esakal | ढिंग टांग : तानापिहिनिपाजा!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : तानापिहिनिपाजा!

दिवसभराच्या मेहेनतीने अंग आंबून गेलवतं. आता निवांत व्हायला जायचं... बाकी दुनिया गेली झाल्लममधे...असे मणातल्या मणात म्हणून आपन रिक्षाचा दांडा वढला आणि गिअर टाकनार येवड्यात आटवन झाली की गाडीत ग्यास संपलेला हाहे.

ढिंग टांग : तानापिहिनिपाजा!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : पुणे किंवा मुंबई किंवा नागपूर किंवा फॉर द्याट म्याटर महाराष्ट्रातले कुठलेही शहर!
वेळ : ज्या टायमाला रिक्षावाले हात करूनही थांबत नाहीत, ती वेळ! साधारणत: सायं. आठ-साडेआठ! दिवस : कुठलाही!
.........
दिवसभराच्या मेहेनतीने अंग आंबून गेलवतं. आता निवांत व्हायला जायचं... बाकी दुनिया गेली झाल्लममधे...असे मणातल्या मणात म्हणून आपन रिक्षाचा दांडा वढला आणि गिअर टाकनार येवड्यात आटवन झाली की गाडीत ग्यास संपलेला हाहे. इंडिकेटरवर लाल दिवा टिवटिवतोय. गाडीला ग्यास घालायचा, का प्वोटात पेट्रोल टाकायचे, हे न कळून उगीचच इंजिन रेस करत ऱ्हायलो. ‘ह्याच्या***, आता बाबूभाईच्या पंपावर तासदोन तास रांग धरून बसावं लागनार. त्यापरास सक्‍काळीच भरू’ असे म्हनून बिनधास्त गिअर टाकला. तेवढ्यात समोरून एक लेडीज चालत आली. ‘एऽऽ एऽऽऽ रिक्षावाला!ऽऽ...’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘एऽऽ कोनाला बोल्ता मॅडम!,’’ तोंड बाहेर काढून आपन थितल्या थिते वाजिवला! 

‘‘लोकमान्य नगरला जायचंय!’’ त्या बाईने रिक्षाचा दांडा पकडला.

‘‘गाडी एम्प्टी न्हाही! दिवा बघा!’’ आपन इज्जतीत सांगितलं.

‘‘खाली नाही काय? वरती पांढरा दिवा लावलाय!’’ त्या बाईनं पॉइण्ट काढला. 

‘‘त्याचा अर्थ त्योच, म्याडम!’’ आपन डोक्‍याला हात मारला. च्यामारी, आर्टीओवाल्यांनी ही नवीनच भानगड सुरू केल्याली हाहे. गाडी खाली आसंल तर हिरवा लाइट, प्याशिंजर आसंल तर रेड लाइट आनि भाडं घेयाचं नसंल तर सफेत लाइट, टपावर लुकलुकलाच पायजेल, असा नवा नियम हाहे. शिंगापूर, लंडनमधी आसंच असतंय म्हने! च्यायची, असू दे, जाऊ! हे झेंगट हितं कशाला पायजेल? पन आपन इज्जतीत साती रंगाचे दिवे लावून घेटलेले हाहेत. मान्सानं कसं कायद्यापरमानं वागावं...

‘‘तुम्हाला भाडं का घ्यायचं नाही? कंपलेंट करीन!’’ 

‘‘कशाला कंपलेंट करता म्याडम? दिवसभर हिरवा लाइट लावून हिंडत हुतो, तवा कोणी गाडीत बसायला मागत नव्हतं! आता दिवाच बदलतो बघा!,’’ असं सांगून मी थोडं खाटखुट करून कंप्लीट दिव्यांची माळ चालू केली, आनि म्याडमला डेमो दिला.    ‘‘हा पिवळा लाइट बघा!,’’ मी बोट दावलं. 

‘‘त्याचं काय?’’ बाईनं इच्यारलं. 

‘‘इसका मतलब गाडी एम्प्टी असली तरी ड्रायवर घरकू जा रहेला हय!’’ मी बोल्लो. बाईनं दिव्यांची माळ नीट पारखून बघितली.    ‘‘हा नारिंगी दिवा कशाला?’’

‘‘गाडीत खराबी हाहे, गाडी कंडिशनमध्ये न्हाही, असं सांगतो तो दिवा!’’ आपन इन्फर्मेशन दिली.

‘‘ ...आणि हा जांभळा दिवा कशाला?’’ तिनं इच्यारलं. 

‘‘याचा अर्थ गाडी कंडिशनमधे असली तरी ड्रायवर कंडिशनमधे न्हाही!,’’ आंगठा तोंडाकडं निऊन मी ओशाळून सांगिटलं. बाई संतापानं काही पुटपुटली.

‘‘हा निळा दिवा कशाला?’’ बाईचे सवाल संपना झालेवते!

‘‘ड्रायवर जेवन घेन्यासाठी बुर्जीपावच्या गाडीवर जात हाहे!’’ मी निळ्या दिव्याचा अर्थ सांगिटला.

‘‘कम्माल झाली तुमची! अहो, सगळं दिवे लावूनच सांगणार का आता आम्हाला? एरवी का कमी दिवे लावता रस्त्यात? आणि काय हो? हे वरती फूल कसलं चिकटवलंय?,’‘ म्याडमनं जोरात इच्यारलं.

‘‘बाईसाहेब, ते फूल न्हाही. कमळाचं चिन्ह हाहे! पन काय सांगू? हे चिन्ह बघून लोक हल्ली हल्ली गाडी एम्प्टी असूनबी बसत न्हाहीत! धंद्यानंच मार खाल्ला, आता काय करता?’’ वैतागून आपन उत्तर दिलं.

म्याडमला म्हणालो, ‘‘बसा, सोडतो लोकमान्यनगरला!’’