ढिंग टांग  :  विलग राहा, स्वस्थ राहा!

ढिंग टांग  :  विलग राहा, स्वस्थ राहा!

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब सीएम, शतप्रतिशत प्रणाम! तुमचा टीव्हीवरला संदेश पाहिला आणि मन भरून आले. तुमचे दर्शन असे दुरून घ्यावे लागते आहे, हा केवढा मोठा दैवदुर्विलास!! एकेकाळी आपण दोघेही सतत एकत्र असू! (तुमच्या ‘मातोश्री’ बंगल्यावरचा बटाटेवडा आणि जेवणे आठवतात आणि मन अजूनही जुन्या काळात जाते...असो!) पण आता परिस्थिती बदलली. फारा दिवसांत आपली गाठभेट नाही की बोलणे नाही. 

कोरोनाच्या संकटकाळात तुम्ही टीव्हीवरून जनतेला धीर दिलात. पुढले दहा दिवस महत्त्वाचे आहेत, असे म्हणालात. ते पाहून मन भरून आले. सगळे काही ठीकठाक झाले असते, तर आज तुमच्याजागी मी असतो, असे वाटून हुंदका आला. पण आवरला...असो.

गेले काही दिवस तर मी पोलिटिकल क्‍वारंटाइनमध्ये आहे, असेच वाटू लागले आहे. कुणाशीच फारसा संपर्क नाही. कुणाशी बोलणे नाही. मी विलग पडल्यासारखा झालो आहे. जरा कुठे काही बोललो, तर लोक कोरोनाची भीती घालून गप्प बसवतात. अशा परिस्थितीत माणसाने राजकारण करायचे तरी कसे? 

...तसा मी हिंडतो फिरतो आहे. (काळजी असावी!!) परवा मंत्रालयातही थोडावेळ येऊन गेलो. पण कोणीही ओळखले नाही. एरवी मला बघितल्यावर जागचे उठून सलाम करणाऱ्या प्रवेशद्वारावरल्या पोलिस शिपायानेही ‘सामाण्य नाग्रिकांसाटी बंद आहे’ असेच थंडपणे सांगितले. त्याची चूक नव्हती. माझ्याच तोंडावर मास्क होता. मी ‘सामाण्य नाग्रिक’ नसल्याचे त्याला ओरडून सांगितले. सत्ता गेली की माणूस लागलीच ‘सामाण्य’ होतो का? जाऊ दे, झाले.

तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे देश आणि महाराष्ट्र सध्या मोठ्या संकटातून जात आहे. कोरोनाबद्दल राजकारण करायचे नाही, असे आमच्या पक्षाने ठरवल्यामुळे सध्या आम्हाला काहीच करता येत नाही. म्हणून स्वयंविलगीकरण लादून घेतले आहे. नाहीतरी सध्या विलगीकरणाचा जमाना आहे. माणूस जेवढा विलग याने की आयसोलेटेड राहील, तितका निरोगी राहील! हो की नाही? 

अजिबात गर्दी करू नका, असे आपणही लोकांना वारंवार सांगता आहात. गर्दीमुळे नुकसान होते आणि महाराष्ट्रावरील संकट अधिकच गहिरे होते, असे तुम्ही म्हणालात. मी हेच तर गेले सव्वाशे दिवस तुम्हाला सांगतो आहे!! ‘गर्दीचे राजकारण करू नका, आपण आपले बघू’ हे तुम्हाला मी सव्वाशेवेळा तरी सांगितले असेल. पण तुम्ही ऐकले नाही! शेवटी गर्दी करून सत्ता काबीज केलीत! खुर्चीसाठी केवढी ती गर्दी!! 

आपले गेल्यावेळचे सरकार किती सुटसुटीत होते. मी मंत्रालयात, ‘तुम्ही मातोश्री’वर! पाच वर्षे महाराष्ट्राचा कारभार किती उत्तम तऱ्हेने चालला! ते दिवस आठवा आणि गर्दी थोडी कमी करा, असे सांगण्यासाठीच हा पत्रप्रपंच केला आहे...

‘टू इज कंपनी, थ्री इज क्राऊड’ अशी इंग्रजीत म्हणच आहे. म्हंजे दोघांचा तो सहवास, तिघांची ती गर्दी! तुमचे तीनचाकी सरकार हे असे गर्दीचे आहे आणि गर्दी टाळणे हाच एकमेव मार्ग उरला आहे... नाही का?

दरवेळी एकजुटीने राहाणे हिताचे नसते, काही वेळा राजकीय विलगीकरणाचीसुद्धा आवश्‍यकता असते, हाच धडा सध्याच्या परिस्थितीने शिकवला आहे. तेव्हा पुन्हा एकवार विचार करा. युनायटेड वी फॉल, डिव्हायडेड वी स्टॅंड हा मंत्र ध्यानी धरा! विलग राहा, स्वस्थ राहा!! कळावे. 
आपला जुना मित्र. नाना फडणवीस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com