ढिंग टांग :  ...मगच दिल्लीला जाईन!

ब्रिटिश नंदी
Monday, 10 February 2020

गेल्या आठवड्यात दिल्लीला गेलो होतो. तिथे श्रीमान मोटाभाई भेटले. माझ्याकडे बघून हसले. मी भक्‍तिभावाने नमस्कार केला. ते म्हणाले, ‘‘वेलकम टु दिल्ली!’’ मी ‘थॅंक्‍यू’ असे पुटपुटलो, पण तेवढ्यात ते घाईघाईने कुठेतरी निघून गेले. 

आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१ माघ पौर्णिमा.

आजचा वार : संडेवार.

आजचा सुविचार : ट ड डाऽऽ ड डाऽऽ...टडडाऽऽडडाऽऽ...एकाचया जन्मीजणू फिरुनीन वीजन्मे नमी..!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) ‘वर्षा’ बंगला सोडल्यानंतर मी डायरी लिहिणेही सोडले, असा भलताच गैरसमज काही लोकांचा झाला आहे. पण मी माझ्या सिद्ध मंत्राचा (नमो नम:) जप नित्यनेमे व भक्‍तिभावाने चालू ठेवला आहे. काळजी नसावी! ‘मी पुन्हा येईन’ असे सांगून मी निवडणूक लढवली होती. पण तीच चूक झाली. ‘नाहीतरी मी येणारच आहे पुन्हा, तर कशाला मते द्या?’ असा विचार बहुधा महाराष्ट्राच्या मतदारांनी केला असावा!!..पण झाले गेले गंगेला मिळाले. मी पुन्हा एकदा जोर करायचे ठरवले आहे...

गेल्या आठवड्यात दिल्लीला गेलो होतो. तिथे श्रीमान मोटाभाई भेटले. माझ्याकडे बघून हसले. मी भक्‍तिभावाने नमस्कार केला. ते म्हणाले, ‘‘वेलकम टु दिल्ली!’’ मी ‘थॅंक्‍यू’ असे पुटपुटलो, पण तेवढ्यात ते घाईघाईने कुठेतरी निघून गेले. 

मोटाभाई मला चारचौघांत ‘वेलकम टु दिल्ली’ असे म्हणाल्याची बातमी हाहा म्हणता म्हणता पसरली. त्यांच्या पाठोपाठ किमान डझनभर नेत्यांनी माझे स्वागत केले. थोड्या वेळाने पाहातो तो मोबाईलवर आमच्या चंदुदादा कोल्हापूरकरांचा मेसेज! -‘‘आता दिल्लीत जाणार का?’’ 

मी रिप्लाय केला, ‘दिल्लीतच आहे!’’

...इकडे मुंबईत प्रचंड खळबळ उडाली. मी दिल्लीत केंद्रात मंत्री म्हणून जाणार अशी अफवा इतकी पसरली की विचारता सोय नाही. दिवसभर डझनावारी फोन येत होते. जळगावहून मा. नाथाभाऊंनी मेसेज पाठवून खदाखदा हसणाऱ्या सात इमोजी फक्‍त पाठवल्या. अर्थात ‘तुम्ही दिल्लीत गेलात तर आमचे काय?’ अशी विचारणा करणारेही मेसेज आले. नाही असे नाही! उदाहरणार्थ, मा. गिरीशभाऊंना थेट फोनच केला. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ‘‘असं नका करू...’’ ते कसेबसे म्हणाले. मी त्यांना धीर दिला.

आमचे माजी मित्र आणि सध्याचे मा. मु. उधोजीसाहेब एरवी आमचे फोन उचलत नव्हते. मी दिल्लीला जाणार, हे कळल्याबरोब्बर त्यांनी खेळीमेळीच्या आवाजात फोन केला.

‘‘काय म्हंटाय, बरेच दिवसात भेट नाही...’’ ते फोनवर म्हणाले. नक्‍की उधोजीसाहेबच बोलताहेत ना? मी पुन्हा नंबर तपासून घेतला. 

‘‘दिल्लीला जाताय म्हणे, प्रमोशनवर...अभिनंदन!’’ ते म्हणाले. सारा प्रकार माझ्या ताबडतोब ध्यानात आला. तसा मी (नागपूरचा असलो तरी) चतुर आहे.

‘‘कोणी सांगितलं तुम्हाला?’’ मी विचारले.

‘‘कळलं असंच...आम्ही काही फोन टॅपिंग करत नाही, पण दिल्लीत आमचेही हेर पसरले आहेत, म्हटलं!’’ ते हसत हसत, पण खमकेपणाने म्हणाले.

‘‘तुमची बातमी चुकीची आहे...’’ मी शांतपणे उत्तरलो. काही क्षण कुणी बोलेचना! मग म्हणालो, ‘‘मी कुठ्ठेही जाणार नाही. इथलं काम पूर्ण करून मगच जायचं तिथं जाणार!’’ 

...काहीतरी विचित्र पुटपुटत त्यांनी फोन बंद केला. ते नेमके काय म्हणाले ऐकू आले नाही. ‘नसती पीडा’, ‘साडेसाती’, ‘महाराष्ट्राच्या राशीला लागलेला शनी’, ‘बारामती’, ‘बघून घेईन’ एवढेच शब्द तुटकतुटक ऐकू आले. त्यावरून काय अर्थ काढणार? बाकी एक गोष्ट पक्‍की आहे. इथल्या तीनचाकी सरकारच्या रिक्षाचे चाक पंक्‍चर करून आणि स्टेपनी पळवून मगच दिल्लीला जाईन! 

आता ‘मी पुन्हा येईन’ या मंत्राऐवजी ‘...मगच दिल्लीला जाईन’ हा मंत्र जपणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article devendra fadnavis delhi politics