esakal | ढिंग टांग : करोना गो, गो करोना!
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas

सध्या महाराष्ट्रात सर्वीकडे कोरोणा व्हायरस आला असून काही दिवस काळजी घेणेची आहे. तरी सर्व्यांनी आपापली काळजी घ्यावी.

ढिंग टांग : करोना गो, गो करोना!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सर्व नाग्रिकांस विणम्र आवाहण-
असे निदर्शनास आले आहे की सध्या महाराष्ट्रात सर्वीकडे कोरोणा व्हायरस आला असून काही दिवस काळजी घेणेची आहे. तरी सर्व्यांनी आपापली काळजी घ्यावी. सर्वप्रथम दोन विषयेंची काळजी ज्यास्त घेणेची गरज असून त्याबध्धल कार्यवाही न केल्यास कडक कारवाई करणेत येईल.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सर्व्यांसाठी कोरोना आच्यार संव्हिता तयार करणेत आली असून त्याणुसार वागनेचे आहे. तसे न केले असता सदर व्यक्‍तीस एकट्याने गाठून पोकळ बांबूचा वापर करणेत येईल. तरी सर्व्यांनी खालीलप्रमाने सूचना वाचून नीट सुधरने. 

१. सार्वजणिक ठिकानी शिंकू नये. तीन वेळा शिंक आल्यास माफी दिली जाईल. परंतु, धा-बारा सटासट शिंका आल्यास कारवाई करणेत येईल.

२. सार्वजणिक ठिकानी खोकल्यास जबर दंड ठोठावन्यात येईल. पोरीबाळी बघून खोकला काढन्याची सवय काही जनांना असते. त्यांना सगळे प्रकरन महागात लागेल, याची सर्व्यांनी नोंद घेणेची आहे.

३. पुन्यासारख्या ठिकानी एका लग्न समारंभात स्वत: नवरदेव बारा वेळा शिंकला! परिणामी, मांडवात पळापळ झाली. पंगतीत वाढायला मानसे उरली नव्हती. संबंधितांनी योग्य तो बोध घेऊण कार्य करावे!

४. सार्वजणिक ठिकानी गर्दी करु नये. आपल्याला सर्व गोष्टी गर्दीनेच करन्याची सवय आहे. ती मोडावी. सर्व गोष्टी एकेकट्याने कराव्या! 

५. दोन मानसे समोरासमोर आली तर शक्‍यतो वळक दाखवू नये! दाखवलीच तर लांबून नमस्कार करावा, आणि पुढे सटकावे!

६. उधारउसनवारी वसुली करनाऱ्यांना इशारा : येते पंधरा दिवस धोक्‍याचे आहेत. सबब, कोणीही वसुलीसाठी दारात येऊ नये! हस्तांदोलन करणेत येईल!!

७. ब्यांक किंवा पतपेढीच्या वसुली एजंटांना इशारा : दार उघडून मिठी मारणेत येईल! पुढील परिणामांची जिम्मेदारी सदर ब्यांक वा पतपेढीची असेल, याची नोंद घेणेची आहे.

८. दुकानात खरेदीसाठी गर्दी करु नये. शक्‍यतो, उधारी उसनवारीवर सध्या काम भागवावे! होम डिलिवरीवर जोर ठेवावा! मॉल सध्या बंद आहेत, याची नोंद घेणेची आहे. 

९. करोनाचे संकट टळावे, म्हणून देवास साकडे घालण्यासाठी देवळात गर्दी करु नये! घरी बसूनच साकडे घालावे! 

१०. हल्ली काही ठिकानी काही मास्क लावलेले लोक छोट्या बाटलीतून तळहातावर सॅनिटायझर नावाचा द्रव टाकतात. ते तीर्थ नव्हे, याची नोंद घेणेची आहे! सदर द्रवपदार्थ पोटात गेल्यास दोन-तीन दिवस घराबाहेर पडने कठीन होईल!

११. करोना व्हायरसचा तरास घालवन्यासाठी जालीम मंत्र सुचविन्यात आला आहे. तो मंत्र इथे देत आहो!

गो करोना...करोना गोऽऽ
करोना गोऽऽ....गो करोना!

...हा मंत्र मोजून सतरा वेळा (एकाठेपी) म्हणावा! दिवसातून तीन वेळा असे केल्यास जमावबंदीचा माहौल तयार होतो. गर्दीची पळापळ होते व सबब करोनाची बाधा कमी होते! तथापि, हा मंत्र म्हणताना खो खो हासन्यास मनाई आहे! तसे केल्यास कडक कारवाई होणेची आहे!

वरील आकरा नियम पाळल्यास करोनाचे संकट दूर होईल, असा आम्हाला इस्वास आहे. गो करोना, करोना गोऽऽ....इति.

(वरील पत्रक आम्हाला मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ एका मोर्चाच्या ठिकाणी आढळले. सोबत काही चिनी मजकुराची पत्रकेदेखील होती. परंतु, त्यावरील मजकूरसुद्धा याच आशयाचा होता. एखाद्या निरलस करोनाविरोधी कार्यकर्त्याने ते (कसेबसे) लिहिलेले असावे! त्यातील मुद्दे आम्हाला पटले, म्हणून आख्खे पत्रकच आपल्या हितासाठी येथे दिले आहे. गो करोना...)