esakal | ढिंग टांग : डॉ. ट्रम्प! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : डॉ. ट्रम्प! 

वाचकहो! अखिल मानवजात संकटात लोटलेली असताना अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधक कोरोनाची लस शोधण्यात गर्क आहेत. त्याबद्दल चाचण्या सुरु आहेत. परंतु डॉ. ट्रम्प त्यांच्याकडे पाहून फक्त थोडेसे मुस्करतात .

ढिंग टांग : डॉ. ट्रम्प! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

जागतिक कीर्तीचे साथरोतज्ज्ञ आणि अखिल जगताचे धन्वंतरी डॉ. ट्रम्प (एमडी, यमयेड, यमटी, यमयेडी पीएटी...इ.) यांना कोण ओळखत नाही? विविध प्रकारच्या घातक साथरोगांवर विविध स्वरूपाची औषधे त्यांनी शोधून काढली. अनेक प्रकारच्या प्रतिबंधक लशींचा शोध त्यांनीच लावला. किंबहुना, लशींचा शोध अठराव्या शतकात एडवर्ड जेन्नर नामक कुण्या सामान्य डागतराने लावला असा एक भलताच गैरसमज जगभर पसरला आहे. वास्तविक लस टोचण्याच्या बहुतेक सर्व पद्धती डॉ. ट्रम्प यांनीच शोधून काढल्या आहेत, हे किती जणांना माहीत आहे? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हपिस-कार्यालयांना सुट्टी मारून ‘शीक लिव्ह’वर जाण्याची चाल जगभर असते. त्यासाठी डागतरांचे सर्टिफिकेट लागते. परंतु करारी बाण्याचे डॉ. ट्रम्प आपल्या पेशंटांना अशी खोटी सर्टिफिकिटे कधीही देत नाहीत. धडधाकट पेशंटला ते आधी लस टोचून आजारी पाडतात, मग सर्टिफिकेट देऊन लागलीच दुसरी लस टोचून बरे करून टाकतात! आहे की नाही आयडिया? 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. ट्रम्प यांच्या नुसत्या दर्शनहेळामात्रे रोगी खडखडीत बरा होतो, असे म्हणतात. गळ्यात स्टेथास्कोप आणि हातात लशीचे इंजेक्‍शन अशा तारणहारावतारात ते रुग्णासमोर उभे राहिले रे राहिले की काम तमाम... आय मीन... फत्ते होते. ‘बहात्तर रोगांचा कर्दनकाळ’ असे बिरुद डॉ. ट्रम्प यांना अखिल विश्‍वाने बहाल केले आहे ते काही उगाच नव्हे! 

सांप्रतकाळी जगभरात कोरोना विषाणूची साथ बोकाळली आहे. हा ‘चायना माल’ एक दिवस साऱ्या जगाचा घात करील, हे भाकित डॉ. ट्रम्प यांनी फार्पूर्वीच करून ठेवले होते. तथापि, या विषाणूच्या साथीला घाबरण्याचे काहीच कारण नाही, असेही त्यांनी त्याच वेळी म्हणून ठेवले होते. कारण ही भयंकर साथ पसरण्याआधीच डॉ. ट्रम्प यांच्याकडे अनेक उपाय तयार होते. 

वाचकहो! अखिल मानवजात संकटात लोटलेली असताना अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधक कोरोनाची लस शोधण्यात गर्क आहेत. त्याबद्दल चाचण्या सुरु आहेत. परंतु डॉ. ट्रम्प त्यांच्याकडे पाहून फक्त थोडेसे मुस्करतात (खुलासा ः ‘मुस्कुराना’ या हिंदी शब्दापासूनच मुस्करणे हा शब्द जन्माला आला आहे. जसा कोरोना व्हायरसपासून कोविड!) 

सारे जग रडत असताना तुम्ही हंसता? असे आम्ही थेट डॉ. ट्रम्प यांना विचारले. त्यावरही ते पुन्हा मुस्करलेच! 

‘कॅखॅट खाल्सा गॅवाला वॉल्सा!’ सोनेरी केसांची झुलपे उडवत आणि हातातील स्टेथास्कोप (गोफणीसारखा) गरगर फिरवत ते म्हणाले. प्रारंभी आम्हाला टोटल लागली नाही. 

‘टुमच्या मराठीत इडियम आहे ना इडियट?’ ते म्हणाले. तेव्हा आमच्या डोळ्यात उजेड पडला! ‘काखेत कळसा, आणि गावाला वळसा’ ही म्हण त्यांनी वापरली होती. 

‘ते कसं काय?’ आम्ही कुतूहलाने विचारले. 

‘वीस सेकंदात हातावरचा विषाणू नष्ट करणाऱ्या हॅण्डवॉशचे इंजेक्‍शन टोचले की चाळीस सेकंदात विषाणूचा किस्ता खतम! एवढं साधं तुम्हाला सुचू नये?’ 

... डॉ. ट्रम्प खरोखर जिनीअस आहेत. हो की नाही ? या कोविड महायोद्‌ध्याला आमच्यातर्फे एकवीस तोफांची सलामी!