला काय म्हाईत?’ अशा अर्थाचा ओठ काढला.

‘‘अरे लेको, पाकिस्तानात सापडला नाही का?’’ राजेसाहेबांनी स्वत:च वैतागून उत्तर दिले.

‘अरेहोक्‍की!’ अशा अर्थाने आम्ही रुकार दिला.

‘‘या उपऱ्यांबद्दल मी आज बोलत नाहीए...गेली कित्येक वर्षं ओरडतोय! घुसखोरांविरुद्ध पहिला आवाज उठवणारा मी होतो! हे लोक आत्ता कायदे करताहेत!!’’ राजेसाहेब म्हणाले. हे मात्र शतप्रतिशत खरे होते.

‘‘सीएए म्हंजे काय? ए...तू सांग रे!’’ अचानक राजेसाहेबांनी आमच्याकडे बोट दाखवून आदेश दिला. आम्ही मागे वळून पाहिले. मागे कोणीच नव्हते. बाप रे!

‘‘सीएए म्हंजे आपलं ते हे-’’ आम्ही आठवायचा प्रयत्न केला. ‘चोरून आलेली अवलाद’ असा फुलफॉर्म असेल्का? असणारच. पण ते सांगायचे धैर्य आम्हाला झाले नाही. भिवया वक्र करोन राजेसाहेब आमच्याकडे रोखुनिया पाहो लागले. आम्ही आणखीनच गळाठून गेलो.

‘‘नाही ना ठाऊक? शाब्बास!’’ राजेसाहेबांनी आमची चक्‍क पाठ थोपटलीन! आम्ही हुश्‍श केले.

‘‘सीएए म्हंजे काय हे कोणालाच धड ठाऊक नाही आणि लेकाचे मोर्चे काढताहेत! अरे चार ओळीचा कायदा; पण त्याबद्दल अज्ञान चारशे ओळींचं!’’ राजेसाहेब म्हणाले. 

सीएए म्हंजे नेमके काय, हे आम्हाला खरोखर आजही कळलेले नाही. काहीतरी बेक्‍कार कायदा आहे, असे काही लोक म्हणतात खरे. पण तो एक नंबरचा भारी कायदा असल्याचे काही लोकांचे मत आहे. -तेही खरे असावे! आम्ही मधले लोक! आम्ही काय करणार?

‘‘तुम्ही म्हणाल तसं, साहेब! ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हटलं की लावला, ‘बंद कर रे तो व्हिडिओ’ म्हटलं की तस्सं..!,’’ अनवधानाने आम्ही बरळलो.

तत्क्षणी नजरेने अंगार ओकत राजेसाहेब आमच्यासमोर कमरेवर हात ठेवोन उभे राहिले, म्हणाले, ‘‘कोण रे तू?’’

आमची बोबडीच वळली. मुखातून शब्द फुटेना! तेवढ्यात बोट रोखून राजेसाहेब ओरडले-

‘‘घुसखोर लेकाचा...काढा रे याला बाहेर! बाहेर...बाहेर...बाहेर...’’(इको इफेक्‍ट) 

तूर्त दडून बसलो आहो! असो.