esakal | ढिंग टांग : जालीम उपाय! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : जालीम उपाय! 

चेष्टा नको! पण वेळीच आवरा आता हे लॉकडाउनचं प्रकरण! अंगलट येईल! लोक घरात बसून बसून कंटाळले आहेत! पानबिडीची दुकानं बंद,दारूची दुकानं बंद! हॉटेल, सलून...सगळं बंद पडलंय! माणसानं टाइमपास करायचा तरी कसा?

ढिंग टांग : जालीम उपाय! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सदू - (फोन फिरवत) म्यांव म्यांव! 

दादू - (सवयीने) बोल सदूराया! कसा आहेस? 

सदू - (कोरडेपणाने) बरा आहे म्हणायचं! तू कसा आहेस? 

दादू - (छाती काढून) मी? मी लढतोय! 

सदू - (कंटाळून) मीसुद्धा! 

दादू - (मूठ आवळत) मी त्या "कोरोना'च्या मागे हात धुऊन लागलोय! आता लेकाच्याला सोडणार नाही मी! माझ्या महाराष्ट्रातून ही विषवल्ली समूळ उखडून टाकीन, तेव्हाच तलवार खाली ठेवीन! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सदू - (आश्‍चर्यानं) तलवार घेऊन लढतोहेस? 

दादू - (किंचित ओशाळून) तसं नाही रे! ही आपली बोलण्याची पद्धत! तसं बघायला गेलं तर हे युद्ध तरी कुठाय? इथे सगळे घरात बसलेत! 

सदू - (जांभई देत) आता कंटाळा आला!! किती दिवस घरात बसणार? काल सोळाव्यांदा बटाट्याची भाजी खाल्ली! डोळ्यांत पाणी आलं! 

दादू - (धीर देत) आणखी थोडेच दिवस कळ काढ! सगळं खुलं होईल! 

सदू - (दु-खातिरेकाने) खोटी आश्‍वासनं देऊ नकोस दादूराया! आज एक महिना झाला... 

दादू - (अनवधानानं) छे रे! सहा महिने होतील आता! 

सदू - (त्राग्याने) लॉकडाउनबद्दल बोलत होतो मी! तुमच्या खुर्चीच्या राजकारणाबद्दल नाही!! 

दादू - (भानावर येत) लॉकडाउनला इतकं कंटाळण्यासारखं काय आहे? तू तर त्या शिवाजी पार्कातून फारसा बाहेरदेखील पडत नाहीस! लॉकडाउन इन शिवाजी पार्क... ऑलवेज! हाहा!! 

सदू - (संयमानं) चेष्टा नको! पण वेळीच आवरा आता हे लॉकडाउनचं प्रकरण! अंगलट येईल! लोक घरात बसून बसून कंटाळले आहेत! पानबिडीची दुकानं बंद, दारूची दुकानं बंद! हॉटेल, सलून... सगळं बंद पडलंय! माणसानं टाइमपास करायचा तरी कसा? अशानं माणसं आपल्या घरात कुढून कुढून, रडून रडून, झिजून झिजून जातील! आय मीन... जा-ती-ल! कळतंय ना मी काय म्हणतोय ते? 

दादू - (समजूत घालत) तुझा त्रागा समजू शकतो मी, पण संकट अजून टळलेलं नाही सदूराया! जपायला हवं! 

सदू - (आरशात बघत कष्टानं) निदान सलून उघडायला तरी परवानगी द्या! हल्ली घरातली माणसं ओळखेनाशी झाली आहेत! 

दादू - (मान हलवत) सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाच्या विरोधात जाईल ते! 

सदू - (आग्रहानं) पानबिडी किंवा चहाच्या टपऱ्या तरी सुरू करा! 

दादू - (कडाडून विरोध करत) अजिबात नाही! पानं आणि मावे खाऊन पचापचा थुंकायला संधी देऊ म्हणतोस? जमणार नाही! चहावाल्याचं तर नावसुद्धा घेऊ नकोस! 

सदू - (रागावून) छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू होऊन रोजगार सुरू व्हावेत म्हणून म्हणतोय मी! माझ्यासाठी नकोय! 

दादू - (प्रेमाने) तसा तू शहाणा आहेस, हे माहिताय मला! 

सदू - (शेवटचा प्रयत्न करत) लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांचं कल्याण व्हावं, गरजूंना रोजगार मिळावा आणि सरकारच्या रिकाम्या तिजोरीत पैसा यावा असा जालीम उपाय माहीत आहे मला! पण सांगणार नाही! 

दादू - (उत्सुकतेनं) कुठला रे! सांग ना प्लीज! 

सदू - (शांतपणे) "दारूची दुकानं उघडणार, ऑनलाइन नोंदणी करा', असं जाहीर करा आणि सावकाश लॉकडाउननंतर डिलिव्हरी करा! आहे काय नि नाही काय!!