ढिंग टांग : ऑल इज वेल!

ढिंग टांग : ऑल इज वेल!
Updated on

कार्यस्थली : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही.
बंगल्याच्या पायऱ्यांवर ते दोघेजण बसले आहेत. एकाची नजर शून्यात आहे, तर दुसरे गृहस्थ मोरांना दाणे टाकत आहेत. मोर ढिम्म हलत नसल्याने दाणे टाकणारे गृहस्थ थोडे चिडचिडे झाले आहेत. ते मोरांना परत थोडे दाणे टाकतात. मोर पाठ वळवून पिसारा फुलवल्यासारखे करतात. त्यामुळे गृहस्थ संतापून आसपास पायताण कुठे हाताशी लागते का, ते बघतात. सांपडत नाही! दुसरे गृहस्थ तंद्री लावून बसले आहेत. ते मनाने बव्हंशी पश्‍चिम बंगालात पोचले आहेत. अतिशय मनातल्या मनात ते रविंद्रनाथ टागोरांचे ‘चित्त जेथ भोयोशून्य...’ हे गीत गुणगुणून बघताहेत. बंगाली लहेजा अजून जमत नाही. त्यात गुजराथी उच्चार डोकावल्याने रसगुल्याचा खमणढोकळा होतो आहे! ‘‘मुझे कलकत्ता जानाही पडेगा...’’ जुन्या बॉम्बे टॉकिजच्या सिनेमातील बंगाली नायकाप्रमाणे ते स्वत:शीच पुटपुटतात. त्यानंतर दाणे न टिपताच मोर निघून जातात. दाणे टाकणारे गृहस्थ हताशेने तेच दोन-चार दाणे स्वत:च्या तोंडात टाकतात. 

‘‘मोटाभाई...ओ...मोटाभाई!,’’ दाणे टाकणारे गृहस्थ त्यांचे लक्ष वेधून घेऊ पाहात आहेत. मोरांचा आयता आडियन्स उठून गेल्याने ते साहजिकच कातावले आहेत. पण ‘चित्त जेथ भोयोशून्य’ जमेल तशा सुरात गुणगुणण्याच्या अफाट प्रयत्नात असलेले दुसरे सज्जन गृहस्थदेखील दाणे स्वीकारायच्या मनस्थितीत नाहीत, हाकेला ‘ओ’ देत नाहीत.

‘‘मोटाभाई, जे श्री क्रष्ण!’’ दाणे टाकणारे गृहस्थ जोरात ओरडतात. त्यामुळे मोटाभाईंची तंद्री भंग पावते. झोपेतून अचानक जागे झाल्यागत ते बसल्या बसल्या ‘कोण...कोण छे! कोण छे’ असे किंचाळतात. त्यांना स्थळकाळाचे भान येते. ते ओशाळतात.

‘‘जी, नमोजीभाई, जे श्री क्रष्ण!’’ ते हात जोडून नम्रपणे अभिवादन करतात. ‘‘अमणां शुं करवानुं?’’ एक दाणा तोंडात टाकत गृहस्थ विचारतात.

‘‘मुझे कलकत्ता जानाही पडेगा...’’ मोटाभाई बेसावधपणे उत्तरतात.

‘‘हूं बोरिसभाईनी वात करुं छूं! आपडा बोरिसभाई जोन्सन! एने ना पाडी ने! आवतो नथी!!,’’ येत्या प्रजासत्ताकाला विंग्रज साहेब बोरिस जॉन्सन येणार नाही, हे कळल्याने गृहस्थांचा मूड इंग्रजधार्जिण्या नेटिव्हासारखाच झाला आहे. हिरमोड झालेला माणूस जेव्हा दाणे खातो, तेव्हा जसा दिसेल, तश्‍शीच त्यांची मुद्रा आहे. (खुलासा : जिज्ञासुंनी हिरमोडावस्थेत शेंगदाणे खात खात आरशात बघावे! किंवा आरशात बघत शेंगदाणे खाल्ले तरी चालेल!) ‘‘तमे एकळाज समर्थ छो, नमोजीभाई! बोरिसभाईनी क्‍यां जरुरत छे?’’ मोटाभाई सोल्युशन देतात. ते गृहस्थांना मनोमन पटते. आख्खीच्या आख्खी परेड आपल्यासाठी होणार, हे लक्षात येऊन ते खुदकन हसतात. खुशीत येऊन ते मोरांना पुन्हा साद घालतात-

ऑव...ऑव...ऑव...ऑव... पण मोर राजधानीच्या सरहद्दीवर हटून बसलेल्या किसानांसारखे वागत आहेत. अजिबात येत नाहीत!

‘‘आपडो डोलांडभाई तो हवे पती गयो!,’’ गृहस्थ चिंतेचा नवा विषय चर्चेला काढतात.

‘‘जवां दे ने! आपडे शुं काम निकळे छे? रात गई, तो वात गई...’’ हात झटकून मोटाभाई त्यावरही सोल्युशन देतात. तेही गृहस्थांना पटते.

‘‘आ किसानभाईयोंना शुं करवानुं? बोरिसभाई आवतो नथी, आ किसानभाई जातो नथी!’’ गृहस्थांच्या मनातला सल बाहेर येतो. त्यावरही मोटाभाई सोल्युशन देतात.

 ‘‘मुझे कलकत्ता जानाही पडेगा!’’ ते मोठ्यांदा म्हणतात. ‘ऑल इज वेल, ऑल इज वेल’ असे स्वत:शीच म्हणत गृहस्थ मोठ्या समाधानाने मोरांची वाट बघू लागतात. मोर येणारच, जातील कुठे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com