ढिंग टांग : अकरा दिवस!

ढिंग टांग : अकरा दिवस!

पुढील अकरा दिवस भयंकर धोक्‍याचे आहेत. काहीही घडू शकते. खरे तर कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते, पण तरीही तूर्त अकरा दिवसांची मुदत मिळाली आहे, हे बरे! कां की, येत्या अकरा दिवसांत महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा जोरकस वळण घेईल, अशी शक्‍यता आहे. वळण म्हटले की आम्ही नेहमी सावध होतो. कारण वळणावर अपघात होतात! नजर हटी, दुर्घटना घटी!! त्यात आम्ही तीनचाकी रिक्षावाले! अचानक वळण आले की भरधाव वेगातली रिक्षा उलटण्याची शक्‍यता असते. रिक्षाच ती! दोन्ही बाजूंनी उघडी! रिक्षातले प्रवाशी बाहेर फेकले जाऊन घायाळ होऊ शकतात. काहीही होऊ शकते! साहजिकच सांप्रत आम्ही चिंतेत आहो! 

घडले ते असे : कोकणभूमीतील सुप्रसिद्ध होराभूषण आणि कुंडलीशास्त्र कोळून प्यायलेले मा. श्री. पं. नारायणस्वामी भिवंडी येथे काही कार्यासाठी आले होते. तिथे अचानक डोळे मिटून त्यांनी जबरदस्त भविष्यवाणी उच्चारली : ‘‘आवशीक खाव, येरे दिसा, नी भर रे पोटा असा चल्लाहा! कुणाचो पायपोस कोणाक नय! तां काय नाय...फुडच्या अकरा दिसात सरकाररूपी संकासुराचो खात्मा होतलो! गपगुमान तुम्ही कमळ पार्टीच्या वांगडाक येवा! नाय तर कोणाच्यो म्हशी आणि कोणाक उठाबशी, असा होईत!...काय खरा नाय...नाय...नाय... नाय...ना...य!’’ (हा इको इफेक्‍ट आसंय! समाजलां?) पं. नारायणस्वामींनी आपली भविष्यवाणी उच्चारताच आभाळात एकच गडगडाट झाला. साऱ्यांनी चमकून वर पाहिले! मग शिंधुदुर्गाचो समुद्र खवळ खवळ खवळला! साऱ्यांनी लागलीच खाली पाहिले! पं. नारायणस्वामी यांच्या भाकित- भूकंपाचे केंद्र भिवंडीत असले, तरी त्याचा थरकाप थेट बांदऱ्यापर्यंत पोचला. बांदऱ्यातील ‘मातोश्री’ डळमळली. महाराष्ट्राचे कारभारी मा. उधोजीसाहेब तेव्हा नेमके खुर्चीत बसलेलेच होते. अचानक खुर्ची गदागदा हालूं लागल्याने त्यांनी खुर्चीचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले. ‘‘हे काय घडत्ये आहे?’’ त्यांच्या आरोळीने ‘मातोश्री’ दुमदुमली.

...थोड्याच वेळात उलगडा झाला की पं. नारायणस्वामींनी भविष्यवाणी उच्चारल्यामुळे आसमंत थरारला असून काही वेळातच थरकाप थांबेल, काळजी करण्याचे कारण नाही! परंतु, मा. उधोजीसाहेब हे सावध कारभारी असल्याने त्यांनी तांतडीने आपल्या सर्व शिलेदारांची (पक्षी : आमदारांची) बैठक बोलावून, ‘पं. नारायणस्वामींचे भाकीत खोटे पाडून दाखवा’ असा आदेश दिला. ही कामगिरी भलतीच अवघड! प्रत्यक्ष नियतीला जे जमणार नाही, ते काम महाविकास आघाडीच्या आमदारांना कसे काय जमणार? परंतु, एकदा शब्द दिला म्हंजे दिला!! त्यानुसार एकजुटीने ही भविष्यवाणी खोटी पाडण्यासाठी सरकार पक्षाने तयारी केली. 

प्रश्‍न फक्‍त अकरा दिवसांचाच आहे!  येत्या अकरा दिवसांत तीन चाकी सरकार पडेल, असे भाकीत आहे. अकरा दिवस काळजी घेतली की पुढची पाच वर्षे काही प्रॉब्लेम नाही. सिर्फ ग्यारह दिन!...या विचाराने आम्ही थोडेसे निश्‍चिंत झालो. पण मन मोठे अचपळ...शेवटी न राहवून आम्ही थेट पं. नारायणस्वामी यांनाच गाठले. प्रणाम करून भाकिताबद्दल खातरजमा करून घेतली...

‘‘ सध्याचे तीन चाकी सरकार अकरा दिवसांत पडेल, असे तुमची भविष्यवाणी आहे ना? का हो?’’ आम्ही नम्रपणे (पक्षी : घाबरत) विचारले. क्षणभर रोखून पाहत पं. नारायणस्वामी खो खो हसू लागले. म्हणाले-

‘‘शिरा पडो मेल्या तुज्या तोंडार...भविष्यवाणी नाय....आमची शापवाणी असंय ती!’’ 

...तरीही आम्ही अजून चिंतेतच आहो! काय सांगावे? कुठल्याही क्षणी काहीही घडेल!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com