ढिंग टांग : कन्फ्युजन!

ब्रिटिश नंदी
Friday, 31 January 2020

‘‘आपला मोर्चा जगातला सर्वांत मोठा ठरला पाहिजे!’’ हवेतल्या हवेत विशाल मोर्च्याचे स्वप्न बघितल्यागत साहेब स्वत:शीच म्हणाले. आमचा मनरूपी कुकर पुन्हा कोकलू लागला.

‘‘कोण आहे रे तिकडे?’’ गर्रकन वळून सर्रकन तलवार उपसत भर्रकन राजेसाहेबांनी पुकारले. आम्ही अदबीने पुढे झालो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘आज्ञा महाराज!’’ मुजरा करत आम्ही (अदबीनेच) म्हणालो.

‘‘मोहिमेची तयारी कुठवर आली?’’ राजियांनी एक भिवई वक्र करोन विचारले. हे विचारीत असताना त्यांनी आपल्या तेगीची धार तपासून पाहाणे सुरूच ठेविले होते. आम्ही सावध झालो. कसली मोहीम? आम्ही क्षणभर बुचकळ्यात पडलो. गेल्या फारा दिसांत राजेसाहेबांनी मोहिमा अंगावर घेतलेल्या नाहीत. शेवटची ‘लावरेतोव्हिडिओ’फेम मोहीम आटोपूनही काही महिने उलटोन गेलेले. तद्‌नंदर घोडदळास विश्रांतीच विश्रांती आहे... आता हे नव्या मोहिमेचे विचारताहेत! आमच्या मनरूपी कुकरमध्ये कन्फ्युजनरूपी वाफ भरोन कानावाटे शिट्ट्या वाजो लागल्या... 

‘‘झ...झ...हो...म्हंजे नाही...म्हंजे होच तसं काही तरी...’’ आम्ही ततपप करीत काहीतरी उत्तर देण्याचा क्षीण प्रयत्न केला. पण त्याने साहेब चीड चीड चिडले. हातातली तलवार फूटपट्टीसारखी हवेत उगारत ते म्हणाले- ‘‘चेचीन!’’

आम्ही घाबरून उगीमुगी राहिलो. पुन्हा कुकरच्या तीन शिट्ट्या जाहल्या! ‘‘आपल्या नऊ तारखेच्या मोर्च्याचं काय झालं?’‘ आमचा नाद सोडोन राजेसाहेबांनी स्पष्ट सवाल केला. अच्छाऽऽ ती मोहीम होय!! हात्तिच्या!! आधी ध्यानी आले असते तर बरे झाले असते, असे वाटून आम्ही सुटकेचा निःश्‍वास सोडला. कुकरची शिट्टी कधी कधी जीव खाऊन वाजताना फिस्सफुस्स...फशाक...फीऽऽ...असा ध्वनी येतो, तस्सा कानावाटे बाहेर पडोन आम्ही एकवार मोकळे झालो.

‘‘सर्व तयारी जय्यत झाली आहे, साहेब!’’ आम्ही माहिती पुरवली. खरे सांगायचे तर नेमकी काय तयारी चालू आहे, याची पुरेशी कल्पना आम्हालाही नव्हती. मोर्चा नेमका कशाच्या विरोधात आहे, हेच मुदलात आम्हाला नीटसे कळले नव्हते. इतकेच काय, मोर्चा कशाच्या समर्थनार्थ आहे, हेही ठाऊक नव्हते. पुन्हा मनरूपी कुकरात वाफ धरू लागली...

‘‘आपला मोर्चा जगातला सर्वांत मोठा ठरला पाहिजे!’’ हवेतल्या हवेत विशाल मोर्च्याचे स्वप्न बघितल्यागत साहेब स्वत:शीच म्हणाले. आमचा मनरूपी कुकर पुन्हा कोकलू लागला.

‘‘अलबत! निघणार म्हंजे निघणार!!’’ आम्ही (मनरूपी कुकराची) शिट्टी जबरदस्तीने (कालथ्याने) थोडी वर करून पाहिली. ‘‘नवा झेंडा करायला टाकला ना?’’ साहेबांनी विचारले. ‘‘एक लाख झेंड्यांची ऑर्डर दिली आहे, साहेब! वाटलं तर आणखी देऊ!!’’ आम्ही छातीठोकपणे सांगितले.

‘‘पण निवडणुकीत वापरायचा नाही हां! सांगून ठेवतोय! त्या झेंड्याला एक दांडा असतो, हे लक्षात ठेवा!’’ हातातील तलवार धुणे वाळत घालायच्या काठीसारखी उगारत साहेबांनी बजावले. आम्ही ‘कुऽऽक’ केले....आयमीन...‘हो’ म्हटले.

‘‘या पाकिस्तान्यांना आणि बांगल्या उपऱ्यांना हाकलूनच दिले पाहिजे!’’ हातातील तलवारीचे दोन-चार वार हवेत काढत साहेब त्वेषाने म्हणाले. आम्ही त्वरेने मागे जाहालो! हां, याचा अर्थ आपला त्या कुठल्याशा नव्या कायद्याला पाठिंबा आहे तर...मनातल्या कन्फ्युजनची वाफ किंचित निघते आहे, असे वाटत असतानाच साहेब म्हणाले-

‘‘पण आपला त्या दळभद्री कायद्याला पाठिंबा नाही हां! सांगून ठेवतोय!!’’ 

आँ? आम्ही च्याटंच्याट! ‘‘आपला मोर्चा नेमका कशाच्या विरोधात किंवा कशाच्या पाठिंब्यासाठी आहे?’’ असा सवाल आमच्या ओठांवरच अडकून पडला. आम्ही गप्प राहिलो...बराच वेळ कोणीही काही बोलले नाही! आम्ही काहीतरी बोलायला जाणार, तेवढ्यात साहेबांनी आम्हाला ‘शुऽऽ’ करून गप्प केले व कान देऊन काही ऐकू लागले. बराच वेळ तीक्ष्ण कानांनी काहीतरी ध्वनी टिपून त्यांनी आम्हाला शांतपणे विचारले...

‘‘तुला वाफेच्या रेल्वेइंजिनाची शिट्टी ऐकू येतेय का?’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article MNS confusion