ढिंग टांग - आमचे नवे होम्मिनिष्टर!

ब्रिटिश नंदी
Thursday, 8 April 2021

महाराष्ट्रास नव्या दमाचा कोतवाल मिळाला असून कोतवालपदी आमचे जीवश्च कंठश्च परममित्र जे की मा. दिलिप्रावजी वळसेजी-पाटीलजी यांची प्रतिष्ठापना जाहली आहे. त्यांच्या नव्या नियुक्तीखातर आम्ही सर्वप्रथम खुल्या मनाने स्वागत करितो.

मोबाइलची ब्याटरी डाऊन असताना, खिशात साधी काड्याची पेटीदेखील नसताना, अंध:कारमय बोगद्यातून ठेचकाळत पुढे पुढे जाताना अचानक दूरवर उजेडाचा ठिपका दिसून जीवात जीव यावा, तसे काहीसे आमचे जाहले आहे. डिपार्टमेंटच्या भाषेत बोलायचे तर सध्या सेक्शन गरम आहे! अशा परिस्थितीत वृत्त आले की महाराष्ट्रास नव्या दमाचा कोतवाल मिळाला असून कोतवालपदी आमचे जीवश्च कंठश्च परममित्र जे की मा. दिलिप्रावजी वळसेजी-पाटीलजी यांची प्रतिष्ठापना जाहली आहे. त्यांच्या नव्या नियुक्तीखातर आम्ही सर्वप्रथम खुल्या मनाने स्वागत करितो. महाराष्ट्रास त्यांच्यासारखा खमक्या कोतवाल लाभला, हे आपले सद्भाग्यच मानायला हवे. कां की, वळसेमामांसारखा पारदर्शी स्वभावाचा कोतवाल महाराष्ट्राला हवाच होता. आधीचे सगळे होम मिनिष्टर ज्यास्त बोलत! काही खूपच बोलत! काही माजी होम मिनिष्टर तर अजूनही बोल बोल बोलतात!! मा. वळसेमामा हे मोठ्या साहेबांचे स्वीय सहायक राहिल्यामुळे फोनवर माफकच बोलतात. कुणाचाही फोन आला की ते उचलून नकळत दुसऱ्याच्या हातात अदबीने देतात. जुनी सवय!

वळसेमामांच्या विधानभवनातील तळमजल्यावरील मोक्याच्या जागी असलेल्या दालनात आम्ही कित्येक दुपारी डुलक्या काढल्या आहेत. त्या दालनातून भवनात येणारा -जाणारा प्रत्येक जण अचूक दिसून येतो. सर्व घडामोडी तेथून बसल्याजागी टिपता येत असल्याने आमच्यासारखे हाडाचे पत्रकार त्या दालनरुपी गुहेत कायम बसलेले आढळतात. दुपारच्या सुमारास वळसेमामांच्या घरचा तीन मजली डबा येतो. त्यातील वरणभातलिंबू (वर साजूक तुपाची धार…) असा नेमस्त आहार आडव्या हाताने ओरपून तेथेच बसल्या बसल्या डुल्लकी घेण्याची सोय आहे. असो.

मा. वळसेमामांचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही लगबगीने मलबार टेकडीवरील ‘शिवगिरी’ बंगल्यावर निघालो. जाता जाता ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यातील शुकशुकाट बघून घ्यावा, म्हणून तेथे वळलो. ‘ज्ञानेश्वरी’च्या फाटकाबाहेर एक उंचपुरा मास्कधारी मनुष्य बंदोबस्तावरल्या हवालदाराशी वरणभातलिंबूयुक्त हुज्जत घालत होता..

ढिंग टांगमधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

‘‘ओ, साहेब, कुटं निघाले आत! अशी परमिशन नाय..,’’ हवालदाराने हटकले. ‘‘मला बंगला आतून बघायचा आहे…बरं का,’’ उंचपुरा मास्कधारी सज्जन गृहस्थ गुणगुणल्यागत म्हणाला.
‘‘आतून बघायचा? व्वा! आनखी काय नाय का? मुझियम वाटलं का?,’’ हवालदाराने मास्क वर करुन मुखातील ऐवज भिंतीवर सोडत फर्मावले. उंचपुरा मास्कधारी मनुष्य चपापला. ‘‘पेडर रोडवरच्या मोठ्या साहेबांचा आदेश आहे की, मलबार हिलवर जाऊन बंगल्याचा तपास करुन या, म्हणून आलो!’’ उंचपुरा मास्कधारी मनुष्य मवाळपणे म्हणाला. तपास हा शब्द ऐकल्याबरोब्बर आम्ही कान टवकारले. निरखून पाहिल्यावर तीन ताड उडालो. साक्षात मा. वळसेमामाच होते.
‘‘नमस्कार धाकटे साहेब, ‘शिवगिरी’चे ठाणे सोडून आज इकडे कुणीकडे?’’ अतीव आदरासह आम्ही वदलो. तांतडीने हवालदाराच्या अंगावर ओरडून आम्ही खाल्ल्या वरणभाताला (लिंबू व साजूक तूपयुक्त) जागलो. समोर उभे असलेले उंचपुरे मास्कधारी गृहस्थ हे आपले नवे साहेब आहेत, हे लक्षात येऊन हवालदाराने साल्युट मारला.
‘‘ त्याचं काय आहे की, महाराष्ट्राचा नवा कोतवाल म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली असून मोठ्या साहेबांच्या आदेशानुसार आजच्या आज चार्ज घ्यायचा आहे. महाराष्ट्र
पोलिसांची प्रतिमा उजळावी, म्हणून प्रयत्न करायचा आहे,’’ मा. वळसेमामा म्हणाले. ‘‘अलबत अलबत! पण हे आव्हान कसं पेलणार, धाकटे साहेब?’’ असे आम्ही विचारणार तेवढ्यात मा. वळसेमामांचा फोन वाजला. ‘‘नमस्कार, गृहमंत्र्यांचे कार्यालय…एक मिनिट!’’ असे म्हणून त्यांनी फोन चक्क आमच्या हातात दिला. आता बोला!
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article on new home minister of maharashtra