ढिंग टांग : ‘पेड’ न्यूज!

ब्रिटिश नंदी
Friday, 21 February 2020

आम्ही लावलेल्या झाडांची फळे आपण चाखीत आहात, हे विसरू नका!
हरितपत्रिकेच्या प्रतीक्षेत, आपला नम्र. सुधीर्जी मुनगंटीवार्जी, माजी (अहह!) वनमंत्री.

प्रति,
मा. मु. म. रा. श्री. उधोजीसाहेब,
आऽऽधी बीज एकले। बीज अंकुरले रोप वाऽऽढले।
एका बीजापोटी। तरु कोटी कोटी। सुमने कितीऽऽ।।
...जय हारि विठ्ठल! शतप्रतिशत नमस्कार विनंती विशेष. मी निसर्गावर प्रेम करणारा एक सामान्य माणूस या नात्याने सदर पत्र लिहीत आहे. सामान्य असलो तरी ‘‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे...’’ असे म्हणणाऱ्यांपैकी आहोत. उप्पर दिलेला अभंग (संदर्भ : संत तुकाराम चित्रपट... जुना!) आपण ऐकला असेलच. तो अभंग गुणगुणतच मी या राज्याचे वन खाते प्रेमाने सांभाळले होते. पाच वर्षांत मी वनमंत्री म्हणून तब्बल पन्नास कोटी झाडे महाराष्ट्रभर लावली. त्यामुळेच आपले राज्य सध्या हिरवेगार दिसते आहे! परंतु, माझ्या श्रमाचे चीज झाले नाही, याचे वाईट वाटते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आम्ही एकदिलाने लावलेल्या पन्नास कोटी झाडांचे काय (लाकूड) झाले, याची चौकशी करण्याचा निर्णय तुम्ही घेतल्याची ‘पेड न्यूज’ वाचनात (आणि ऐकण्यात) आली. झाडांबद्दलची न्यूज म्हणून पेड न्यूज म्हणतो आहे, कृपया गैरसमज नसावा! (नाहीतर त्याच्यावरही कंप्लेंटी येतील!) असो. तेहेत्तीस कोटी झाडे लावण्याची ती एक चळवळ होती, वन खात्याची मोहीम नव्हती. या चळवळीत अनेकांनी हौसेने भाग घेतला होता. मुंबईतील काही लोकांनी कुंडीतदेखील झाडे लावल्याचे समजते. या चळवळीबद्दल तुमच्या मंत्रिमंडळातील काही लोक विनाकारण गैरसमज पसरवत आहेत. त्याची शहानिशा करण्यासाठी आपण पाहिजे तर श्‍वेतपत्रिका काढावी, अशी माझी विनंती आहे. तेहेत्तीस कोटी झाडांबद्दलच्या अहवालाला श्‍वेतपत्रिका म्हणण्याऐवजी हरितपत्रिका म्हणावे, अशीही माझी एक उपविनंती आहे.

सोबत लावलेल्या झाडांचा हिशेब जोडत आहे. कृपया पाहून घ्यावे! पन्नास कोटीमधली किती झाडे जगली, याचा हिशेब मात्र देता आला नाही. कारण, तोवर आमचे राज्य व खुर्ची गेली! काही झाडे दिसण्यासारखी नाहीत. कारण, आम्ही तिथे बिया पेरल्या होत्या! उगवलेच नसेल, तर झाड दिसणार कसे? परंतु, प्रत्येक बीचा हिशेब आम्ही ठेवला आहे, हे आपल्या लक्षात येईलच!

आम्ही लावलेल्या झाडांची फळे आपण चाखीत आहात, हे विसरू नका!

हरितपत्रिकेच्या प्रतीक्षेत, आपला नम्र. सुधीर्जी मुनगंटीवार्जी, माजी (अहह!) वनमंत्री.

वि. सू. : वनमंत्री असताना मी वाघसुद्धा वाढवले होते. त्यात काही घोटाळा झाला आहे का? ते तपासण्यासाठी मा. विजयजी वडेट्टीवार आणि मा. जितेंद्रजी आव्हाड या तुमच्या मंत्र्यांना जंगलात पाठवावे, ही विनंती!

वि. उपसू. : वनमंत्री असताना एका चाहत्याने तुम्हाला फायबरचा जबर्दस्त वाघ भेट दिला होता. जो तुमच्या ‘मातोश्री’ बंगल्यात दिमाखात उभा आहे! तो चाहता म्हंजे मीच बरं!! सुधीर्जी. 
* * *
वनमंत्री मा. श्री. सुधीर्जी, आपले पत्र मिळाले. पत्राच्या पाकिटात काही बिया आढळून आल्या. त्या गुलबक्षीच्या असाव्यात, असे समजून तूर्त पेरल्या आहेत. त्या बिब्याच्या बिया असतील, अशी भीती मला घालण्यात आली होती. पण, मी ऐकले नाही. मी तुम्हाला चांगला ओळखतो. गेल्या खेपेला तुम्ही फायबरचा वाघ दिला होता, हेही आठवते!! तो वाघ इतका जिवंत वाटतो, की आम्ही तो कापडात झाकून ठेवला आहे. रात्री-अपरात्री उठायची वेळ आली तर दचकायला होत होते!! असो.

‘पेड’ न्यूजची काळजी करू नका! आम्ही श्‍वेतपत्रिका, हरितपत्रिका काढणार नाही! काढलीच तर भगवीपत्रिका काढू!! कळावे. आपला. उ. ठा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article tree inquiry