esakal | ढिंग टांग : आपलं बजेट!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : आपलं बजेट!

सामान्य जनलोकांना अर्थसंकल्पातली बोजड परिभाषा कळत नाही. त्या भाषेत दोन-अडीच तास बजेट ऐकवणे (आणि ऐकणे) ही काही साधीसोपी बाब नव्हे. त्यासाठी घट्ट हृदय लागते.

ढिंग टांग : आपलं बजेट!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

अर्थशास्त्रातले आम्हाला थोडेफार (काही नतद्रष्ट टीकाकारांच्या मते फार थोडे) कळते, हे संपूर्ण महाराष्ट्राला एव्हाना ठाऊक झाले आहे. थोर अर्थतज्ज्ञ म्हणून आमच्याकडे खुद्द नोबेल विनर मा. अभिजित बॅनर्जीदेखील आदराने पाहतात. ‘‘तुमच्या एक टक्‍का ज्ञान जरी मजकडे असते तर मी गेला बाजार अर्धा डझन नोबेल उचलून आणली असती,’ असे ते अत्यंत आदराने म्हणाले होते. थोर अर्थतज्ज्ञ मा. अमर्त्य सेनबाबू तर आमच्या डोळ्याला डोळा भिडवून कधीही बोलत नाहीत. असो. 

सांगावयाचा मुद्दा एवढाच की, मोठमोठाले अर्थतज्ज्ञ आमच्या मताकडे लक्ष ठेवून असतात. आमचा अभ्यासच तसा दांडगा आहे. दर वर्षी अर्थसंकल्पाचे मनोज्ञ विश्‍लेषण करून जनसामान्यांना त्यांचे बजेट समजावून सांगण्याचे व्रत आम्ही घेतले आहे. सामान्य जनलोकांना अर्थसंकल्पातली बोजड परिभाषा कळत नाही. त्या भाषेत दोन-अडीच तास बजेट ऐकवणे (आणि ऐकणे) ही काही साधीसोपी बाब नव्हे. त्यासाठी घट्ट हृदय लागते. इंडियाच्या अर्थमंत्री श्रीमा निर्मलादेवी यांनी शनिवारी साऱ्यांना आपला अर्थसंकल्प सुनावला, तो आम्ही एक्‍याजागी देवासारखे बसून ऐकला. अर्थसंकल्प ऐकवून त्या खाली बसल्या, त्या वेळेला आम्ही साफ आडवे झालो होतो. 

अर्थसंकल्प ही वस्तूच थोडीशी दुर्बोध व अवघड व क्‍लिष्ट व समजण्यास कठीण अशी असते. कोठलाही अर्थसंकल्प सादर झाला की तो चांगला आहे की वाईट हे (आम्हाला) ठरवावे लागते. ते बरेच कठीण असते. अर्थसंकल्प मांडणे एकवेळ सोपे; परंतु, त्याचे विश्‍लेषण कठीण!! श्रीमा निर्मलादेवी यांचा अर्थसंकल्प चांगला असल्याचे काही वाहिन्यांवरील अर्थतज्ज्ञांनी ठामपणाने सांगितले. ते आम्हाला बरेचसे पटले. काही वाहिन्यांवरील अर्थज्ज्ञ मात्र सदर बजेट अत्यंत टाकाऊ आणि बोगस असल्याचे सांगत होते. आश्‍चर्य म्हंजे आम्हाला तेदेखील तंतोतंत पटले!! 

काही अर्थज्ज्ञांनी सांगितले की, अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे. गरिबांचे कल्याण करणारा आहे, आणि शेतकऱ्यांसाठी तर ही उत्कर्षाची सुरवात मानावी लागेल. उद्योजकांसाठीही भरीव योजना अर्थसंकल्पात आहेत. एकंदरीत बेत जमला आहे! त्यांच्या विश्‍लेषणात  तथ्य होते.

काही अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, मध्यमवर्गीयांना आयुष्यातून उठवणारा हा अर्थसंकल्प आहे. गरीब तर देशोधडीला कधीच लागले आहेत. शेतकरी दुप्पट उत्साहाने आत्महत्या करतील, अशा तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. उद्योजकांचे दिवाळे वाजणार आहे. एकंदरीत सगळा घोटाळा आहे! त्यांच्याही मीमांसेत बऱ्याच प्रमाणात तथ्य होते.

काही लोकांच्या मते प्राप्तिकरात भरघोस सवलती मिळाल्यामुळे हातात थोडा पैसा खेळेल. काही लोकांच्या मते प्राप्तिकराच्या नावाखाली ही करदात्यांची प्रत्यक्ष लूटमारच आहे. हे तर खरेच आहे. 

एकंदरीत काही लोकांचे मत असे दिसले की या अर्थसंकल्पात भविष्याचा कुठलाही विचार नाही. रोजगारनिर्मितीचे कुठलेही प्रयत्न नाहीत, आणि जागतिक मंदीशी दोन हात करण्याचे प्रयत्न तर सरकारने जणू सोडूनच दिलेले दिसतात. यातदेखील वस्तुस्थिती उघड होतेच.

काही लोकांचे मत याच्या अगदी उलट होते. त्यांच्या मते हा अर्थसंकल्प हा देशाला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा आहे. कोट्यवधी रोजगार भराभरा निर्माण होणार असून जागतिक मंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही, अशी पावले उचलण्यात आली आहेत.

यावर आमचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण असे : सत्ताधारी पक्षाच्या लोकांना अर्थसंकल्प चांगला वाटतो. विरोधी पक्षाच्या लोकांना दिशाहीन वाटतो. सामान्य मतदार याच्या मध्ये कुठेतरी असतो. फक्‍त हे सारे आपल्यासाठी चालले आहे, हे त्याला ठाऊक नसते. आणि आश्‍चर्य म्हणजे तसे ते नसतेच! इति.