esakal | ढिंग टांग  :  हौडी तात्या आणि साबरमती!
sakal

बोलून बातमी शोधा

sabarmati

जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या जगातील सर्वांत मोठ्या रॉक कार्यक्रमाबद्दल आम्ही काही सांगणार नाही. कां की आम्ही फक्‍त साबरमती आश्रमातच ड्यूटीला होतो.

ढिंग टांग  :  हौडी तात्या आणि साबरमती!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

जे  श्रीक्रष्ण! सांप्रत आम्ही गुजराथेतील अमदावाद (खुलासा : काही अज्ञ जन हा उच्चार अेहेमदाबाद असा करतात..च...च..!) येथे मुक्‍कामी आहो! ‘आम्हां सर्वांचे लाडके एनाराय काका श्री. रा. रा. ट्रम्पतात्या यांचे अमेरिकेहून आगमन होणार असून, सोबत मेलानियाकाकूदेखील असणार आहेत. सबब, कुठलीही सबब न सांगता त्यांच्या स्वागतासाठी अमदावाद येथे (पुन्हा : अेहेमदाबाद नव्हे!) तांतडीने हजर व्हावे’ असा आदेश थेट दिल्लीहून मिळाल्याने आम्हाला जावेच लागले. फॉरेनच्या टूरवर सहसा पर्यटकांसोबत टूर-ट्रावलवाले ‘आपलं माणूस’ असते! आमची नियुक्‍तीही रा. ट्रम्पतात्या आणि मेलानियाकाकूंचे ‘आपलं माणूस’ म्हणूनच झाली होती. अमदावाद (अेहेमदाबाद म्हणायचं नाही...लक्षात आहे ना?) येथील जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या जगातील सर्वांत मोठ्या रॉक कार्यक्रमाबद्दल आम्ही काही सांगणार नाही. कां की आम्ही फक्‍त साबरमती आश्रमातच ड्यूटीला होतो. रा. तात्यांना वेळी (अवेळी) पाणी आणून देणे, दर्शनासाठी साबरमती आश्रमातील कुटीत जाणाऱ्या मेलेनियाकाकूंच्या पर्स आणि बुटांचे रक्षण करणे, चरख्यावर सूत कातण्याचे प्रात्यक्षिक देणे, अशी असंख्य कामे आमच्याकडे होती. ती आम्ही यथायोग्य पार पाडली. जाताना रा. तात्यांनी प्रेमाने पाच रुपयांची नोट आमच्या मुठीत गपचूप चुरगळलीन!!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पू. मोदीजी स्वत: हिंडून रा. तात्यांना आश्रम दाखवीत होते. आम्ही मागे मागे फिरत होतो. पू. मोदीजींनी रा. तात्यांना खादीची वस्त्रे भेट दिली. त्याचे काय करायचे असते? हे मेलेनियाकाकूंना कळेना! या वस्त्राचे कपडे शिवायची फ्याशन आहे, असे म्हटल्यावर मात्र काकूंनी व्यवस्थित ‘वॉव’ वगैरे केले. रा. तात्यांची नजर तेवढ्या गांधीजींच्या सुप्रसिद्ध तीन माकडांकडे गेली. बुरा मत सुनो (कानावर हात), बुरा मत कहो (तोंडावर हात) आणि बुरा मत देखो (डोळ्यांवर हात) या गांधीजींच्या वानर त्रिमूर्तीकडे बघून रा. तात्या आमच्याकडे वळून म्हणाले, ‘‘ तुझा चेहरा असाच दिसतो! हाहा!!’’ 

...परदेशी पाहुण्यांना साबरमती आश्रमात आणून त्यांना चरख्यावर बसविणे, हा आमच्या पू. मोदीजींचा लाडका छंद आहे. चरख्यावर सूत कातणे ही सोपी गोष्ट नाही. पाहुण्यांना घाम फुटतो व पुढील वाटाघाटींच्या वेळी त्यांचा सूर नरमाईचा होतो, असा पू. मोदीजींचा आडाखा असावा!! रा. तात्यांच्या वेळीही हेच घडले. पेळू हातात धरुन लांब लांब लांबवणे आणि त्याच वेळी चरखा फिरवणे या क्रिया एकाच वेळेला करताना रा. तात्या गोंधळले. थोड्यावेळाने पेळू धरलेला हात गोल गोल फिरुं लागला आणि चरख्याचे हॅंडल ते उगीचच ओढू लागले!! (घरच्या घरी करून पहा : डोकीवर थांपट्या माराव्यात आणि त्याच वेळी पोटावर गोलगोल पंजा फिरवून बघावा!!) बापूंच्या कुटीत शिरण्यापूर्वी बूट काढावे लागतील, असे सांगितल्यावर रा. तात्या यांचा चेहरा थोडा उतरला. त्यांच्या बुटाशी आम्ही मोजून साडेबारा मिनिटे उभे राहिलो. 

‘‘च्यालो, हवे जईये! लेट थई गया!’’ असे म्हणत पू. मोदीजींनी तात्या आणि काकूंना तिथून जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर दोन लाख माणसे दाखवायला नेले. 

तेथे झालेला शानदार ‘हौडी ट्रम्प’ कार्यक्रम आम्ही एका चहाच्या टपरीवर बसून टीव्हीवर पाहिला. अशाच धर्तीचा ‘हौडी मोदी’ कार्यक्रम अमेरिकेत पांच महिन्यापूर्वी झाला होता, त्याची आठवण झाली.

शेजारी बसून चहा पिणाऱ्या इसमास आम्ही तसे सांगितलेही. पण तो कांग्रेसवाला असावा! नाक मुरडून म्हणाला : ‘‘हॅ, हा कार्यक्रमसुद्धा ‘‘हौडी मोदी’च आहे!’’