esakal | ढिंग टांग : वदनि कवळ घेतां..!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : वदनि कवळ घेतां..!

आपल्या अत्यंत लाडक्‍या अशा शिवभोजन योजनेस परवा रोजी २६ माहे जानेवारी साल २०२० ला प्रारंभ झाला. संपूर्ण दिवसात (दु. १२ ते २) या काळात एकूण ११ हजार सातशे चोवीस गरीब व गरजूंनी शिवभोजनाचा आस्वाद घेतला.

ढिंग टांग : वदनि कवळ घेतां..!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

गरीब नवाझ मा. मु. उधोजीसाहेब यांसी,

सर्वप्रथम आपणांचे पोटभर आभार आणि बहुत बहुत दुआ!! आमच्यासारख्या गरीब व गरजू माणसांसाठी आपण शिवभोजनाची योजना केलीत. आपले किती आभार मानू? शिवभोजनाचा आस्वाद घेऊन आल्या आल्याच सदर पत्र लिहीत आहे. आपल्या अत्यंत लाडक्‍या अशा शिवभोजन योजनेस परवा रोजी २६ माहे जानेवारी साल २०२० ला प्रारंभ झाला. संपूर्ण दिवसात (दु. १२ ते २) या काळात एकूण ११ हजार सातशे चोवीस गरीब व गरजूंनी शिवभोजनाचा आस्वाद घेतला. पहिल्या तीन गरीब व गरजूंमध्ये आम्ही होतो. सकाळी १२ ते दोन या काळात आम्ही एकंदर तीन शिवभोजन केंद्रांवर जाऊन आलो! तीस रुपयांची निरीक्षणे खाली नोंदवली आहेत :

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१. पहिल्या केंद्रावर आमच्या पानात फ्लावर, बटाटा व मटाराची मिक्‍स भाजी आली! दुसऱ्या केंद्रातील थाळीत फक्‍त बटाटा होता. तिसऱ्या केंद्रावरील भाजीचे रसायन अखेरपर्यंत लक्षात आले नाही. तथापि, टेष्ट चांगली होती. 

२. शिवभोजनालयात सुभाषितांचे व सुविचारांचे बोर्ड लावावेत. उदाहरणार्थ : ‘‘मोठ्यांदा बोलू नये’’, ‘‘उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म’’, ‘‘अन्न टाकू नये!’’ किंवा ‘‘भोजनालयाचे मालक येथेच जेवतात!’’ इत्यादी. 

३. ‘गरीब व गरजूंसाठी आहार’ अशी शिवभोजनाची टॅगलाइन आहे. लाइनमध्ये चिक्‍कार गरीब व गरजू होते. ते स्कूटर व बाईक कुठे लावायची ते विचारत होते. शिवभोजनालयाचे ठिकाणी पार्किंगची व्यवस्था व्हावी, अशी आमची नम्र सूचना आहे.

४. दोन चपात्यांसोबत शंभर ग्राम भाजी संपवणे थोडे कठीण पडते, असे निदर्शनास आले. एक तर चपाती आधी संपते किंवा प्राय: भाजी आधी पोटात जाते!! उरलेल्या अर्ध्या चपातीचे काय करायचे असा प्रश्‍न निर्माण होतो.

५. यावर उपाय म्हणून प्रत्येक टेबलावर लोणचे, चटणी किंवा कांदालिंबू असे काहीबाही ठेवावे. गरीब व गरजू भुकेला हातात उरलेल्या अर्ध्या चपातीचा निकाल त्यायोगे सहज लावू शकेल. 

६. भाताचेही तसेच. दीडशे ग्राम भात पसरून वाढला की बराच वाटतो. शंभर ग्राम डाळीसोबत निम्मा संपतो. उरलेल्या भाताचे काय करायचे असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यावर पापड मिळेल का? अशी (नम्र) विचारणा आम्ही शिवभोजनालयाच्या मालकास केली असता त्याने ‘‘आधी बाहेर हो’’ असे अनुदार उद्‌गार काढले.

७. बरेचसे लोक जेवणाची टेष्ट बघायला आलेले दिसले. झोम्याटोवर रेटिंग देण्यासाठी आपली नियुक्‍ती झाली आहे, असा अनेक लोकांचा गैरसमज असतो. शिवभोजनालयाच्या मालकाने बाहेर येऊन एकाला दोन्ही कानांच्या खाली झोम्याटल्यावर ही बरीच गर्दी कमी झाली.

८. एका गरीब व गरजूने घरून आणलेला डबा अधिक शिवभोजन थाळी असा भरपेट लंच केलेला आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. ‘येथे बाहेरील पदार्थ खाण्यास सक्‍त मनाई आहे’ असा बोर्ड शिवभोजनाच्या ठिकाणी लावावा!

९. एकास एकच थाळी हा नियमदेखील काहीसा जिकिरीचा वाटतो. एकदा जेवून झाल्यावर पुन्हा रांगेत उभे राहण्याची मुभा कृपया देण्यात यावी. शिववडा आम्ही एका वेळी चार खात असू! तसेच झुणका-भाकर एक रुपयात भेटायची तेव्हा आम्ही साताठ रुपयांचे जेवत असू!!

१०. सण्डेला काही स्पेशल मेनू देता येईल का? कृपया पहावे. 

कळावे. 
आपला एक गरीब व गरजू प्रजाजन .