esakal | ढिंग टांग : वर्क फ्रॉम होम!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : वर्क फ्रॉम होम!

जनलोकांच्या रेट्यामुळे आम्ही काही ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. नाही असे नाही. परंतु, आमच्यासारख्या प्रज्ञावंताने घरीच बसणे इष्ट, असे आग्रही प्रतिपादन करून आम्हाला पुन:पुन्हा घरीच बसविण्यात आले! असो.

ढिंग टांग : वर्क फ्रॉम होम!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सुजाण माणसाने होताहोईतो घरूनच काम करावे, या मताचा पुरस्कार आम्ही गेली अनेकानेक वर्षे करीत आहो! हल्ली त्यास ‘वर्क फ्रॉम होम’ असे म्हटले जाते. बालपणापासूनच आम्ही हे ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण अंगीकारले. समाधानाची बाब अशी की, आमच्या या धोरणाला समाजाकडून सर्वंकष पाठिंबा मिळाला! आम्ही कायमस्वरूपी घरीच बसावे, असे बव्हंशी समाजाने ठरविल्याने आम्ही शेवटी पत्रकार-कम-लेखक झालो. काही कुत्सित लोक आम्हास पानीकम लेखक असे हिणवतात. पण आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वर्षानुवर्षे घरात बसून खाल्ल्यामुळे आम्हाला जननिंदेला तोंड द्यावे लागले. परंतु, आमचा हेतू उदात्त होता, त्यामुळे आम्ही मुळीच खट्टू झालो नाही. ‘खायला काळ आणि भुईला भार’ ही म्हण फार्फार लहानपणापासूनच आमच्या कानावर पडली. ‘आयतं गिळायला मिळतंय, कशाला हलवील हातपाय?’ हे तीर्थरूपांचे जळजळीत उद्‌गार आम्ही आमटीच्या घोटागणिक (वर्षानुवर्षे) गिळले. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या अभंगोक्‍तीचा पुरेपूर प्रत्ययही आम्ही घेतला. कां की आमचे शेजारी आमची वळख ‘बस कंपनीचे म्यानेजिंग डायरेक्‍टर’ अशी खोचक करून देत! परंतु, इतुकी बोलणी खाऊनदेखील विक्रमादित्याप्रमाणे आम्ही हट्ट सोडला नाही. घट्ट घरीच बसलो.

जनलोकांच्या रेट्यामुळे आम्ही काही ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. नाही असे नाही. परंतु, आमच्यासारख्या प्रज्ञावंताने घरीच बसणे इष्ट, असे आग्रही प्रतिपादन करून आम्हाला पुन:पुन्हा घरीच बसविण्यात आले! असो.

‘वर्क फ्रॉम होम’ जीवनशैली ही एक चंगळ आहे, असा अनेकांचा गैरसमज असतो. परंतु, तसे नाही. हे एक अत्यंत खडतर असे व्रत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ केल्यामुळे आमच्या परिचयातला एक इसम कंप्लीट वाया गेला! सदर इसम सकाळी दहा ते सायंकाळी पांच वाजेपर्यंत नाक्‍यावर उभा राहून मगच घरी परत येत असे! पुढे पुढे तर लंच टाइमच्या काळात बसस्टॉपवर बसून तो घरून आणलेला डबा खाऊ लागला. सायंकाळी घरी परतल्यावर हक्‍काने पंख्याखाली बसण्याचे सुख भोगताना त्याचें मुखावर अतीव आनंद थापलेला दिसे! 

‘वर्क फ्रॉम होम’या खडतर व्रताचे अनेक तोटेदेखील आहेत व ते आम्ही तुम्हांस येथे सांगणार आहो!

१. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे माणसाला दुपारी १ ते ४ अशा वामकुक्षीचा अलभ्य लाभ होतो, हे सत्य असले तरी पुरेसे सत्य नाही. कां की, ही सुविधा (मनात आणल्यास) कुठल्याही हपिसात उपलब्ध होऊ शकते.

२. ‘वर्क फ्रॉम होम’ व्रतस्थाला घरची अनेक कामे करावी लागतात. आमच्या वळखीच्या एका गृहस्थास ‘वर्क फ्रॉम होम’ व्रताच्या मोजून सातव्या दिशी स्वच्छतागृह साफ करावयास सांगण्यात आले! पुढे पुढे तर हे गृहस्थ दिवसभर स्टुलावर उभेच दिसत! सदोदित ‘हा डबा काढा, तो डबा ठेवा’ हीच ड्यूटी करत स्टुलावर उभे राहिल्यामुळे त्यांना चालताना श्रम पडू लागले.

३. ‘वर्क फ्रॉम होम’ केल्यामुळे टीव्ही चिक्‍कार बघायला मिळेल, ही तर शुद्ध लोणकढी थाप आहे! टीव्हीचा रिमोट कधीही आपल्या हाती येत नाही, याची व्रतेच्छुंनी नोंद घ्यावी.

४. ‘वर्क फ्रॉम होम’ व्रतस्थाला चाऱ्ही वेळेला घरचेच अन्न खावे लागते! बटाटावडा दृष्टीसदेखील पडत नाही, हे सत्य आहे.

५.  खालील अभंग सुप्रसिद्धच आहेत...

वर्क फ्रॉम होम। वर्क फ्रॉम होम।
आयुष्याचा होम। त्याने होई।।
स्वातंत्र्याची ऐसी। लागलीसे वाट।
व्हावा नायनाट। कोरोन्याचा।।
...अधिक सांगणे सुज्ञांस न लगे!