esakal | ढिंग टांग :  करावे की डरावे?
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  करावे की डरावे?

रसगुल्ल्याच्या पाकिटावर असे लिहिलेले असते!’पुढले पत्र तुम्ही मराठीत लिहिलेत ते चांगले केलेत.कालच्या ऑनलाइन बैठकीत मी मराठीतच संवाद साधण्याचे ठरवले होते.पण टाळ्या कुठे वाजवायच्या हे तुम्हाला कळले नसते

ढिंग टांग :  करावे की डरावे?

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

वीरपुरुषेर चरनकमले प्रथमइ सश्रद्ध प्रणाम निवेदन करि।

श्रीमान उधोजीबाबू (मोशाय,) कतो दिन धरे आपना के एकटा चिठि दिए आमार हार्दिक अभिनंदन जानाते चा बिछिलाम. किंतु, संकल्प एवम सिद्धीर मध्ये अनेक विकल्प...जाइ होक. म्हणजे जाऊ दे. इथून पुढचे पत्र तुमच्या माराठी भाषेतच लिहिते. लॉकडाउनच्या काळात तुम्हाला एखादे खुशालीचे पत्र लिहावे, असे बरेच दिवस मनात होते. पण संकल्प आणि सिद्धी यामध्ये अंतर पडतेच. काल आपली ऑनलाइन बैठॉक झाली. त्यात तुम्ही किती छॉन बोललात? की शुंदॉर, की दारुण? प्रत्यक्ष भेट झाली असती तर आमच्या कोलकात्याची खास शाँदेश मिठाई आणि मिष्टी दोई खास तुमच्यासाठी घेऊन आले असते. पण सध्या दिवस बरे नाहीत. व्हिडिओकॉलवर शामाधान मानावे लागते. ए च्यालबे ना!! 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नॉन-बीजेपी सरकारच्या मुख्यमंत्र्यांची अशी ऑनलाइन बैठक घ्यावी, असा माझा खूप आधीपासून प्लॅन होता. तुम्हालाही बोलवावे, असे मी मा. सोनियादींना बोलले. त्या तर तुम्ही नॉन-बीजेपी सीएम आहात, हे विसरूनच गेल्या होत्या! मला म्हणाल्या : ‘‘...पण ते ‘त्यांच्या’ अलायन्समध्ये आहेत ना? ते कसे आपल्या मीटिंगला येतील?’’ मग मी त्यांना ‘त्यांच्या सरकारात तुमचा पक्षदेखील सहभागी आहे’, अशी आठवण करुन  दिली. त्यांनी तुम्हाला बैठकीत सर्वात आधी बोलायची विनंती केली. तुम्ही मला विचारलेत ‘‘दीदी, इजाजत है ना?’’ तेव्हा मला किती बरे वाटले! खूब भॉलो! म्हणून मी तुम्हाला म्हटले, ‘‘ तुम बाहोत आच्छा लोडता हाय! तुमी तो फायटर आछि!’’

...अशीच फायटरगिरी चालू ठेवा. ‘करावे की डरावे? हे आता ठरवा’, असे तुम्ही म्हणालात. मला स्फुरण चढले आहे. आपण सारे मिळून लढूया! तुम्ही पुढे व्हा!! 

नम्र प्रोणामासह. आपनार मोमतादिदी.

ता. क. : मोदीजींना आधी मी बंगाली कुर्ते आणि मिठाया पाठवत होते. आता बंद केले आहे. पण तुम्हाला नक्की पाठवीन!! दीदी.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय दीदी, सप्रेम नमस्कार आणि जय महाराष्ट्र. आपले पत्र मिळाले. आनंद वाटला. आधीची अक्षरे कळली नाहीत. गोंधळलो. ‘हे पंजाबीत काय लिहिलंय?’ असे चि. आदित्यबाबूला विचारले. तो म्हणाला, ‘हे पंजाबी नसून बंगाली आहे. रसगुल्ल्याच्या पाकिटावर असे लिहिलेले असते!’ पुढले पत्र तुम्ही मराठीत लिहिलेत ते चांगले केलेत. कालच्या ऑनलाइन बैठकीत मी मराठीतच संवाद साधण्याचे ठरवले होते. पण टाळ्या कुठे वाजवायच्या हे तुम्हाला कळले नसते. शेवटी हिंदीत बोललो!  

मा. सोनियामॅडमनी सर्वात आधी मला बोलायची संधी दिली, तेव्हा मी तुम्हाला ‘दीदी, इजाजत है ना?’ असे विचारले. ते गंमत म्हणून नव्हे, सीरिअसली विचारले होते. आम्ही आता महायुतीत नसून महाआघाडीत आहोत, हे मा. सोनियामॅडमच्या लक्षात राहात नाही, हे खरे आहे. पण त्यात विशेष काही नाही. माझ्याही अनेकदा ते लक्षात राहात नाही! असो.

‘करावे की डरावे?’ हा प्रश्न मी विचारला, त्याने तुम्हाला स्फुरण चढले आहे, पण मला टेन्शन आले आहे त्याचे काय? बघू पुढे काय करायचे ते! तूर्त एवढेच. आपला. 

उधोजी (मा. मु. म. रा.)
ता. क. : बंगाली मिठाई आणि बंगाली कुर्ते तूर्त पाठवू नका ही विनंती. मी हल्ली बाहेर कुठे जात नाही. कुडते लागतात कशाला? नंतर कळवतो! 
उ. ठा.