ढिंग टांग : गावात सर्प आला!

ब्रिटिश नंदी
Wednesday, 29 July 2020

सर्पाच्या भीतीनं गावगाडा नासला
वस्तीवाडं मुकं झालं, समदा बेत फसला
निम्मं गाव भीतीनं म्येलं, निम्मं भुकेनं ग्येलं
येका जहरी सरपानं बगा, काय काय क्‍येलं

एक दिवस गावात उठली जोरात बोंब
छपरावर कोसळला जनू अज्जी आगडोंब
बोंब उठली, अन्नाच्या मळ्यात उठलंया जित्राब
मांडीयेवडं जाड आन लांबडं आडमाप

बांधावरनं चालला व्हता शेलाराचा भिवा
आपल्याच नादात गुनगुनत- ‘‘मेरेकू लौ हुवा!’’
चालता चालता थबकला, दात ग्येलं घशात
थितंच ह्यो बाबा दिसला आडवा ऊन खात

तरनाताठा भिवा त्येला बघूनच गळपाटला
थरथराट झाल्यागत थितनं दन्नाट पळाला
घाम फुटला अक्षी, धोत्तार झालं वलं!
सैतानाला प्वॉर झालं, हडळीला पिलं?
आगंबाबौ! द्येवा, द्येवा, क्‍येवडं ते धूड
ताटलीयेवडा फडा, शेपूट जाडजूड
शिसवाचा खांब म्हना, म्हना अक्षी मुसळ
फिसफिसतंय अंगावर, जातंय सळसळ

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

काळंकुट्ट अंग, त्यावर बोट बोट क्‍यास
निस्तं बगूनशेनी तोंडाला येतोय फ्यास!
सरप न्हाई साधासुधा, जहराचा कारंजा
बळी घेतोय पटाटा, आनि ढेकर देतोय मजा
 
अशानं असं झालं, खबरीत आलं जित्राब
बोलाचाली होताना पंचायतीत गेली बाब
जहरी हाय जनावर पाटील, ठेचाया पायजे
घाव घालूनशेनी त्येला कुचलाया पायजे

शिवारातलं भूत पाटील, शिवारातच गाडा
रहाळात घुसलं तर मोडंल गावगाडा
शेतातलं भूत गावात यायला नगं
जहरी झाली जिमीन बघा, बिघं दोन बिघं!

‘‘कुटं उशाशी पाळायचा, करुन टाकू कारेक्रम!
ऐका पाटील, याच कामाला द्या आता अग्रेक्रम’’
सरप मारायची येवजना अशी पंचायतीत ठरली
काठ्यासोटं घिऊनशेनी मंडळी निघाली

शिवार शोधलं, बांध धुंडाळलं, झाडंझुडं झाडली
सरप काई सापडंना, समदी भुई उखळली
येवड्यात उठली बोंब पुन्ना, वस्तीत आलाय साप
‘‘अबाबाबा, आग्गोबायो, ह्यो तर सापाचा बाप!’’

न्हाई न्हाई म्हनताना गावात आली ब्याद
गल्लीचौक सुनसान झालं, जगरहाटी बाद
सामसूम बाजारहाट, अंगण ओकंबोकं
कडीकुलपात कोंडून स्वोताला बसली की लोकं!

सरप न्हाई ह्यो तर हाय पिंपळावरचा समंध
मान्सं खाती लावसट जनू, तिला न्हाई धरबंध
साप कसला ही तर लागली नष्टी नरपतीनाट
दीड वितीच्या दुनियेची लागली अक्षी वाट

काळाकभिन्न सर्प त्यो बसलाय गा दडून
काळगतीनं धावत येऊन डसतोय कडकडून
पाय झाडून, रगत वकून मान्सं जात्यात मरुन
ऐन मांडवात ऐकू येती मर्तिकाची धून

सर्पाच्या भीतीनं गावगाडा नासला
वस्तीवाडं मुकं झालं, समदा बेत फसला
निम्मं गाव भीतीनं म्येलं, निम्मं भुकेनं ग्येलं
येका जहरी सरपानं बगा, काय काय क्‍येलं

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article about snake story