ढिंग टांग : मैं हूँ कौन?

ब्रिटिश नंदी
Saturday, 18 January 2020

.... ही पत्रकारितेची शक्‍ती आहे मिस्टर! पत्रकार आणि संपादकानं असं बेडर राहून काम करायला हवं. आपल्यासारखं!! बाकी राजकारण काय...चालूच राहातं!

आत्मस्तुती करणं आपल्याला पसंत नाही. स्वत:चीच टिमकी किती वेळा वाजवणार? गेली अनेक वर्षे आम्ही पत्रकारितेचं असिधाराव्रत स्वीकारलं आहे व ते निभावूनही नेत आहो! आजवर चारित्र्याला डाग म्हणून लागू दिला नाही. आज पत्रकारितेच्या क्षेत्रात आपलं नाव आदरानं घेतलं जातं. कुठेही गेलो तरी माणसे उठून उभी राहतात. (आणि निघून जातात!) माणसाने रिस्पेक कमवावा लागतो तो असा. जाऊ दे. पुन्हा आत्मस्तुती आली. ते नकोच.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पत्रकारितेच्या निमित्ताने आपली थोरामोठ्यांमध्ये उठबस असतेच. (आमच्या लाखो वाचकांना माहीत आहे.) पत्रकाराला सर्वत्र संचार करावा लागतो. थोरमोठ्यांसह काही नामचीन, दाखलेबाज गुंडांबरोबरसुद्धा उठावं-बसावं लागतं. तो आमच्या कामाचाच भाग आहे. आपण कोणालाही घाबरत नाही. किंबहुना आपल्याइतका नीडर पत्रकार सध्या अन्य कुणी आहे का, याची शंका आम्हालाच अधूनमधून येत असते. पण आपण बोलून दाखवत नाही. उगीच आत्मस्तुती नको! काय?

आम्ही पूर्वीचं अंडरवर्ल्ड जवळून पाहिलं आहे. पूर्वी मुंबईचा कमिश्‍नर कोण हेसुद्धा अंडरवर्ल्ड ठरवायचं. अंडरवर्ल्डवाले मंत्रालयात यायचे. (संपादकसाहेब, हे वाक्‍य खोडा...उगीच भानगड नको!) कुख्यात गुंड आणि माफिया सरगना दाऊद इब्राहिमला तर आपण बालपणापासून ओळखतो. (सरगना हे त्याच्या पोराचं नाव आहे, असं आधी आपल्याला वाटायचं! जाव दे.) डोंगरीतल्या टेमकर मोहल्ल्याच्या गल्लीत कंचे (ऊर्फ गोट्या)  खेळतानासुद्धा हा दाऊद्या लेकाचा चापलुशी करायचा. ‘बुडच्या’ झाला तरी कधी कबूल व्हायचा नाही. एकदा त्याच्या काणसुलीत वाजवून खिश्‍यातली बत्तीस बैदुलं वसूल केली होती. पुढे तो कराचीत सेटल झाला. एकदोनदा त्याने फोन केला होता. धंदा बरा चालला आहे असं सांगत होता. आपण त्याला सरळ वाजवला : अबे, फटेले पतलुन की औलाद! तोंड सांभाळून बोल! गोट्या खेळताना तुझ्या कानाखाली भायखळ्याचा नक्‍शा काढला होता, विसरला काय? तू होगा कोई डॉन...मी असले बारा डझन डॉन रोज सकाळी....’’ जाऊ दे. आपलीच वार्ता आपणच काय सांगायची?

सलीम कंघी, ढब्बु सालेम, कोण तो माकडवाला की अस्वलवाला, अस्लम ढोबळी मिर्ची, असले कित्येक नामचीन लोक आपल्याला जाम टर्कायचे. म्हणायचे, ‘‘भाई, आपुनकू संभालके लेना! सेक्‍शन गरम है...’’ असल्या चिल्लर गुंडांना काय घाबरायचं?

नाइन इलेवन घडलं ना, तेव्हा थेट ओसामा बिन लादेनला फोन करून ‘ये तूने भोत खराब काम किया’ असं सुनावलं होतं आपण! ‘सॉरी’ म्हणून फोन ठेवला लेकाच्यानं!! नंतर आपणच बराक ओबामांना फोन करून ‘तो पाकिस्तानात ॲबटाबादला पडीक आहे! अमक्‍या अमक्‍या ठिकाणी ** वर करून पडलाय... धरा त्याला’ अशी टिप दिली. पण कशाला उगीच आपल्याच तोंडानं सांगा? 

...तो कोणी एक मुअम्मर गडाफी नावाचा एक आतंकवादी हुकूमशहा होता. स्वत:ला कर्नल बिर्नल म्हणायचा. म्हटलं असेल हुकूमशहा, तर आपल्या घरचा!! त्याला म्हणालो : ‘‘गडाफ्या, फुकण्या, किती पापं करशील! झाल्लममधी तरी जागा भेटेल का? तुझ्या सीरियात किती नरसंहार चालवलायस!’’

‘‘सीरिया नाही हबीबी...लीबिया, लीबिया!’’ त्याने अजीजीनं दुरुस्ती केली. पण तेवढंच. म्हटलं लीबिया तर लीबिया! आपल्याला काय?

.... ही पत्रकारितेची शक्‍ती आहे मिस्टर! पत्रकार आणि संपादकानं असं बेडर राहून काम करायला हवं. आपल्यासारखं!! बाकी राजकारण काय...चालूच राहातं!

जय महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article Journalists to editors