esakal | ढिंग टांग : आहे आणि नाही!

बोलून बातमी शोधा

maharashtra lockdown

सोशल डिस्टन्सिंगचे नियम,सरकारी सूचना, हात धुणं, काढे पिणं,आयुष मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वं...हे सगळं जनतेनं पाळलं तर लॉकडाउन आपोआप जाईल! मी आता फक्त निमित्तापुरता उरलो आहे!

ढिंग टांग : आहे आणि नाही!
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सदू : (फोनवर) कूऽऽक...कोण बोलतंय?

दादू : (अर्थात फोनवरच) सदूराया, इंजिनाचा आवाज काढतोस काय!! ओळखलं मी!

सदू : (डोळ्यांवर झापड) जांभई दिली! 

दादू : (च्याट पडत) जांभई ही अशी? रेल्वे इंजिनाच्या शिट्टीसारखी?

सदू : (पलंगावर लोळत) कंटाळा आला आहे! कंटाळा आला की मी नेहमी अशीच जांभई देतो!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दादू : कंटाळा तर तुझ्यापेक्षा जास्त मला आलाय!

सदू : नेमकं काय करायचं ठरवलं आहेस महाराष्ट्राचं?

दादू : (उजळ चेहऱ्यानं) विकास...महाविकास करायचा ठरवलंय! 

सदू : (कंटाळून) लॉकडाउन कधी उठणार ते सांग! 

दादू : (ओठ काढत) काय की! पण आहे कुठे लॉकडाउन? सगळीकडे अनलॉक तर चालू आहे! आता लॉकडाउन हा शब्द इतिहासजमा झाला सदूराया!

सदू : (संतापानं) अस्सं? कोण म्हणतो लॉकडाउन नाही?

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दादू : (ठणकावून) मी म्हणतो! 

सदू : (खवचटपणे) मग सध्या जे चालू आहे ते काय आहे? माणसं घराघरांत अडकून पडली आहेत! गाड्या बंद आहेत! दुकानं कधी उघडी, कधी बंद! घरात बसून बसून जीव उबगलाय नुसता! बाहेर हवा ढगाळ आणि घरात प्रचंड उकाडा! याला लॉकडाउन नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?

दादू : (पोक्तपणे) ...त्याला पावसाळा म्हणतात! ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे...’ सातवीत की आठवीत होती रे ही कविता? 

सदू : (दातओठ खात)... तुझा हिरवागार पावसाळा बघण्यासाठी घराबाहेर पडलेले लोक पोलिसांच्या कृपेनं हिरवेनिळे होऊन घरी परत येतायत! मघाशी मी शिवाजी पार्काला राऊण्ड मारायला गेलो तर पोलिसांनी मध्येच अडवून परत पाठवलंन! म्हणाले, ‘तुमचे दोन किलोमीटर झाले साहेब! घरी जा!!’ आणि तुम्ही सांगा की लॉकडाउन नाही म्हणून! अरे सामान्य माणसानं समजायचं तरी कसं?

दादू : (गंभीरपणे) वारे वा!! अजून साथ गेलेली नाही काही!! मग सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायला हवेत की नको? ती आपली जबाबदारी आहे! आहे म्हंजे आहेच! ही जबाबदारी पार पाडायलाच हवी! नव्हे, आम्ही ती पाडूच! अर्थातच पाडू!  किंबहुना ते आपलं कर्तव्यच आहे!

सदू : (कपाळाला हात लावत) आलं का तुझं किंबहुना? अरे देवा!! अवघ्या महाराष्ट्राला तुम्ही या ‘किंबहुना’त गुंडाळलं आहे! किंबहुना, किंबहुना हा शब्द ऐकला की हल्ली अंगावर काटा येतो!!

दादू : (शांतपणे) असं समज, लॉकडाउन हा एक भव्य, सुरक्षित पिंजरा आहे! लोकांनी त्या पिंजऱ्यात स्वत: जाऊन बसावं!!

सदू : टोटल न लागल्याने) आता हे काय नवीन?

दादू : (कर्तव्यकठोरपणे) लॉकडाउनमध्ये राहायचं की खुल्या वातावरणात, हा निर्णय आता मी घेणार नाही! महाराष्ट्रातली जनताच घेईल!

सदू : (बुचकळ्यात पडून) म्हंजे?

दादू : (त्रयस्थपणे) सोशल डिस्टन्सिंगचे नियम, सरकारी सूचना, हात धुणं, काढे पिणं, आयुष मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वं...हे सगळं जनतेनं पाळलं तर लॉकडाउन आपोआप जाईल! मी आता फक्त निमित्तापुरता उरलो आहे! आता जे काही करायचं ते जनतेनं करायचं!!

सदू : (ठेवणीतल्या खर्जात) थोडक्‍यात लॉकडाउन आहेही आणि नाहीही! बरोबर ना?

दादू : अगदी बरोब्बर! किती हुशार आहेस तू!

सदू : (डेडली पॉज घेत) म्हंजे तुझ्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसारखंच! आहेही आणि नाहीही...बरोबर ना?

ब्रिटिश नंदी